-
अजय वैद्य
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे क्रिकेट प्रेम जगप्रसिद्ध आहे. भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ऑस्ट्रेलियामध्ये रोमहर्षक सामन्यात दैदिप्यमान आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मराठी मुंबईकराची ही कामगिरी पाहण्यासाठी आज बाळासाहेब असते तर त्यांनी अजिंक्यचं ‘मातोश्री’वर बोलावून प्रचंड कौतुक केलं असतं. शनिवारी २३ जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे.
त्यामुळेच क्रिकेटच्या संबंधातील त्यांची एक आगळीवेगळी आठवण आज मनात जागी झाली. ही घटना फारशी कोणाला माहिती नाही किंवा माहित असली तरी लक्षात नसेल. म्हणूनच अजिंक्यच्या नेतृत्वाखालील विजय आणि बाळासाहेबांची जयंती या पार्श्वभूमीवर हा प्रसंग मी आपणा सर्वांसमोर कथन करतो आहे.
ही घटना आहे १९७४ मधली, त्यावेळी वाडेकर हे भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान होते. फलंदाज आणि कप्तान म्हणून पराक्रम गाजविणाऱ्या वाडेकरांना या वर्षात मात्र लाजिरवाण्या अपयशाला सामोरे जावे लागले. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता आणि जून १९७४ मध्ये तेथील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात अवघ्या ४२ धावांमध्ये भारतीय संघ कोसळला. भारतीय क्रिकेट इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या होती आणि अर्थातच भारताचा दारुण पराभव झाला. या पराभवामुळे वाडेकर आणि पूर्ण भारतीय संघाबद्दल देशभर नाराजी व संतापाची भावना निर्माण झाली. खरंतर २४ जून रोजी झालेल्या या सामन्याच्या वेळी तेथील हवामान खराब होते आणि मैदानावर जोराचे वारे वाहत होते. परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेण्याच्या मनस्थितीत कोणीही नव्हते. या परिस्थितीचा नेमका फायदा उचलण्याचे काही वाडेकर विरोधी मंडळींनी ठरवले. या दौर्यावरून भारतीय संघ मायदेशी परतण्याच्या वेळी विमानतळावरच निदर्शने करून वाडेकर यांच्या तोंडाला काळे फासण्याचा डाव या लोकांनी आखला. त्यासाठी त्यांनी काही लोकांना हाताशी धरले व त्यांना चिथावणी दिली. याबाबतची पार्श्वभूमी अशी की, वाडेकर कप्तान होण्याच्या आधीच्या काळात भारतीय क्रिकेटमध्ये अमराठी मंडळींचा वरचष्मा होता आणि वाडेकरांसारखा मराठी माणूस कप्तान झाल्यामुळे त्यांचा जळफळाट होत होता.
क्रिकेट नियामक मंडळ , संघ निवड मंडळ यात अशी मंडळी असल्याचे बोलले जात होते. त्यांना वाडेकरांविरुद्ध रान पेटविण्यासाठी ही चांगली संधी मिळाली होती. क्रिकेट व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या एका परिचिताकडून मला या कारस्थानाची माहिती मिळाली. वाडेकर यांची ही बेइज्जती टाळण्यासाठी काय करता येईल याचा विचार करताना मला बाळासाहेबांचे नाव डोळ्यासमोर आले आणि मी त्यांना या प्रकाराची माहिती दिली. हे सर्व कळल्यावर ते चांगलेच संतप्त झाले आणि तसे काही न होऊ देण्याची व्यवस्था त्यांनी केली. ‘वाडेकर यांच्या केसाला जरी धक्का लावण्याचा प्रयत्न कोणी केला तर आमचे शिवसैनिक त्यांना बघून घेतील’ असा इशाराही त्यांनी दिला. बाळासाहेबांचे हे वक्तव्य काही वृत्तपत्रांमध्ये छापून आले आणि त्याचा योग्य तो परिणाम झाला. वाडेकर यांची टीम मायदेशी परतली तेव्हा विमानतळावर हजर राहण्याचे धाडसही त्या लोकांनी केले नाही आणि हा संघ सुखरूप परतला. मात्र वाडेकर यांना हा पराभव इतका लागला की, त्यानंतर ते कसोटी सामने खेळले नाहीत. बाळासाहेबांमुळे आपण बचावलो हे कळल्यावर वाडेकर यांनी त्यांचे आभारही मानले. बाळासाहेबांच्या स्वीय सहाय्यकाकडून मला नंतर ही माहिती मिळाली. कलाकार, खेळाडू यांच्या अडचणीच्या प्रसंगी बाळासाहेब कसे धावून जात असत याची अनेक उदाहरणे आहेत.
दादरच्या कोहिनूर चित्रपट गृहात सुरु असलेला दादा कोंडके यांचा चित्रपट ( हिंदी चित्रपट लावण्यासाठी)मध्येच काढून घेण्याचे कोहिनूरच्या मालकांनी ठरवले तेव्हा बाळासाहेबांनी त्याला दणका देत दादांचा चित्रपट पुन्हा लावणे कसे भाग पाडले हे सर्वांना माहिती आहे. तशीच काहीशी वाडेकरांबाबतची उपरोक्त घटना म्हणावी लागेल. म्हणूनच तर राजकारण आणि समाजकारणातच नव्हे तर कला आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींशी बाळासाहेबांचे निकटचे संबंध होते किंबहुना बाळासाहेब हे त्यांचे आधारस्तंभ होते.लॉर्ड्स मैदानावरचा ४२ धावांचा नीचांक भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नोंदला गेला असला तरी, गेल्याच वर्षी म्हणजे २०-२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ अवघ्या ३६ धावात गुंडाळला गेल्यामुळे आता तो नीचांक ठरला आहे. मात्र या पराभवावर फारशी प्रतिक्रिया उमटलेली दिसली नाही. वाडेकर मात्र त्यावेळी केवळ बाळासाहेबांमुळेच बेईज्जतीपासून बचावले म्हणूनच तर ‘असा नेता होणे नाही ‘अशी भावना सर्वच क्षेत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल व्यक्त केली जाते! त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि कर्तृत्वाला मानवंदना!
(अजय वैद्य हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जीवनाचा अभ्यासाबरोबरच राजकीय विश्लेषणासाठी ते ओळखले जातात.)