मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आपल्या भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेनंतर आता कोल्हे Why I Killed Gandhi या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची साकरल्याने चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. अमोल कोल्हेंचा हा चित्रपट येत्या ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कोल्हे यांच्या या चित्रपटाच्या भूमिकेवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी निषेध केला असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र अमोल कोल्हे यांना थेट समर्थन दिलं आहे.
नेमकं काय दाखवलं आहे चित्रपटात?
- Why I Killed Gandhi असं या सिनेमाचं नाव असून हिंदी भाषेत तयार करण्यात आलेला हा एक माहितीपट आहे.
- अशोक त्यागी हे या सिनेमाची दिग्दर्शक असून कल्याणी सिंह यांनी या सिनेमाची निर्मितीत केली आहे.
- तर अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे.
- १९६४ साली भारतीय सरकारनं गांधीजींच्या हत्येची कारणं शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे.एल.कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता.
- या आयोगानं आपल्या अहवाल १९७० साली सादर केला होता.
- या अहवालाच्या आधारेच या सिनेमाची सुरुवात होते.
- या चित्रपटात बोलला जाणारा प्रत्येक शब्दांनशब्द हा कायदेशीर कागदपत्रांमधून घेतलेल्या शब्दांचा अनुवाद असल्याचं सांगितलं जातंय.
- एकूण ४५ मिनिटांची ही फिल्म आहे.
- ३० जानेवारी १९४८ या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती.
- दरम्यान, येत्या ३० जानेवारी ३० तारखेलाच हा सिनेमाता प्रदर्शित होणार आहे.
नेमकं काय म्हणालेत अमोल कोल्हे?
मी आणि नथुराम गोडसे ही भूमिका –
- २०१७ साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डॉक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.
- कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे.
- मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
- कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा!
- याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा!
एक अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो-चंद्रकांत पाटील
- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, “एक अभिनेता म्हणून त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका करणं यात मला काही चुकीचं वाटत नाही.
- ते नथुराम गोडसेच्या विचाराच्या बाबतीत समंत आहेत का हे त्यांनी एकदा जाहीर करावी.
- ती विरोधाची भूमिका मावळली का हा मुद्दा आहे”.
- “अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो.
- नथुराम गोडसेची करु शकतो…अफझल खानाचीही करु शकतो.
- त्याला काय होतं.
- म्हणजे मला नथुराम गोडसे अफझल खान आहे असं म्हणायचं नाही.
- सध्या संवदेनशील वातावरण असल्याने कशावरुनही वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे अफझल खान बाजूला ठेवू. पण एक अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो”.
आव्हाडांचा विरोध
- अमोल कोल्हे यांनी जरी कलाकार म्हणून ही भूमिका साकारली असली तरी त्यात गोडसेचं समर्थन आलंच. आणि मी गोडसेंच्या कृतीचं, गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही.
- माझा अमोल कोल्हेंच्या गोडसेची भूमिका साकारण्याला विरोध आहे.
- “विनय आपटे, शरद पोंक्षे यांना या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने प्रचंड विरोध केला त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार.
- “कलाकार आणि माणूस दोन वेगळ्या भूमिका नाहीत. पण जेव्हा गांधी साकारता भूमिका बदलत नाही कारण ती वैचारिक भूमिका आहे.
- नथुराम महाराष्ट्राला लागलेला डाग आहे.
- कलाकार म्हणून अमोल कोल्हे महान आहेत, पण त्यांनी केलेल्या अभियानाचा विरोध आहे
जयंत पाटील यांनी कोल्हेंच्या सिनेमाला विरोध केला आहे.
- तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे.
- नथुरामचं समर्थन करत नाही.
- कोणी करू शकत नाही.
- भूमिका केली म्हणजे समर्थन होत नाही
- तसेच आव्हाडांची भूमिका योग्यच आहे.
- जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
- अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये ‘त्या’ सिनेमामध्ये भूमिका केली आहे.
- त्यामुळे नोटीस काढायची व या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही.
- तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे.
एक अभिनेता म्हणून पाहिलं जावं – राजेश टोपे
- राजेश टोपे म्हणाले की, ‘Why I killed Gandhi’ हा साधारणपणे ४५ मिनिटाचा चित्रपट आहे.
- हा चित्रपट प्रदर्शित होतोय असं कळतंय.
- आजच अमोल कोल्हे माझ्याकडे तास दोन तास होते.
- त्यांच्या मनातील एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो ते पुण्यात करु पाहत आहेत, त्यबाबतची बैठक होती.
- त्यानंतर त्यांनी मला ती क्लिपही दाखवली ज्यात त्यांनी नथुराम गोडसेचा रोल केलेला आहे.
- अमोल कोल्हे यांची ओळख ही एक अत्यंत चांगला, लोकप्रिय, गुणी अभिनेता म्हणून आहे. आपल्या सर्वांनाच अभिमान वाटावा असा गुणी कलाकार आपल्या महाराष्ट्रात आहे.
- त्यांची संभाजी नावाची मालिका सुरु होती. त्यावेळी सर्वजण ती मालिका पाहत.
- एक अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे.
- त्यांनी नथुराम गोडसेचा रोल जरी केला असला तरी तो एक अभिनेता म्हणून त्याकडे पाहिलं जावं, अशी विनंती मला महाराष्ट्रातील जनतेला करायची आहे.
- निश्चितप्रकारे आपण त्यांच्या कलेचं कौतुक केलं पाहिजे, असं राजेश टोपे यांनी मांडलं आहे.
अमोल कोल्हे यांची कलेशी बांधिलकी-बाबासाहेब पाटील
- ‘अमोल कोल्हे यांची कलेशी बांधिलकी आहे. त्यानुसार ते ही भूमिका साकारत आहेत.
- परंतु त्यांची वैचारिक बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्षाच्या वैचारिक भूमिकेशीच आहे, याबाबत आमच्या मनात कोणताही संदेह नाही.
- शरद पोंक्षे नथुराम गोडसेची भूमिका त्या विचारांच्या प्रचारासाठी साकारतात तर अमोल कोल्हे कलाकार म्हणून कलेशी असलेल्या बांधिलकीतून ही भूमिका साकारताहेत, हा त्यातील मुलभूत फरक आहे.
- त्यामुळे त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारण्याला आमचा विरोध नाही.
शरद पवारांचे समर्थन
- शरद पवारांनी अमोल कोल्हेंचं समर्थन केले आहे.
- गांधी सिनेमा जगात गाजला.
- त्यामुळे जगात गांधींना महत्त्व आलं.
- त्या सिनेमात कुणीतरी गोडसेची भूमिका केली.
- ती भूमिका करणारा आर्टिस्ट होता.
- नथुराम गोडसे नव्हता.
- कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे.
- शिवाजी महाराज आणि औरंगजेब संघर्ष झाला.
- शिवाजी महाराजांच्या सिनेमात जर कुणी शिवाजी महाराजांची भूमिका घेत असेल आणि कुणी औरंगजेबाची भूमिका करत असेल तर औरंगजेबाची भूमिका करतो म्हणून तो मोगल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही.
- तो कलावंत म्हणून भूमिका करत असतो.
- किंवा रामराज्यातील सिनेमा असेल तर राम रावणाचा संघर्ष असेल रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही.
- तो कलाकार असतो.
- सीतेचं अपहरण दाखवलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही.
- रावणाचा तो इतिहास या माध्यमातून दाखवला जातो, असं सांगतानाच अमोल कोल्हेंनी भूमिका साकारली असेल तर ती कलावंत म्हणून केली आहे.
- त्याकडे कलाकार म्हणूनच पाहिलं पाहिजे.
हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही- नाना पटोले
- “अमोल कोह्ले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते फक्त कलाकार नाहीत.
- विशेष करुन गोडसेच्या विचाराला ताकद मिळणं म्हणजे देशविघात व्यवस्थेला ताकद मिळण्यासारखं आहे.
- अशा प्रवृत्तीला समाजामध्ये हिरो बनवण्याचा प्रयत्न जर झाला असेल तर हे चुकीचं आहे.
- या देशाला फक्त महत्वा गांधींचाचा विचार तारु शकतो.
- त्याच विचारांनी हा देश जागतिक महासत्ता होऊ शकतो हे सातत्याने सिद्ध झालेलं आहे.
- गोडसे प्रवृत्तीने देश तुटेल.
- म्हणूनच अशा विघातक विचाराला हिरो बनवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो.
- त्याच प्रमाणे हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही.
- शरद पवारांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं
कलाकाराला कुठलंही बंधन असू नये- बाळासाहेब थोरात
- कलाकार हा कलाकार असतो. पण, या चित्रपटातूननथुराम गोडसेचे उदात्तीकरण होऊ नये.
- कलाकाराला कुठलंही बंधन असू नये.
- मला खात्री आहे, की उदात्तीकरण करणारी भूमिका कोणीही घेणार नाही.
- ज्या नेतृत्वामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यांच्या विचारामुळे देश प्रगती करतो आहे, त्यांच्याविरोधात भूमिका घेतली नसेल अशी अपेक्षा आहे.
कलाकार हा कलाकार असतो-अस्लम शेख
- ‘ते कलाकार आहेत.
- एक कलाकार आपली कलाकारी त्यांना मिळणाऱ्या रोलवर करतो.
- त्यांनी देवाचा रोल केला तर तो काही देव होत नाही.
- हिरो, गुंड, डान्सर किंवा कॉमेडियन असू द्या… कलाकार हा कलाकार असतो, त्याला राजकारणाशी जोडणं योग्य नाही.
कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा- विश्वंभर चौधरी
पोंक्षे यांनी ‘ती’ भूमिका करण्याला विरोध नव्हता. दोन गोष्टींना विरोध होता. एकतर नाटकात असत्य आणि तिरस्कार ठासून भरला होता, इतिहासात जे घडलं नाही ते ही दाखवलं होतं. (वाचा: नथुरामायण- लेखक य.दि.फडके).
दुसरं म्हणजे नाटकातली भूमिका प्रत्यक्ष आयुष्यात थोडी अधिकच भडकपणे पोंक्षे वठवत होते, नव्हे आजही वठवतात. अन्यत्र त्यांनी केलेली विधानं तपासा. आयपीसीखाली ती ‘चिथावणी’च्या गुन्ह्यात मोडणारी आहेत. कलाकार म्हणून कला दाखवा हो, पण मग नागरिक म्हणून चांगलं नागरिकत्वही दाखवा.
पोंक्षे हिंदुत्ववादी म्हणून विरोध होता हा आक्षेपही खरा नाही. नथुरामाच्या बाबतीत नट तर सोडा, राजकारणीही उदात्तीकरण करून बोललेले आहेत. (ऐका: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात नव्वदीच्या दशकात बाळासाहेबांनी केलेली भाषणं).
नथुरामाचे पुतळे उभारले पाहिजेत असं प्रत्यक्ष आजचे बिनीचे फुशाआवादी छगन भुजबळ म्हणाले होते. तात्पर्य काय तर नथ्थूचं उदात्तीकरण ही महाराष्ट्रात रुटीन बाब आहे.
तेव्हा नथुरामची समजा नुसतीच नाटकात भूमिका करून पोंक्षे बाजूला झाले असते तर टीका झालीही नसती. राष्ट्रपिता मानत नसाल तरी आयपीसीखाली एक खुनाचा गुन्हा घडला आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष जीवनात त्याचं समर्थन करता म्हणजे गुन्हा घडल्यानंतरही तुम्ही त्या गुन्ह्याला मदत करत असता आणि असे गुन्हे घडवण्याला प्रोत्साहन देत असता. आक्षेप त्यासाठी होता.
कोल्हेंनी नथुरामाची भूमिका करणं हा त्यांच्या व्यक्तीगत म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण नथुरामाचा राज्यघटनेवर विश्वास नव्हता, मग इकडे नथुरामाची भूमिका जगायची आणि तिकडे त्याला मान्य नसलेल्या राज्यघटनेप्रमाणे खासदार रहायचं हा संघर्ष मनातल्या मनात होऊ नये म्हणून खासदारकीचा राजीनामा देणं योग्य ठरेल. मला खात्रीच आहे की ही नैतिक द्विधा त्यांना मनातून त्रास देत राहील.
अर्थात कोल्हेंचा पक्ष हा मानांकित पुरोगामी आणि त्यातही खराखुरा गांधीवादी पक्ष असल्यानं काहीतरी मार्ग निघेलच. म्हणजे एक मार्ग असाही असू शकतो की प्रत्येक प्रयोगानंतर कोल्हेंनी पत्रकार परिषद घेऊन मी कालच्या भूमिकेशी तत्त्वतः आणि पक्षतः सहमत नाही असा खुलासा करावा. किंवा सबटायटलमध्ये ‘कोल्हे यांचा राष्ट्रवादीशी फक्त राजकीय संबंध असून वैचारिक संबंध नाही’ अशी तळटीप सतत दाखवावी.