मुक्तपीठ टीम
शेअर मार्केट म्हटलं की राकेश झुनझुनवालांचं नाव आठवणार नाही असं होत नाही. त्यांना भारतीय शेअर बाजारातील ‘बिग बुल’ म्हणूनही ओळखलं जातं. ते जेव्हा या क्षेत्रात आले तेव्हा ५ हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी प्रवास सुरू केला. आता त्यांनी १९ हजार कोटी रुपयांचं अवाढव्य साम्राज्य उभारलं आहे. आता त्यांनी विमान कंपनीच्या माध्यमातून आकाशात भरारी घेण्याचं ठरवलं आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी स्वत:च्या अकासा एअरलाइन्सची स्थापना केली. त्याचे नाव असे ठेवले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डीजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळालं आहे. याच महिन्यापासून विमान कंपनीची व्यावसायिक उड्डाणे सुरू होणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.
अकासा एअरने दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइनच्या ऑपरेशनल तत्परतेच्या संदर्भात सर्व आवश्यकतांची पूर्तता केल्यानंतर त्यांना एओसी प्राप्त झाले आहे. डीजीसीएच्या देखरेखीखाली विमान कंपनीने अनेक चाचणी उड्डाणे यशस्वीपणे पार पाडली आहेत.
अकासा एअरविषयी सर्वकाही…
- स्टॉक मार्केट दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरला २१ जून रोजी त्यांच्या पहिल्या बोईंग 737 MAX विमानाची डिलिव्हरी मिळाली होती.
- अकासा एअरचे संस्थापक-मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे म्हणाले, “जुलै अखेरपर्यंत आमची व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याचा आमचा बेत आहे.“
- ही पहिली एअरलाइन आहे जिची संपूर्ण एओसी प्रक्रिया सरकारच्या प्रगतीशील इजीसीए डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण झाली आहे.
- अकासा एअरने सांगितले की दोन विमानांसह त्यांच्या व्यावसायिक ऑपरेशन्सना सुरूवात केली जाईल.
- दर महिन्याला ते आपल्या ताफ्यात नवीन विमानांची भर घालणार आहेत.
आकासा एअरचे पहिले बोइंग ७३७ मॅक्स विमान २१ जून रोजी नवी दिल्लीत पोहोचले. विमान कंपनीने अधिकृतपणे १५ जून रोजी सिएटलमधील विमानाच्या चाव्या घेतल्या आणि आता ते देशात आले आहे. अकासाच्या आगमनाने विमान प्रवाशी वाहतूक क्षेत्रात आणखी स्पर्धा वाढण्याची अपेक्षा आहे.