अश्विनी नांदेडकर
या या सावित्रीने बरं नाही केलं ग बया
हिनं बाईला शिक्षित केलं ग बया
‘लोकशास्त्र सावित्री’ या नाटकातल्या या ओळी … यामध्ये ‘सावित्री’ आणि ‘शिक्षित केलं’ हे शब्द आपण कित्येक वर्षे ऐकत आलो आहोत. पण या शिक्षित शब्दाचा अर्थ आणि सावित्री होण्याचा मतितार्थ खरंच कळला आहे का? सावित्री ची जीवन गाथा, तिचा संघर्ष सर्वश्रुत आहे. मीही ऐकला होता, वाचला होता. पण खरंच तिची तेवढीच ओळख आहे का ? लोकशास्त्र सावित्री या नाटकाच्या निमित्ताने या ऐकण्या वाचण्याच्या पलीकडे सावित्रीच्या जगण्याचे सत्व मी अनुभवले. समाज, आपला देश घडवणाऱ्या थोर विचारकांच्या विचारांना ऐकण्यापेक्षा ते जगण्यात आणि आपले नवीन विचार निर्माण करण्यातच माणूसपण लपलेले आहे.
आज या विश्वात आत्यंतिक गरज आहे ती म्हणजे माणसाने माणूस म्हणून जगणे … या मध्ये कोणते लिंग , कोणती जात, कोणता धर्म या भेदाभेद नाहीच , तर या पलीकडे जाऊन निसर्गाच्या प्राकृतिक प्रकियांना आपलंसं करून न्यायसंगत सृजनकार म्हणून जगणं महत्वाचं.
सृजन म्हणजे आपल्या आत जन्म होणं … अंकुरणं. हे माणूसपण आपल्या आत अंकुरणं महत्वाचं. कारण केवळ बाहेरून माणुसकीचा चढवलेला मुलामा आपल्याला खोल गर्तेत घेऊन जातो.
सावित्री या साठी सावित्री झाली कारण ती माणूस म्हणून जगली. केवळ शिक्षित नाही तर अस्तित्व निर्माणाचे, घडवण्याचे आंदोलन लढली. आणि हे आंदोलन आजतागायत प्रत्येक जण कळत नकळत लढत आहेत. थिएटर ऑफ रेलेवन्सने रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित ‘लोकशास्त्र सावित्री’ या नाटकाच्या माध्यमातून सृजनकार आणि सावित्री यांचा समन्वय साधला. संकल्पना तर स्पष्ट होती की सगळ्यांना माहीत असलेल्या सावित्रीच्या संघर्षाची कथा दाखवायची नाहीये, तर माझ्या मध्ये, तुमच्यामध्ये सावित्री कुठे आहे? असा थेट प्रश्न या नाटकात विचारला आहे. माझ्यातल्या सावित्रीचा शोध घ्यायचा आहे. आम्हां कलाकारांचा हा ठाम विश्वास आहे की प्रत्येकात सावित्री जागी होते ,पण या जाणिवेचे काय करायचं हेच कळत नाही. त्या जाणिवेला पुढे नेण्यासाठी हे नाटक मार्ग दाखवते.
एक महिला म्हणून जन्माला येऊन माणूस म्हणून घडण्याचा प्रवास करतांना प्रत्येक स्त्रीला संघर्ष करावा लागतो. आणि अर्धाअधिक संघर्ष तर घरच्यांसोबत असतो. या संघर्षात सर्वात महत्वाची पायरी म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेणे. आज या खरेदी विक्रीच्या काळात, या जागतिकरणाच्या काळात ‘बाजार’ माझे आणि तुमचे निर्णय घेतो. आपण माणूस नाही तर खरेदी विक्रीपुरता मर्यादित प्रॉडक्ट बनतो. माणसाचे वस्तुकरण झाले आहे. अशा काळात माणूस आणि माणुसकी केवळ दुर्दम्य आशावाद बनलेला असतांना आम्ही लोकशास्त्र सावित्री नाटकाचे कलाकार माणुसकीची मशाल हाती घेऊन प्रेक्षकांच्या मनात ज्योत पेटवत आहोत.
बदल, परिवर्तन, बंडखोरी, क्रांती, विद्रोह हे केवळ शब्द नाहीत तर एक एक काळ आहेत. इतिहास आहेत , वर्तमान आणि भविष्यही आहेत. “मला काय करायचं? मी आणि माझं घर भलं” असा संकुचित विचार सावित्रीने केला नाही. अंगावर शेण आणि दगड झेलूनही ती ठामपणे आपल्या ध्येयासाठी उभी राहिली. सामंतवादी सत्तेला ,अस्पृश्यतेला , शारीरिक आणि मानसिक गुलामगिरीला अंकुश लावले. माणुसकी घडवण्यासाठी तिचं माध्यम होतं शिक्षण… आपण आज शिक्षित तर झालो, आपल्या मुलांनाही शिकवतो पण आपण सावित्री झालो का ? तिच्या ध्येयाला तिच्या विचारांना , तत्वाला किती आपलंसं केलं? केवळ शिक्षित होऊन माणूस नाही ना बनता येत. माझी बहिणाबाई ..अक्षर ओळख नव्हती तिला. पण तापलेल्या तव्याच्या चटक्यात तिला जीवनाची तत्व दिसली. कारण तिच्याकडे माणूस म्हणून जगण्याची दृष्टी होती .
सावित्री म्हणजे माणूस म्हणून जगणं आणि बहिणाबाई म्हणजे जीवनाचे तत्व. सावित्रीच्या आणि बहिणाबाई च्या चेतनेच्या प्रकाशात माझ्या जीवनातल्या व्यवहाराचा तिमिर दूर झाला. थिएटर ऑफ रेलेवन्स सिद्धांताच्या अंतर्गत छेडछाड क्यों या नाटकाने मला स्त्रीत्वाचा अभिमान दिला. आणि गर्भ नाटकाने माणूस म्हणून जगताना आपल्या भोवती निर्माण झालेल्या कोषांना अलगद दूर केले. कोणतेही नाते, कोणतेही अलंकार, कोणताही दबाव माझ्यातल्या मानवीय अस्तित्वाला झुगारु शकत नाही. माझ्या अधिकाराला, माझ्या हक्कांना आणि या सोबत माझ्या जबाबदारीला मिटवू शकत नाही. ही जाणीव सतत माझ्या आत तेवत असते आणि याची प्रचिती मला नेहमी येते. हरियाणा मधील एका गावात जिथे पितृसत्ताक मानसिकता टोकावर वसलेली असते. अशा ठिकाणी शिबिरांमध्ये आम्ही कलाकारांनी “मैं औरत हूं” नाटकाचा प्रयोग केला. या प्रयोगामुळे शिबिरार्थीचा प्रतिसाद मिळाला की आमच्यात त्यांना माणूस दिसला. स्त्री देहाच्या पलीकडे जाऊन माणूसपण जगणं त्यांनी अनुभवलं.
आज जगातल्या कोणत्याही स्त्रीला विचारले की तिला नेमके काय हवं ? तर तिचं एकच उत्तर आहे की मला माणूस म्हणून जगायचंय आहे. आणि ही यात्रा केवळ स्त्रीची नाही तर पुरुषाची ही आहे. मी कलाकार किंवा व्यक्ती म्हणून प्रेक्षकांना हा प्रश्न विचारते की ते स्त्री म्हणून जगतात? पुरुष म्हणून जगतात? की माणूस म्हणून जगतात? अशावेळी नकळत त्यांच्या मधल्या सावित्रीला म्हणजेच माणूस घडण्याच्या चेतनेला स्पर्श होतो. समाजाने , पितृसत्ताक मानसिकतेने बांधून दिलेल्या स्त्री पुरुषाच्या चौकटीला भेदून माणूस म्हणून जगण्याची उन्मुक्तताच आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ सांगते.
सावित्रीबाई फुले म्हणजे सांस्कृतिक सृजनकाराचा सूर्य, प्रेमाच्या क्रांतीची मशाल जी पाखंड, अज्ञानता, पितृसत्ता, सामंतवाद, धर्मांधता यांच्या विरोधात उभी राहिली. आणि त्या सृजनेच्या मशालीची धग, प्रकाश आजही प्रत्येकाच्या जीवनाला उजळून टाकतोय. आजही पितृसत्ताक मानसिकता,धर्मांधता आजही पूर्णपणे नष्ट नाही झाल्यात. आजही स्त्री पुरुष शिक्षित होऊनही त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न सुटलेला नाही.आज आपण भौतिक सुखांच्या विकासाकडे वेगाने मार्गक्रमण करत आहोत. पण माणुसकीच्या आत्मिक समाधानाकडे सहज पाठ फिरवली आहे. आणि म्हणूनच माझ्या तुमच्या मनातल्या क्रांतीज्योतीचा सावित्रीचा जन्म होणं ही काळाची नितांत गरज आहे. लोकशास्त्र सावित्री हे नाटक जनमानसाचे नाटक आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये त्याच्या किंवा तिच्या मनातली सावित्री गळते अशावेळी पाठीचा कणा ताठ ठेऊन माणूस म्हणून कसं जगावं या विचारांना हे नाटक दिशा देतं. तर मग चला आपल्या मनातल्या सावित्रीला , बहिणाई ला जाग करू आणि या समाजात, देशात या विश्वात माणुसकीचे सत्व निर्माण करू. आपल्या स्वप्नातलं माणुसकीचे जग घडवू..
सावित्रीच्या जागर
माणुसकीचा एल्गार
जागराला या हो जागराला या
माणुसकीच्या जागराला या
(अश्विनी नांदेडकर या रंगभूमीच्या सेवेला वाहून घेतलेल्या अभिनेत्री आहेत.)