गौरव साळी
बहिण- भावाचा नात्यातील आपुलकीचा सण म्हणजे रक्षाबंधन. रेशीम उत्पादक महिलांनी रेशीम कोषांपासून सुंदर राख्या बनवल्यात. त्यातून त्यांनी एक नवा व्यावसायिक मार्ग रचतानाच या सणाला रेशमी नात्याची गुंफणही घातलीय.
रक्षाबंधन हा भावा-बहिणीतील विश्वासाचा आणि प्रेमाचा सण. हे नातं दृढ व्हावे म्हणून बहीण भावाच्या मनगटावर धागा म्हणजे राखी बांधते. राखीच ती कुठल्याही धाग्याने बांधली जाणारी, पण जालना जिल्ह्यातील रेशीम उत्पादक महिलांनी रेशीम कोषांपासून सुंदर राख्या बनवण्याची वेगळी कल्पकता दाखवली आहे.
जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा चांगला मार्ग सापडला आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार पेठेतच आता रेशीम कोष विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना भावही मनासारखं मिळत आहे. रेशमाला मोठी बाजारपेठ आहे. रेशमापासून अनेक वस्तू बनवल्या जातात. हे पाहून जालन्यातील महिलांनी देखील रेशीम कोषापासून राख्या बनवण्यास सुरुवात केली आहे. रेशमी राख्यांनी भावा बहिणीच्या नात्यातील वीण अजूनच घट्ट केली आहे.
रेशीम कोष फोडून त्याला गोल कापून त्यांना पाकळ्यांचा आकार दिला जातो. त्या पाकळ्या एकत्र करून त्यांचे सुंदर फुल बनवले जाते. त्यानंतर पाहिजे त्या आवडत्या रंगात बुडवल्यावर ते छानसं फुल खुलतं. त्या फुलाला रेशमी दोऱ्यामध्ये ओवून त्यात मणी टाकले जातात. त्यामुळे या रेशमी राखीची नजाकत अधिकच वाढते.
अशा अफलातून, रेशमी धागे आणि रेशीम कोषापासून बनवलेली राखी ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला रेशमापासून बनलेल्या या राख्या बहिणी भावाच्या हातावर बांधतील आणि भावाशी असलेल्या प्रेमाच्या नात्याचं सौंदर्य आणखी खुलवतील, एवढं नक्की!