गौरव साळी/ जालना
गणपती बाप्पांच्या आगमनानंतर लगेच शनिवारी गौराईंचे आगमन होत आहे. अवघ्या चार दिवसांनी येणाऱ्या ज्येष्ठागौरीच्या आगमनाची तयारी सुरू झालीय. महाराष्ट्रभर स्त्रीवर्गात स्वागतासाठी लगबग सुरु झालीय. जालना शहरातील कारागीरही गौरीचे मुखवटे, हात, आरास इतर साहित्य तयार करण्याच्या कामात मग्न झालेयत.
म्हणतात सण पोळा, झाले गोळा.. पोळा झाला की सणवारांना सुरुवात होते. बुधवारी बाप्पा घरोघरी-मंडपांमध्ये विराजमान झाले. सगळीकडे प्रसन्नता दरवळली. त्याचवेळी आता वेध लागलेयत ते गौराईचे. तिच्या स्वागतासाठी सारेच सज्ज होतायत. कारागिर तिचे मुखवटे, हात आणि आरास साहित्य बनवण्याला वेग देत आहेत. महाराष्ट्रातील अन्य शहरांप्रमाणेच जालना शहरातील बाजारात देखील विक्रीसाठी मुखवटे दाखल झाले आहेत.
या वर्षी जेष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मीचे आगमन शनिवारी, ३ सप्टेंबर रोजी होत आहे. सणानिमित्त लागणारे लक्ष्मीचे मुखवटे, हात, आडण्या, आरास आदींसह सजावटीचे साहित्य तयार करण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. सुबक रेखीव व फॅन्सी मुखवटे विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत. ज्येष्ठागौरी सणाच्या सहा महिन्यांपूर्वीपासून लक्ष्मीचे मुखवटे, हात आदीसह विविध साहित्य तयार करण्याच्या कामाला सुरुवात होते. लक्ष्मीच्या हातांच्या जोड्यांची किमत 250 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत तर मुखवट्यांचा दर 500 पासून 2500 रुपयांपर्यंत आहे.
बदलत्या स्थितीनुसार ज्येष्ठागौरीची आरास आकर्षक व मोहक बनवण्याच्या कामालाही मागणी येत असल्याने एका मखराचे आरास करण्यास 1500 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंतचे दर आहेत.बाजारात फॅन्सी मुखवट्यासह सजावटीच्या साहित्याना सर्वाधिक मागणी येत असल्याने त्यादृष्टीने साहित्य तयार करण्यावर व्यावसायिक यांचा भर दिसून येत आहे. तर रेल्वे स्टेशन परिसरात पत्र्यापासून बनवण्यात येणाऱ्या महालक्ष्मीच्या साच्याना मोठी मागणी असते.ग्रामीण भागातील भाविकही जालन्यात येऊन महालक्ष्मीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यास प्राधान्य देतात. महालक्ष्मीचा सण तोंडावर आल्याने मुखवटे विकत घेण्यासाठी महिला विक्रेत्यांकडे गर्दी होऊ लागलीय.
गौराईच्या स्वागत तयारीसाठी महिलांची लगबग पहावयास मिळत आहे. बदलत्या स्थितीनुसार ज्येठागौरीची आरास आकर्षक व मोहक बनवण्याच्या कामालाही मागणी येत असल्याने एका मखराचे आरास करण्यास दीड हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंतचे दर आहेत. बाजारात फॅन्सी मुखवट्याना अन् साहित्याना सर्वाधिक मागणी येत असल्याने त्यादृष्टीने साहित्य तयार करण्यावर व्यावसायिक यांचा भर दिसून येत आहे. कापड व कापसापासून तयार केलेल्या हातावर मेहंदी रंगविणे, नेल पॉलिस, बांगड्या घालणे आदी कामे महिला करतात.
कच्चा साहित्याचे दर वाढल्याने महालक्ष्मी साहित्याचे दर वाढले आहे, पण त्याचा परिणाम उत्सवाच्या उत्साहावर मात्र जाणवत नाहीय.