डॉ. तेजस लोखंडे
दिवाळी म्हटलं की आठवतं ते अभ्यंग स्नान आणि मग हळूच पाय वळू लागतात ते मोती साबण घ्यायला. पण खरंच सांगू का, अभ्यंग स्नान म्हणजे फासला साबण आणि झाला अभ्यंग असं खरंच नाही. अभ्यंग स्नान ही एक शास्त्रशुद्ध संकल्पना आयुर्वेदाने कित्येक हजार वर्षांपूर्वी ग्रंथात मांडून दिली आहे.
अभ्यंग ह्याचा साधा सोप्पा अर्थ सांगायचा झाला तर नित्य नियमाने सर्वांगाला तेल लावून स्नेहन (मालिश) करून त्वचेमध्ये तेल जिरवणे.
दिवाळी अभ्यंग स्नान :
दिवाळी हा शरद ऋतू मध्ये येणारा सण. या ऋतू मध्ये बाहेरील हवामान हे उष्ण आणि रुक्ष झाल्याने शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप ( वाढणे) होतो. उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत मुत्राचे प्रमाण कमी होऊन शरीरातील क्लेद (मल भाग) हा मूत्र मार्गाने कमी आणि स्वेद (घामातून) त्वचामार्गाने अधिक बाहेर पडतो. आयुर्वेदात त्वचा हे वाताचे स्थान सांगितले असून, स्वेदवह स्त्रोतसाच्या अधिक कर्मशीलते मुळे आणि वातावरण कोरडे झाल्याने त्वचा ही कोरडी पडायला लागते. त्यामुळे ह्या काळात अभ्यंग म्हणजेच सर्वांगाला तेल चोळून त्वचेचा स्निग्धपणा टिकवण्यासाठी मदत होते. तेलाच्या स्निग्ध गुणामुळे हे कार्य सिद्धीस जाते.
अभ्यंग विधी आणि कार्य :
आपल्या प्रकृती अनुसार वैद्यकीय सल्ल्याने योग्य तेल निवडून ते साधारण कोमट करून सकाळी प्रातः विधी पार पाडून सर्वांगाला तेल लावून जिरवावे. तळवे, पाय, कंबर, पोट, छाती, हात, मान, चेहरा, मस्तक ह्या सगळ्या स्थांनाना कोमट तेलाने खालून वर अशा एकाच दिशेने हात फिरवत तेल जिरावावे. हे करत असताना आपल्या परिसरात हवा वाहत नसेल (पंखा, एसी चालू नसावा) याची खबरदारी घावी.
कोमट तेलाने अभ्यंग केल्याने शरीरातील त्वचेच्या आधारे राहणारा वात दोषाचे शमन होते, त्वचेखाली असलेल्या स्वेद नलिका प्रसारण पावून मोकळ्या होत शरीरातील क्लेद (मल भाग) बाहेर यायला सहज मदत होते.
एवढे करून झाल्यावर साधारण अर्धा तास थांबून मग पुढील प्रक्रियेकडे वळावे.
उद्वर्तन / उटणे :
उद्वर्तन म्हणजेच सुगंधी द्रव्यांच्या चूर्णांनी शरीराला घर्षण (घासणे) करणे. या मध्ये त्रिफळा, सारिवा, नागरमोथा आदी द्रव्यांचा वापर केला जातो. तेलाभ्यंगामुळे शरीरातून बाहेर पडलेल्या क्लेदाला घर्षण म्हणजेच उद्वर्तन करून ह्या चूर्णाच्या सहायाने घासून मोकळे करायला मदत होते. शिवाय त्वचेखाली साचलेला मेद (अनावश्यक चरबी) ही कमी व्हायला मदत होते.
उद्वर्तन / उटणे वापरण्याचा विधी :
- बाजारातून उटणे विकत न घेता आपल्या आयुर्वेदीय डॉक्टरांकडून उटणे चूर्ण बनवून घेणे.
- त्वचा अधिक कोरडी असलेले / लहान मुलांसाठी – उटण्यामध्ये खोबरेल तेल किंवा दूध मिश्र करावे.
- तेलकट त्वचा असलेल्यांनी त्या चूर्णामध्ये पाणी / नारळाचे पाणी टाकून वापरावे.
- तेलाभ्यंग करून अर्ध्या तासाने हे उद्वर्तन / उटणे चूर्ण आपापल्या त्वचेनुसार योग्य द्रवातून सर्वांगाला घासावे. नंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी. आंघोळ करताना साबणाचा उपयोग मात्र टाळावा.
अभ्यंग कालावधी :
आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे रोज अभ्यंग करावे आणि शक्य नसल्यास निदान आठवड्यातून ३ – ४ वेळेस तरी किमान करावे. सकाळी प्रातः विधी संपवून अथवा रात्री झोपण्यापूर्वी करावे.
अभ्यांगाचे प्रकार आणि फायदे :
- शिरोभ्यंग – मस्तिष्क भागाला तेल लावणे. या मुळे डोकं शांत होते, ताण तणावापासून आराम मिळतो, शांत झोप लागते, मन एकाग्र होण्यास मदत होते.
- कर्ण पूरण – करंगळीला कोमट तेलामध्ये बुडवून दोन्ही कानामध्ये तेल लावणे. सोबत दोन्ही कानाच्या पाळीला तेल चोळणे. कान हे ही आयुर्वेदामध्ये वाताचे स्थान सांगितले आहे. शिवाय कर्ण इंद्रिय सक्षम राहण्यास मदत होते. शांत झोप लागते.
- नाभी पूरण – नाभी म्हणजेच बेंबी मध्ये मावेल एवढे कोमट तेल सोडून मग तेच तेल पोट आणि ओटी पोटावर हलक्या हाताने चोळून जिरवावे. पोट आणि आसमंतातील अवयवांचे त्रास कमी होण्यास मदत होते. अजीर्ण, गॅस होणे, शौचास साफ न होणे ह्या तक्रारींवर हमखास चांगला परिणाम दिसून येतो.
- पादाभ्यंग – दोन्ही पायांच्या तळव्यांना हाताने किंवा काश्याच्या वाटीने घासून तेल चोळून लावावे. ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, दृष्टीला बल प्रदान होते, ताण तणाव कमी होतो, शरीरातील कोरडेपणा नाहीसा होण्यास मदत होते, झोप शांत लागते.
- सर्वांग अभ्यंग – पूर्ण शरीराला तेलाने अभ्यंग / स्नेहन करावे. वात दोषाचे शमन होते, त्वचा टवटवीत दिसते, प्रसन्न वाटते, त्वचा ही स्निग्ध आणि कोमल वाटू लागते.
अभ्यंग तेल नियमित वापरण्याचे फायदे
- त्वचेचा कोरडेपणा नष्ट होतो.
- त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होण्याकरिता उपयोगी.
- त्वचा तेजस्वी आणि तरुण दिसते.
- रक्त संवहन सुधारते.
- वात दोषाचे शमन होऊन पुढे होणारे वात दोषामुळे रोग सहज टाळता येऊ शकतात.
- सहज शांत झोप लागते, शरीर आणि मन ताण तणावातून मुक्त होते.
उद्वर्तन / उटणे नियमित वापरण्याचे फायदे
- त्वचा कोमल बनते.
- त्वचेला निखार येतो.
- त्वचेचा वर्ण उजळतो.
- त्वचेवरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.
- चेहरा तेजस्वी, प्रसन्ना दिसतो.
- सुगंधी द्रव्यांमुळे मन प्रसन्न राहते.
- शरीरातील अनावश्यक मेद (चरबी / वजन) कमी होण्यास मदत होते.
नियमित अभ्यंग स्नान आणि उद्वर्तन / उटणे वापरल्याने प्रत्येकाला तरुण राहणे, ताण तणावमुक्त राहणे आणि प्रसन्न राहणे सहज शक्य आहे. ह्या उपचार पद्धतीला किंवा आयुर्वेदात वर्णित या दिनचर्येच्या उपक्रमांना आपलेसे करून घेतले तर निश्चितच आरोग्य रक्षण हा मंत्र दूर नव्हे. हेच उपचार आपण विविध केंद्रांमध्ये भरमसाठ खर्च करून घेण्यापेक्षा हा आपणच घरी करून आपलं आरोग्य ही निरोगी आणि प्रसन्न ठेवण्यास सहाय्य करू शकतो.
मुखलेप / फेसपॅक
चेहऱ्यावर बाहेरील धूळ, प्रदूषणामुळे आणि विविध केमिकल युक्त प्रसाधन साधनांचा वापर होत असल्याने चेहऱ्यावरील त्वचा ही दूषित होऊन चेहरा निस्तेज दिसू लागतो, सुरकुत्या पडतात. डाग, वांग, पुळ्या पिंपल्स या सारखे अनेक त्वचा विकार होत असतात.
मुखलेप / फेसपॅक नियमित वापरण्याचे फायदे
चेहऱ्यावरची त्वचा ही निरोगी रहावी , सतेज दिसावा यासाठी गुलाब, चंदन, रक्तचंदन, सारीवा आदी औषधी, वर्ण सुधारित करणाऱ्या वनस्पतींच्या सूक्ष्म चुर्णांनी युक्त हा मुखलेप चेहऱ्यावरील त्वचेचे रक्ताभिसरण सुधारित करून त्वचेचा वर्ण उजळतो.काळे वर्तुळ, डाग, वांग नाहीसे होण्यास मदत होते.
मुखलेप नियमित वापरण्याची विधी
आवश्यक मात्रेत मुखलेप चूर्ण घेऊन त्यात आपल्या त्वचा प्रकारानुसार (कोरडी त्वचा – साई युक्त दूध, कोरफडीचा ताजा गर / तेलकट त्वचा – पाणी, गुलाब जल) भिजवून थोडा जाडसर लेप करून मानेपासून वरच्या दिशेने हा लेप लावून सुकल्यावर साध्या कोमट पाण्याने किंवा पाण्यात भिजवलेल्या कापसाच्या बोळ्याने स्वच्छ करून घ्यावा.
मुखशुद्धी / मुखवास
आयुर्वेदामध्ये जेवण झाल्यानंतर अन्नाचे पचन सुव्यवस्थित व्हावे म्हणून तांबूल सेवन (पानाचा विडा) / मुखशुद्धी ही संकल्पना सांगितलेली आहे. यामध्ये बडीशेप, जीरा, दालचिनी, लवंग आदींसोबत काही आयुर्वेदीय औषधी चूर्ण यांचे मिश्रण असल्याने याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील वात – पित्त – कफ या दोषांचे पासून होणाऱ्या व्याधींपासून रक्षण करता येते.
मुखशुद्धी / मुखवास नियमित वापरण्याचे फायदे
- जेवणाचे सुयोग्य पचन होण्यास उपयुक्त.
- पोटातील गॅसच्या तक्रारीपासून मुक्तता.
- मुखरोग आणि दंतरोग या अवस्थेत गुणकारी.
- नियमित वापराने वजन नियंत्रण, आम्लपित्त, मलावरोध या मध्ये गुणकारी.
मुखशुद्धी / मुखवास नियमित वापरण्याची विधी
मुखशुद्धी चूर्ण हे एका हवाबंद डब्बीत / बाटलीत भरून ठेवणे.
दिवसभरात केलेल्या नाश्ता, जेवण या नंतर पाव ते अर्धा चमचा मुखशुद्धी चूर्ण चघळावे, त्या नंतर दाताखाली बारीक चावून खाणे.
कवच अर्क
भीमसेनी कापूर, ओवा अर्क, पुदिना अर्क, निलगिरी तेल युक्त शास्त्रशुद्ध औषध जे करते श्वसन मार्गाची शुद्धि, आपल्या मोहक सुगंधाने घर आणि मन प्रसन्न.
कवच अर्क नियमित वापरण्याचे फायदे
- सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी साठी उपयुक्त.
- श्वसन मार्ग शुद्धीसाठी.
- सुगंधाने घरात, मनात प्रसन्न वातावरण निर्मिती.
कवच अर्क नियमित वापरण्याची पद्धत
- नाक, कपाळ, कानाच्या पाळीला अत्तर प्रमाणे लावणे.
- वाफारा घेताना पाण्यात २ थेंब टाकावे.
- सर्दी, खोकला, असताना रुमालावर २ थेंब घेऊन हुंगणे. तसेच सध्या सतत मास्क वापरताना, मास्कच्या नाकाजवळ भागावर २ थेंब टाकावे.
- घरात सुगंधी धूप (diffuser) यंत्रात वापर.