मुक्तपीठ टीम
अखेर गेले बरेच दिवस सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय नाट्यमय घटनाक्रमात एक मोठी घटना सोमवारी रात्री घडली. मनी लाँड्रिंगचे आरोप ठेवण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी रात्री उशिरा अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने अटक केली. तेरा तासांहून अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना गजाआड करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना झालेल्या अटकेनंतरची ही महाराष्ट्रातील राजकारण्याविरोधात झालेली सर्वात मोठी कारवाई आहे. या अटकेनंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना आता पुढील कारवाई शंभर कोटींच्या मास्टरमाइंडविरोधात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अनिल देशमुख त्यांच्या वकिलासह सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता ईडीसमोर हजर झाले. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. सकाळी दहानंतर त्यांची आरोग्.य तपासणी केली जाईल. त्यानंतर दुपारपर्यंत त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
अनिल देशमुखांवर काय आहेत आरोप?
- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरुद्ध पोलिस अधिकाऱ्यांमार्फत दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली केल्याची तक्रार केली होती.
- मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीचे निर्देश दिले होते.
- हा आदेश आल्यानंतरच सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात प्राथमिक चौकशी सुरू केली आणि त्यांना महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
- दरम्यानच्या काळात यातील प्रचंड मोठ्या प्रमाणावरील आर्थिक व्यवहारांच्या आरोपांमुळे ईडी चौकशीही सुरु झाली.
- अनिल देशमुखांच्या नागपूरमधील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शेकडो कोटींची अफरातफर झाल्याचेही आरोप झाले.
- ईडीने आतापर्यंत या प्रकरणी चौकशीसाठी अनेक ठिकाणी धाडीही घातल्या.
- ईडीने किमान पाच वेळा देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.
- गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.
- अखेर सोमवारी सकाळी अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले.
- त्यांची ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यव्रत कुमार यांच्या टीमने सतत १२ तास चौकशी केली.
- रात्री त्यांच्या अटकेचा निर्णय घेण्यात आला.
शुक्रवारीच हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती, ज्यामध्ये त्यांनी ईडीने पाठवलेले समन्स रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती नितीन जमादार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने सीबीआय आणि ईडीला त्याच्यावर कठोर कारवाई करण्यापासून रोखणाऱ्या आदेशासाठी देशमुख यांची याचिका पात्र नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, न्यायालयाने त्यांना थोडा दिलासा देत देशमुख यांना अटकेची भीती वाटत असेल, तर ते टाळण्यासाठी ते सामान्य माणसाप्रमाणे योग्य न्यायालयात जाऊ शकतात, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर देशमुखांनी ईडी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.
देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग म्हणाले की, या प्रकरणाशी संबंधित प्रकरणाच्या तपासात आम्ही सहकार्य केले आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता आम्ही त्याच्या कोठडीला विरोध करू.
अनिल देशमुखांचा ईडीकडे जाण्यापूर्वी सवाल – तक्रारदार परमबीर कुठे आहेत?
- सोमवारी ईडीसमोर हजर होण्यापूर्वी देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ आणि पत्र जारी केले.
- उच्च न्यायालयाने मला घटनात्मक अधिकारांतर्गत विशेष न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
- पण तरीही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन तपासात सहकार्य करणार आहे.
- ईडीसमोर हजर होण्यापूर्वी देशमुख यांनी परमबीर सिंग यांच्या तक्रारीची चौकशी केली जात आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला.
- यामध्ये सहकार्य करण्यासाठी तो ईडीसमोर हजर होत आहे. मात्र तक्रारदार परमबीर सिंग कुठे आहेत? ते परदेशात पळून गेल्याचे ऐकिवात आहे.