मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने सागरमाला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील चार नवीन जेट्टी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब अपोलो बंदर, जंजीरा बंदर, पद्मदुर्ग बंदर व सुवर्णदुर्ग येथील बंदरांचा समावेश आहे. राज्यातील जलवाहतूक वाढणार असून याचा लाभ प्रवासी, मालवाहतूक आणि पर्यटकांना होणार आहे. जलवाहतूक सुरू होणार असल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याची माहिती बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यातील बंदरांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी ११ सप्टेंबर २०२२ रोजी केंद्रीय पत्तन, पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बांनंद सोनोवाल यांना विनंती केली होती. राज्य सरकारच्या प्रस्तावाला तत्काळ प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी या चारही प्रकल्पांना मंजुरी दिली. सागरमाला प्रकल्पांच्या खर्चामध्ये ५० टक्के खर्च राज्य सरकार आणि ५० टक्के केंद्र सरकार करणार आहे. केंद्र सरकारने या चार प्रकल्पासाठी ३१२ कोटी रूपये मंजूर केल्याची माहितीही दादाजी भुसे यांनी दिली. याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
जंजीरा किल्ला (ता. मुरूड) येथे जेट्टी बांधणे आणि जलरोधक (ब्रेक वॉटर) उभारणे, पद्मदुर्ग (ता. मुरूड) आणि सुवर्णदुर्ग (ता. दापोली)) येथे जेट्टी बांधणे आणि गेट ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब येथे नवीन जेट्टी उभारणे या सर्व जेट्टी बांधण्याचे काम २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहितीही दादाजी भुसे यांनी दिली.
मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाच्या बाजूला रेडिओ क्लब जेट्टीची उभारणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी १०० गाड्यांची पार्किंग व्यवस्था असेल. पर्यटकांना पाहण्यासाठी स्कॉयवॉक वे सुद्धा बनविण्यात येणार आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी होणार कमी
मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाजवळ केवळ पाच प्रवासी बोटी लावता येतात. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने नवीन बंदरावर २० बोटी लावण्याची सोय करण्यात येणार आहे. यामुळे नागरिक, प्रवासी आणि पर्यटकांना सोयीचे होणार आहे. गेट वे वरून सर्व प्रवासी बोटी सोडता येणार आहेत. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असेही दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.
सागरमाला प्रकल्पांमध्ये सध्याची बंदरे आणि टर्मिनल्सचे आधुनिकीकरण, नवीन बंदरे, टर्मिनल, रो रो आणि पर्यटन जेटी, बंदर जोडणी वाढवणे, आंतरदेशीय जलमार्ग, दीपगृह पर्यटन, बंदराभोवती औद्योगिकीकरण, कौशल्य विकास, तंत्रज्ञान केंद्रे इत्यादी विविध श्रेणीतील प्रकल्पांचा समावेश आहे. किनारपट्टी पर्यटन व मनोरंजनसंबंधी कार्यक्रमास प्रोत्साहन देणे यासंबंधी विचार करण्यात येणार आहे, असेही मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.