मुक्तपीठ टीम
सध्या घरोघरी गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहतोय. चौकाचौकांमध्येही सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे लक्ष वेधून घेतायत. यातील काही देखावे घरगुती असूनही फारच वेगळे असतात. जालना जिल्ह्यातील कुलकर्णी दांपत्याने असाच एक वेगळा महाराष्ट्राची पारंपरिक ग्राम संस्कृती आणि अमृत महोत्सव देखावा सादर केला.
गणपतीच्या सणाला गौरीचंही आगमन होतं. यावेळी गौरी परतल्यानंतरही जालन्यातील एका घरगुती देखाव्याची चर्चा सुरुच आहे. त्याचं कारणही तसंच आहे. या देखाव्यात ग्राम संस्कृती, गावातील अलुतेदार-बलुतेदार परंपरा ते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मांडलं. विशेष म्हणजे तो देखावा पर्यावरणपूरक देखावा धनश्री रामदास कुलकर्णी, रामदास कुलकर्णी व त्यांच्या परिवारानी तयार केला आहे. शहरातील आनंदवाडी श्रीराम मंदिर परिसरातील कुलकर्णी परिवार दरवर्षी गौरी गणपतीच्या सणाला घरी सजावट करतात. धनश्री रामदास कुलकर्णी यांनी गौरी गणपती समोर यावेळेस ‘ग्राम संस्कृती,गाव कामगार ते अमृत महोत्सव’ हा अनोखा देखावा साकारला आहे.
या देखाव्यात १९४७ मध्ये गावामध्ये वस्तू विनिमयाच्या स्वरूपामध्ये गाव गाडा चालत होता. यात गावामध्ये कोणतीही वस्तू घेताना पैसे लागत नव्हते म्हणजेच वस्तू विनिमयाच्या स्वरूपात सर्व वस्तू गावात मिळत होत्या. यामध्ये माठ,जाते,चप्पल, फडा,सोन्याचे दागिने अशा सर्व प्रकारच्या वस्तू गाव गाड्यांमध्ये बारा बलुतेदार व अठरा आलूतेदार या माध्यमातून गावातील वस्तू मिळत होत्या. हा संपूर्ण देखावा ते भारताचं अमृत महोत्सवी वर्ष लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाचे केलेले ध्वजारोहण अशा प्रकारचा देखावा साकारण्यात आलेला आहे.
यामध्ये शाडू माती, पुठ्ठा, रांगोळी, कागद, लाकूड, लाकडाचा भुसा, दगड, रंग वापरून पर्यावरण पूरक देखावा साकारला आहे. दरवर्षी पर्यावरण पूरक देखावा कुलकर्णी परिवाराच्या वतीने तयार केला जातो. ग्राम संस्कृती चे दर्शन घडवणारा आणि आपल्या संस्कृतीचे जतन करणारा असा अनोखा देखावा कुलकर्णी परिवाराने सादर केलेला पहायला मिळतो. त्यामुळेच गौरी घरी परतल्यावरही कुलकर्णींच्या देखाव्याची चर्चा सुरुच आहे.