अनिल गलगली
एकनाथ महादेव गायकवाड या नावात एक वलय होते आणि जनसामान्यांना आपलंसं वाटणारे असे असामान्य नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष असताना त्यांची मुंबई प्रेस क्लब जवळील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आठवड्यातून भेट होत होती. एकदा मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात मुंबईकरांच्या मनात काँग्रेस कशी उभारी घेऊ शकते? यावर चर्चा करताना गायकवाड यांनी एक वेळ ठरविली आणि मुद्देसूद चर्चा करण्याचे निश्चित केले. पण दुर्दैवाने आजमितीस ती भेट झालीच नाही. विविध कारणांमुळे भेट लांबत गेली आणि आज त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कळली.
सातारा येथे १ जानेवारी १९४० रोजी जन्मलेले एकनाथ गायकवाड यांनी २ वेळा राज्यमंत्री पदे भूषविली आणि २ वेळेस खासदार होते. उच्च विचारसरणी आणि साधी राहणीमान यात विश्वास करणारे एकनाथराव यांची कार्यकुशलता आणि कार्यकर्त्यांना ओळखण्याची कल्पकता एकदम वेगळी होती. १९८५ साली पहिल्यांदा धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार बनलेले गायकवाड काँग्रेस पक्ष आणि त्यातच गांधी कुटूंबियांशी एकनिष्ठ होते. वर्ष १९९३-९५ आणि वर्ष १९९९-२००४ या दरम्यान त्यांनी राज्यमंत्री या नात्याने आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च व तंत्र शिक्षण अशी विविध खाती भुषविली होती.
वर्ष २००४ ला तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना लोकसभा मतदारसंघात पराभूत करत गायकवाड हे जायंट किलर बनले होते. त्यावेळी ते निवडून येतील आणि खासदार बनतील, हे त्यांनी सुद्धा स्वप्नात पाहिले नव्हते. मनोहर जोशी यांनी साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा वापर केला आणि देशातील सर्व दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी पाचारण केले होते. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही जोशींच्या विजयाची चर्चा करत होते. त्यावेळी नेहरूनगर मतदारसंघाने गायकवाड यांना विजयश्री खेचून आणण्यात मोलाची भूमिका निभावली होती. सद्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक ज्यांनी नेहरूनगर विधानसभा मतदारसंघात जीवाचे रान केले होते, त्यांनी जेव्हा दूरध्वनी करुन गायकवाड यांना विजयाची बातमी कळविली तेव्हा गायकवाड यांना सुद्धा विजयाचा विश्वास बसला नव्हता.
वर्ष २००० ला माझ्या एका मित्राचे आर्युवेदसंबंधित एक काम होते. मी सकाळी त्यांच्या बंगल्यावर पोहचलो तेव्हा गायकवाड हे बंडी आणि लुंगीवर बाहेर आले आणि एका मिनिटात निवेदन घेत संबंधितांना ते निवेदन अग्रेषित करण्याचा सूचना दिल्या. माझा मित्र अचंबित झाला की एक राज्यमंत्री किती सरळ आणि साधा आहे ज्याने एका मिनिटात निर्णय घेतला. व्यक्ती कोणत्याही समाजाची असो, ते सर्वाचा आदर करायचे. उदाहरण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले उमाशंकर ओझा. गायकवाड त्यांना नेहमीच पंडितजी म्हणायचे. वीरेंद्र बक्षी, वीरेंद्र उपाध्याय ही त्यांचे आवडते पंडितजी होते. राजहंस सिंह यांस ते ठाकूर म्हणून संबोधित करायचे. त्यांच्या अश्या प्रकारच्या भाषेत एक जवळीक असायची आणि समोरची व्यक्ती त्यास आदराच्या भावनेतून सहजपणे स्वीकारायचे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी खटल्यात राहुल गांधी यांच्याविरोधात शिवडी कोर्टात सुनावणी सुरु होती. त्यावेळी राहुल गांधी कोर्टात हजर राहिल्यानंतर राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलं होतं. १५ हजाराच्या हमीनंतर कोर्टाने राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केले होते आणि कोर्टात ही हमी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी दिली होती. गांधी कुटूंबियांच्या कामी आलो,ही भावना त्यांच्यात होती आणि ते नेहमीच ही बाब गर्वाने चर्चेत सांगत असत.
सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड शेवटपर्यंत विक्रोळीत राहिले होते पण धारावीवर त्यांची पकड किंचितही कमी झाली नाही. धारावी मतदारसंघात त्यांचा भक्कम जनसंपर्क होता आणि त्यामुळे आज मोदी लाटेमध्ये सुद्धा वर्षा गायकवाड सहजपणे निवडून आल्या. धारावीतील प्रत्येक घराघरांतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड यांचे दलित चळवळीशी सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना आपले मानत होते. रिपब्लिकन असो किंवा मराठा नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते. विशेष म्हणजे त्यांच्या पुढाकाराने विक्रोळी येथे राजश्री शाहू कॉलेज ऑफ लॉ ची उभारणी करण्यात आली आणि आज हे महाविद्यालय विधी क्षेत्रात नामांकित आहे.
विक्रोळी येथे राजश्री शाहू कॉलेज ऑफ लॉ च्या एका कार्यक्रमात मी आणि एकनाथ गायकवाड हे मुख्य अतिथी होतो. गायकवाड यांनी दीप प्रज्वलित करुन त्यांनी मोठेपणा दाखवित घोषणा केली की अनिल गलगली आहेत येथे, हे माझ्यापेक्षा उत्तम मार्गदर्शन करतील. स्पष्टपणे असे जाहीर मंचावरून बोलणारे क्वचितच असतात. जाहीर मंच असो किंवा खाजगी चर्चा, एकनाथ गायकवाड हे आपल्या विचारांशी नेहमीच एकनिष्ठ राहिले. ओठात एक आणि पोटात एक, असे कधी घडलेच नाही. ते पोटतिडकीने बोलत असत आणि एकदा बोलल्यावर परिणामांची पर्वा केली नाही. जेव्हा ते भाषण करत असे, कधीच समोरचा व्यक्ती भरकटत नसे. एका सुरात आणि भारदस्त आवाजात विरोधकांवर ते तुटून पडायचे आणि त्यांची हीच शैली कार्यकर्त्यांना आवडायची. शिवसेना- भाजपा सरकारच्या काळात तर झुणका भाकर केंद्र वाटप आणि त्यातील सावळागोंधळ हा त्यांचा भाषणातला नेहमीच महत्वाचा मुद्दा असायचा.
एकनाथ गायकवाड यांच्या निधनानंतर आता सर्व जबाबदारी वर्षा गायकवाड यांच्यावर आहे. त्या राजकीय वारस ही आहेत आणि प्रत्येकाला जवळून ओळखतात. कोरोना काळ नसला असता तर आपल्या या लोकप्रिय नेत्यांला श्रद्धांजली देण्यासाठी संपूर्ण धारावी नक्कीच जमली असती, यात शंका नाही.
(अनिल गलगली हे माहिती अधिकार क्षेत्रातील अभ्यासू आणि ज्येषअठ कार्यकर्ते आहेत. ते मुंबईच्या पत्रकार क्षेत्रातही गेली तीन दशके सक्रिय आहेत.)
फारच चांगल्या पद्धतीने आदरांजली अर्पित केली आहे. कै. एकनाथ गायकवाड हे उत्तम वक्ते आणि चांगलं व्यक्ती होते. सर्वसामान्यांना नेहमीच ते आपलं वाटत असे. धन्यवाद #अनिलगलगली आणि #मुक्तपीठ 💐