मुक्तपीठ टीम
हिमाचल प्रदेशातील शेतकरी हरिमन शर्मा यांनी स्व-परागण करणारे सफरचंदाचे एक कलम विकसित केले आहे. या कलमाला फुल येण्यासाठी आणि फळे लागण्यासाठी थंड वातावरणाची गरज भासत नाही. त्यांनी तयार केलेले सफरचंदाचे कलम भारतातील विविध मैदानी प्रदेश, उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात लागवड शक्य असणार आहे. अगदी महाराष्ट्रासारख्या उन्हाळ्यात तापमान ४० ते ४५ डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचणाऱ्या राज्यांमध्येही या सफरचंदाची लागवड शक्य आहे. काही राज्यांमध्ये तर सुरुही झाली आहे.
मणिपूर, जम्मू, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि तेलंगणातील सखल भागांमध्ये या प्रकारच्या सफरचंदांच्या कलमांची व्यावसायिक लागवड सुरू झाली आहे. आतापर्यंत या सफरचंदाच्या कलमांची लागवड २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील पानियाला या गावचे शेतकरी हरिमन शर्मा यांनी, एचआरएमएन ९९, हे सफरचंदाचे कलम विकसित केले आहे. हरिमन शर्मा यांनी केवळ परिसरातीलच नव्हे तर अनेक राज्यातील इतर डोंगराळ जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना मदत केली आहे. ते शेतकऱ्यांसाठी प्रेरणा स्त्रोत बनले आहेत कारण, जे लोक यापूर्वी कधीही सफरचंदाची शेती करण्याचे स्वप्नही पाहू शकत नव्हते त्यांना ही शेती करणे शक्य झाले आहे.
लहानपणीच अनाथ झालेल्या हरिमन यांना त्यांच्या काकांनी दत्तक घेतले आणि त्यांचे पालनपोषण केले. त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्यांनी शेतीत स्वत: ला झोकून दिले. हे त्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. बागायती लागवडीची आवड असल्यामुळे ते सफरचंद, आंबा, डाळिंब, किव्ही, मनुका, जर्दाळू आणि कॉफी अशी विविध पिके त्यांच्या शेतात घेतात. त्यांच्या लागवडीतील सर्वात वेगळेपण असे की ते एकाच शेतात आंब्याबरोबर सफरचंद पिकवू शकतात. शेतकरी हिमाचल प्रदेशाव्यतिरिक्त इतरत्रही सफरचंदाची लागवड करू शकतात.
१९९८ मध्ये हरिमन शर्मा यांनी बिलासपूरच्या घुमारवी गावातून काही सफरचंद खरेदी केले आणि बिया आपल्या घराच्या मागील बाजूस फेकून दिल्या. १९९९ मध्ये, त्यांना घराच्या मागील अंगणात एक सफरचंदाचे रोप उगवलेले दिसले, जे त्याने मागील वर्षी फेकलेल्या बियांपासून उगवले होते. फलोत्पादनात रस असणारा प्रायोगिक शेतकरी असल्याने त्यांना हे लक्षात आले की, समुद्रसपाटीपासून १८०० फूट अंतरावर पानियालासारख्या उबदार ठिकाणी उगवणारे सफरचंदाचे हे कलम वेगळे आहे. एका वर्षानंतर, रोप बहरण्यास सुरुवात झाली आणि २००१ मध्ये त्याला फळे आली. त्यांनी त्या कलमाला “मदर प्लांट” म्हणून जपले आणि त्यावर प्रयोग करण्यास सुरवात केली. २००५ पर्यंत सफरचंदच्या झाडाची एक छोटी बाग तयार केली, ज्याला अजूनही फळे येत आहेत.
२००७ ते २०१२ पर्यंत हरिमनने इतर ठिकाणी प्रवास केला आणि आपल्या वाणाचा प्रचार केली. इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला, की थंड वातावरण नसतानाही सफरचंद उगवणे आता शक्य आहे. तसेच, त्यावेळी सफरचंदांच्या या विविध प्रकाराविषयी संशोधन व प्रसारामध्ये फारसा रस नव्हता. अखेर, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन (एनआयएफ) या स्वायत्त संस्थेद्वारे, सफरचंदाच्याच्या या नवीन जातीची दखल घेण्यात आली.
पाहा व्हिडीओ: