Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रिफायनरीची सुपारी घेतलेल्या ‘त्या’ सर्वांसाठी…

March 30, 2022
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
Nanar Refinery Project

अॅड. गिरीश राऊत

कोकणात अजुन कुणी भुकेने मरत नाही, की शेतकरी आत्महत्या करत नाही. परंतु याचेच काही माणसांना दुःख असावे, असे रिफायनरीची सुपारी घेतलेल्या ह्रदयशून्य माणसांची मुक्ताफळे ऐकली की वाटते.

 

ते म्हणतात की, प्रकल्पाला बाहेर विरोध करू नका. कोर्टात जा. त्यांनी लक्षात घ्यावे की, कोर्टात एकप्रकारे हे प्रकरण गेलेच आहे. माहुल रिफायनरीमुळे जगणे अशक्य बनलेले नागरिक कोर्टात गेले आहेत. माहुल गाव व परिसर, रिफायनरी व तिच्या संलग्न उद्योगांच्या प्रदूषणामुळे माणसांना जगण्यास, जिवंत राहण्यास योग्य नाही, हे मुंबई उच्च न्यायालयात सिध्द झाले आहे. या उद्योगांमधे अधुनमधुन भीषण अपघाताच्या दुर्घटना होत असतात. गॅस चेंबर बनलेल्या माहुल, चेंबूर व मुंबईचे नागरिक रोजच्या प्रदुषणाने तर झिजुन मरतातच पण कुठल्याही क्षणी होऊ शकणाऱ्या अग्नितांडवाच्या भीतीखाली जगतात.

 

कोर्टाच्या आदेशानंतर असुरक्षित माहुलमधुन रहिवासी इतर दूरच्या भागांत लवकरात लवकर पळत आहेत. कॅन्सर, दमा, मूत्रपिंड निकामी होणे, त्वचारोग, ह्रदयविकार असे भयंकर आजार घरोघरी आहेतच पण स्त्रिया, मुलींना अमानवी स्वरूपात अनियमित मासिक पाळी होण्याचा वेदनामय अनुभव घ्यावा लागतो. कधी महिन्यात दोन तीन वेळा तर कधी तीन चार महिन्यात एकदाच पाळी येते. रिफायनरीला आमंत्रण देऊन हे भोग घेण्याची कोकणवासीयांची इच्छा आहे काय?

 

या भीषण अमानवी पातळीला प्रश्न गेला आहे. नोकरी नोकरी करणारांनी याचा विचार करावा. सन १९५४ पर्यंत, भारतातील ही पहिली रिफायनरी म्हणजे तेल प्रक्रिया प्रकल्प सुरू होण्यापूर्वी माहुल व आसपासच्या गावांतील शेतकरी, मच्छीमार व आदिवासी हजारो वर्षे, आज जसे कोकणच्या अनेक भागांत ( जयगड, दाभोळसारखे कोळसा व इतर इंधने जाळणारे प्रदूषित प्रकल्प भाग सोडून ) कोकणी माणसे निसर्गाशी जोडलेले निरोगी जीवन जगत आहेत, तसे जगत होते. त्यांचे रिफायनरीमुळे उध्वस्त होणे, कोकणी बांधवांनी त्यांच्या जागी स्वतःची कल्पना करून, परकायाप्रवेश करून अनुभवावे. मग अंगावर काटा येईल. रिफायनरीची नोकरी म्हणजे मृत्यू. ही नोकरी की निरोगी जीवन? काय निवडाल? याचे स्पष्ट उत्तर कोर्टातील प्रकरणाने दिले आहे. आपल्याला, जीवनाने समृद्ध व स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या निसर्गरम्य कोकणाऐवजी रिफायनरीच्या नरकाची निवड करण्याची दुर्बुद्धी कशी होऊ शकते?

 

राजापूर किंवा कोणत्याही कोकणच्या इतर अस्पर्श प्रदूषणरहित भागातील रिफायनरी प्रेमी नागरिकांना माहुलच्या रिफायनरीमुळे माहुल सोडू इच्छिणाऱ्या, स्थलांतर करणाऱ्या माणसांबरोबर अदलाबदल करून घ्यायची आहे का? माहुलवासी एका पायावर तयार आहेत. मग कोकणात वेगळी रिफायनरी आणण्याचा खटाटोपही टळेल. नोकरीच हवी ना? मग समर्थकांनी अशीच मागणी करावी. देशाचा नुकसान भरपाईसाठी जाणारा पैसा देखील वाचेल.

 

फुकुशिमाप्रमाणे भूकंप आणि सुनामी ( कारण ठिसूळ जांभा दगडाचा सडा काढावा लागेल.) असा दुहेरी धोका देणाऱ्या, भूकवचातल्या भेगेवर होत असलेल्या जैतापूरच्या अणुभट्ट्या आणि रिफायनरीसारखे प्रकल्प आणणारांना कोकण निर्मनुष्य करायचे आहे असे दिसते.

 

देशाची, प्रक्रिया केलेल्या तेलाची गरज आहे दरवर्षी १९ कोटी टन आणि उत्पादन होत आहे २४ कोटी टन. म्हणजे आधीच अधिकचे उत्पादन आहे. मग रिफायनरीचा हट्ट कशासाठी? वाढत्या गरजेचे, विकासाचे तुणतुणे वाजवले जाते. जगात, पृथ्वीवर काय घडत आहे याचे यांना सोयरसुतक नाही. उष्णता का वाढत आहे? मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचा असह्य अनुभव मुंबईने घेतला. अशा झळा शेकडो वर्षे अनुभवल्या नव्हत्या. महाराष्ट्रात पिके करपत आहेत. एप्रिल, मे महिना अजुन जायचा आहे. एप्रिलमधे शाळा सुरू ठेवण्याच्या सरकारच्या आदेशाला, कालच शिक्षक संघटनांनी वाढत्या उष्णतेमुळे विरोध केला आहे. ही उष्णता वाढत्या कार्बन डाय ऑक्साईड व इतर काही वायूंच्या उत्सर्जनामुळे, प्रदूषणामुळे आहे. यास रिफायनऱ्या प्रामुख्याने जबाबदार आहेत, कारण कार्बन उत्सर्जनाचे मुख्य कारण असलेल्या मोटारीसाठी रिफायनरीचे सुमारे ९०% तेल जाते. रिफायनरीचे प्रत्यक्ष उत्सर्जित प्रदूषण व रिफायनरीने दिलेले पेट्रोल व डिझेल जाळणाऱ्या मोटारींमुळे होणारे प्रदूषण यांचा एकत्र विचार केला तर नाणार रिफायनरी सुमारे ८ ते १० कोटी टन कार्बन डायऑक्साईड वायूची ( कार्बनचा आॅक्सिजनशी संयोग होतो. ) प्रत्येक वर्षी वातावरणात भर टाकेल. यात वातावरणातील प्राणवायू घटत जातो.

 

प्रकल्प राबवणारे विज्ञानाचा ढोंगी जयजयकार करतात. प्रत्यक्षात विज्ञानाच्या मुखवट्याच्या आड घोर अज्ञान काम करते. या केंद्रीय मंत्र्यांना पॅरिस करार माहित नाही, किंवा त्याची पर्वा नाही, हे स्पष्ट आहे. नाहीतर त्यांनी हा प्रकल्प आणला नसता. मानवजात व जीवसृष्टी पूर्ण उच्चाटनापासुन वाचवण्यासाठी जगातल्या सर्व १९६ देशांच्या प्रमुखांनी प्रथमच एकत्र येऊन डिसेंबर २०१५ मधे फ्रान्सची राजधानी ‘पॅरिस’ येथे अतिमहत्वाचा करार केला. त्याप्रमाणे, मानवजात वाचवायची तर पृथ्वीच्या सरासरी तापमानात २°से ची वाढ होऊ देता नये. म्हणून कार्बन डाय ऑक्साईड वायू व इतर उष्णता वाढवणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कमी करावे असे ठरले. त्या दृष्टीने, नाणार रिफायनरी प्रकल्प कार्बन वाढ करणारा असल्याने होऊच शकत नाही. त्यात अधिक चिंताजनक बाब म्हणजे कार्बनची वाढ होत राहिल्याने सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांत सुमारे १°से ची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात झाली आणि आॅगस्ट २०२० मधे जगाला कोव्हिडच्या भ्रमात गुंतवले असताना ही तापमानातील धोकादायक वाढ झाल्याचे नासा आणि जागतिक हवामान संघटनेने जाहीर केले. जगातील या सर्वात महत्वाच्या घटनेबद्दल माध्यमांत बोलले, लिहिले जाऊ नये व मानवजातीला याची जाणीव होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. नाणारचा प्रचार, मुखपृष्ठ आणि पूर्ण वृत्तपत्र व्यापुन करणारे संपादक या घटनेचा उल्लेख होऊ देत नाहीत. सन २०१७ मधे ६ नोव्हेंबर रोजी जर्मनीत ‘बाॅन’ येथे जागतिक हवामान संघटनेची महत्त्वाची खास परिषद झाली. यात संघटनेचे प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. पेट्टेरी टलास यांनी, मानवजातीला माहिती दिली की, *तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे. तापमान यापुढे वाढत राहणार आहे आणि हा कल ५० वर्षे चालू राहील. तापमान वाढण्याची सन २०१४-१५ पासुनची गती दर पाच ते सात वर्षांत १°से अशी अकल्पनीय, ऐतिहासि व अभूतपूर्व आहे. या महाविस्फोटक गतीने पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान इतिहासात कधी वाढले नव्हते. १°से वाढ होण्यास लाखो वर्षे लागत होती. आणिबाणी हा शब्द देखील या परिस्थितीचे वर्णन करण्यास अपुरा आहे.

 

‘नासा’ या अमेरिकेच्या पृथ्वी व अवकाशाचे संशोधन करणाऱ्या जगातील सर्वोच्च संस्थेचे माजी संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ ‘डॉ. जेम्स हॅनसेन’ यांनी “स्टाॅर्म्स आॅफ माय ग्रँडचिल्ड्रन” या नावाचे पुस्तक नोव्हेंबर २००९ मधे आणले. या पुस्तकात ते कबुली देतात की, सन १९८० मधे पृथ्वीवरील ऋतुचक्र मोडल्याची नोंद नासाने केली. परंतु ही गोष्ट आणि अशा अनेक गोष्टी आम्ही लपवल्या, कारण आमचे सर्व राष्ट्राध्यक्ष ( अपवाद : बराक ओबामा ) एक तर, तेल कंपन्यांचे मालक किंवा भागीदार होते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्यांनी ठळक अक्षरात लिहिले आहे , *”होत असलेल्या महाविस्फोटक हवामान बदलाबाबतचे सत्य आणि मानवजात वाचवण्यासाठी आपणास असलेली शेवटची संधी.” ही संधी फक्त एक दशक म्हणजे सन २०२० पर्यंत असल्याचे डॉ. हॅनसेन यांनी नमूद केले होते. हा अंदाज आणि सन २०२० ला २°से ची वाढ होणे, हे जुळणारे आहे.

 

याचा अर्थ, रूढ तंत्रज्ञानाच्या पध्दतीने कार्बन कमी करण्याच्या उपायांनी जसे की, सौर, पवन इ. प्रदूषण कमी करणारे उपाय करून मानवजात आता वाचणार नाही. एकाच वेळी कार्बन उत्सर्जन बंद केले व त्याचवेळी हरितद्रव्याचा नाश देखील थांबला तरच ते शक्य आहे कारण कार्बन कमी करण्याचा प्रयत्न केला तरी ती सन २०१७ च्या तुलनेत वाढच असेल. सन २०१७ च्या पातळीच्या खाली कार्बन डाय ऑक्साईड वायूचे प्रमाण न्यावे लागेल. कारण एकदा वातावरणात गेलेला कार्बन तेथे सुमारे ६०० ते १००० वर्षे टिकतो. आता वाचणे केवळ जीवनपद्धतीतील बदलानेच शक्य आहे, तो बदल देखील याक्षणी हवा.

 

ज्या उपायाकडे पाश्चात्य जग पाहू शकत नाही, तो उपाय आहे, उद्योगपूर्व भारतीय कृषियुगात परत जाण्याचा. जगात एकमेव भारताने चिरंतन संस्कृती टिकवली. ती शेती व आदिवासी संस्कृती होती. शून्य, दशमान पध्दत इ. महत्वाचे शोध लावणाऱ्या, भारतीयांच्या पूर्वजांना स्वयंचलित यंत्र बनवता आले असते. परंतु ते त्यांनी शहाणपणाने टाळले. त्यातील पृथ्वीची मुलभूत नैसर्गिक बैठक मोडण्याचा धोका त्यांना समजला होता. म्हणून, *आज आपण अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या पूर्वजांचा संयम व शहाणपण जागवू. ते साधेपणात होते. त्यात स्वयंचलित यंत्र, वीज, सीमेंट अशा भौतिक वाटचालीला स्थान नव्हते.

 

आपण, मानवजात व जीवसृष्टी म्हणून एका अत्यंत नाजुक व महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. दर ५ ते ७ वर्षांत सरासरी १°से या गतीने वाढणाऱ्या तापमानाचे सर्वांगीण दुष्परिणाम पाहता आपण फक्त सुमारे २५ ते ३५ वर्षांत कायमचे नष्ट होत आहोत. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही वा भयगंड निर्माण करणे नाही. हे कल्पनेहूनही अदभूत असे भयंकर वास्तव आहे. मग लक्षात घ्या की प्रकल्पाचे बाधित कोण आहेत? फक्त काही गावे व कोकणच नाही तर मानवजात व जीवसृष्टी बाधित असणार आहे. बाधितांच्या संमतीने पडिक जमिनीवर प्रकल्प आणणे या कल्पना म्हणून चुकीच्या ठरतात.

 

मात्र जर जीवनपद्धतीत क्रांतिकारी बदल केले तर स्वतःस वाचवणे आपल्याला जमू शकेल अशी आशा करू.
फक्त ५० ते ६० वर्षांपूर्वी भारत खेड्यांचाच होता. त्या खेड्यांमधे मोटार वा इतर स्वयंचलित यंत्र नव्हते, वीज नव्हती, सीमेंट नव्हते. अर्थात टीव्ही, वाॅशिंग मशिन, फ्रीज व वातानुकूलन यंत्र नव्हते. गाव व परिसर जीवनाने रसरसलेला होता. भूजल, पाणी भूपृष्ठालगत काही फुटांवर होते. नैसर्गिक अन्न होते. चरखा व हातमागावरचे पुरेसे वस्त्र होते. माती व बांबूची शेकडो वर्षे टिकलेली घरे सर्वत्र होती. मातीची भांडी होती. धूर न करणाऱ्या मातीच्या चुली होत्या. पायरहाट होते. याआधारे आपण रिफायनरीला नकार देऊन मानवजातीला वाचण्याचा मार्ग दाखवू शकतो. नाणार गावाने सन २०१७ च्या स्वातंत्र्यदिनी, १५ आॅगस्ट रोजी ग्रामसभेत, आपली निसर्गाशी तादात्म्य पावणारी भारतीय शाश्वत जीवन पध्दती टिकवण्याची गरज सांगणारा आणि रिफायनरी रद्द करण्याची तसेच औद्योगिक क्षेत्र अधिसूचना मागे घेण्याची मागणी सरकारकडे करणारा ठराव केला.* हा ऐतिहासिक ठराव आहे. तो ऊर्जांच्या व भौतिक सुखाच्या मागे लागुन पतंगाप्रमाणे औद्योगिकरणाच्या आगीवर आकर्षित होऊन झेपावुन स्वतःची राखरांगोळी करून घेणाऱ्या आणि जगाला तसा आत्मनाश करून घेण्यास चिथावणी देणार्‍या पाश्चात्यांना, भारतीय शाश्वत गावांनी दिलेला संदेश आहे.

 

प्रकल्प करणारे मंत्री, अधिकारी, त्यांच्यासाठी प्रसारमाध्यमे राबवणारे संपादक, समाजाच्या भल्याचा आपण ठेका घेतला आहे असे समजणारे समाजसेवक, यांना तापमानवाढ व हवामान बदल, अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटा, अवर्षण, वादळे, अतिवृष्टी, महापूर, गारपीट, सागरपातळीतली वाढ इ. गोष्टींचे काही वाटत नसते कारण ते त्यांच्या मर्यादित जगात, अज्ञानात मिळणाऱ्या सुख व आनंदात गुंग असतात. शेवटी नैसर्गिक जीवसृष्टी व तिच्याशी जोडलेला शेतकरी, मच्छीमार, आदिवासी मेला तर मेला. आपल्याला त्याचे काय? ही त्यांची कोती भावना असते. काही लाख कोटींचा प्रकल्प आहे. पैसा छापला जात आहे. आता मासा, आंबा, काजू, भात, नारळ कुठुनतरी विकत घेऊ. मरेना का हा कोकणी. असा दुष्ट विचार हे समर्थक करतात. आता तर कितीही पैसा टाकायला जागतिक बँक आणि सौदीचा सुलतान आहेच. मग नंतर पैशावरून घराघरात झगडे होऊ दे की दारू, बाईमधे, कॅन्सरच्या उपचारात, कोकण्याला मरू दे. आपल्याला काय त्याचे. असा हा धूर्त विचार. जेथे जेथे प्रकल्प आले तेथे तेथे गावे उजाड झाली. बाप भाऊ वैरी झाले. शेकडो- हजारो वर्षांची संस्कृती संपली. देव – देवस्थानं गेली. बार – पब आले. काही काळ मोटारी – बाईक उडवल्या. मग आपल्याच पूर्वीच्या शेती- मातीत, मालकाच्या शिव्या खात, वाॅचमनची, झाडू मारण्याची, गाड्या- माड्या धुण्याची कामे वाट्याला आली.

 

औद्योगिक विकास की अस्तित्व हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कोव्हिडच्या नसलेल्या साथीने लॉकडाऊनच्या काळात आणि तापमानवाढ – हवामान बदलाच्या संकटाने, हे सिद्ध केले आहे की अस्तित्वाची, जीवनाची निवड करावी लागेल. जेव्हा शहरे व उद्योग ठप्प झाले तेव्हा गावांनी, शेतीने म्हणजे निसर्गाने, पृथ्वीने जगवले. सन १७८४ सालात मुंबईतील डोंगर तोडुन, त्या दगड – मातीने गिरगाव आणि वरळी बेटांमधील सागर बुजवुन, ती बेटे जोडुन सुरू झालेली विकास नावाची विध्वंसक वाटचाल आज नाणार प्रकल्पाच्या रूपाने ऐतिहासिक टप्प्यावर पोहचली आहे. या वाटचालीत बाणकोटचा किल्ला जिंकल्यावर इंग्रजांनी कोकणच्या शिसव आणि इतर झाडांच्या जंगलाची मुंबईला लागणाऱ्या इमारती लाकडासाठी बेसुमार कत्तल केली. त्यामुळे डोंगर व जमीनीची धूप झाली. खाड्या मातीने भरल्या आणि होड्या, नौका लागण्याची बंदरे समुद्राकडे १०-१५ किमी सरकली. यामुळे निसर्गाधारित उपजिविका गेली आणि कोकणातुन मुंबईला मजुर कामगारांचा ओघ सुरू झाला. मुंबईला श्रमपुरवठा होत गेला आणि मुंबई जगवते असा भ्रम निर्माण झाला व आजतागायत चालू राहिला.

 

आखाती देशातील अरब आणि युरोप अमेरिकेतील पर्यटक निळ्या खाड्यांचे, हापुस, काजू, कोकम, नारळ, मासळी देणारे निसर्गरम्य, जैविक विविधतेने समृध्द, लाल मातीचे कोकण पहायला येतात. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिराचे किल्ले पहायला येतात. नाणार रिफायनरी किंवा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पहायला कुणी पर्यटक येणार नाही. ते त्यांच्या देशातील विनाशकारी रिफायनऱ्या, औष्णिक वीज निर्मिती केंद्रे व अणुभट्ट्या काढुन टाकत आहेत.

 

सौदीच्या सुलतानाकडुन नाणार रिफायनरी करण्यात येत आहे. मग तो सौदी अरेबियातच रिफायनरी का करत नाही? त्याच्या तेल विहिरी तर तेथे आहेत. परंतु त्याला प्रदूषण करणारी रिफायनरी त्याच्या देशात नको आहे. रोज जगात ८ ते ९ कोटी बॅरल तेलाचे उत्खनन होते. सुलतानाला तेल विकुन नफा कमावायचा आहे. त्यासाठी आपण आपल्या प्रिय पृथ्वी आणि कोकणाची होळी करायची का? या सलमानला अमेरिकन पत्रकार खशोगीचा खून केल्याबद्दल दोषी ठरवले गेले आहे. त्याच्या अय्याशीचे नमुने ‘जाॅन पर्किन्स’ या अमेरिकन हेराच्या “आर्थिक मारेकऱ्याचा कबुलीजबाब” या पुस्तकात वाचा. हा माणुस शिवाजी महाराजांच्या कोकणाचे भाग्य उजळणार?

 

सन १९७३ मधे तेल उत्पादक देशांच्या ओपेक संघटनेने तेलाच्या भावांत वाढ केली. अरब अमाप पेट्रोडाॅलर्स कमावु लागले. हे गब्बर झालेले अरब पर्यटक मुंबईचा पाऊस पाहण्यासाठी आणि स्वित्झर्लंडला भुरभुरता बर्फ अनुभवण्यासाठी जात. आता त्याच तेलाच्या वापरामुळे उष्णता वाढुन तापमान ५५ – ६०°से च्या वर जाते मोटारींचे प्लास्टिक वितळते आणि अरबांच्या देशांत व सहारा वाळवंटात आतापर्यंत कधीही न झालेला मुसळधार पाऊस, महापूर व बर्फवृष्टी घडत आहे. त्याचवेळेस मुंबई आपला वैशिष्टय़पूर्ण पाऊस आणि स्वित्झर्लंड आपला हिवाळा गमावत आहे. हे रिफायनरीने व मोटारीने केलेल्या कार्बन उत्सर्जनाचे प्रताप आहेत. कोकणी बांधवांनो भानावर या. आपला आंबा, काजू, कोकम, फणस, मासळी हे वाढते तापमान, मोहोर भाजणारी उष्णता, अवकाळी पाऊस, वादळे, गारपीट यामुळे आपण गमावणार आहोत. ज्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा वारंवार उल्लेख होतो त्या ५० वर्षांपूर्वी थंड असलेल्या कॅलिफोर्नियात आता रिफायनरी व मोटारींमुळे जंगलांना भीषण वणवे लागत आहेत आणि त्यात सर्वात धनिक हाॅलिवूडच्या सिताऱ्यांच्या बंगले असलेल्या ‘पॅराडाईज’ सारख्या अतिश्रीमंत वस्त्या भस्मसात झाल्या आहेत. प्रसारमाध्यमातुन सत्य लपवले गेल्यामुळे अनेक शिक्षितांना औद्योगिक जीवनशैली म्हणजे प्रगती वाटते. त्यांना प्रामाणिक पणे प्रकल्प यावा असे वाटू शकते. अशा नागरिकांनी सत्य समजुन घ्यावे. पण हितसंबंध असलेल्या प्रकल्प समर्थकांनो गावकऱ्यांना प्रकल्पासाठी भडकवू नका. आपल्या अज्ञानाबद्दल खंत बाळगा. तुमच्या अज्ञान आणि स्वार्थामुळे माहुलप्रमाणे सुंदर कोकण उध्वस्त होईल. रोजगाराच्या नावाखाली कोकण उध्वस्त करू नका. कोकण इतरांना रोजगार देत आहे.

 

जीवनाची देणगी देणारा पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे. आपले वैयक्तिक आयुष्य क्षणभंगुर आहे, परंतु जीवनाचे या ग्रहावर अवतरणे ही अथांग विश्वातील असाधारण गोष्ट आहे. ४११ कोटी वर्षे एकपेशीय जीवांचा विकास होत राहिला आणि आपणास आजचे स्वरूप मिळाले. यात आपले कर्तृत्व नाही. कदाचित त्यामुळे माणसे बेफिकीर असावी आणि जीवनाला गृहित धरत असावी. माणसाने निर्माण केलेल्या मोटार, टीव्ही सारख्या क्षुद्र वस्तुंची व त्यासाठी नोकरीची तो काळजी करतो, परंतु त्याची स्वतःची अदभूत निर्मिती करणाऱ्या पृथ्वी निसर्गाची तो काळजी घेत नाही. ईश्वरी तत्वाचा अनादर करतो.

 

कोणताही सजीव प्राणी वनस्पती पक्षी मासा जलचर कीटक गांडुळ पृथ्वीशी नाते जपत परंतु औद्योगिकरणातील माणुस परक्या आगंतुक शत्रूप्रमाणे वागतो. सन १७५६ ला आले स्वयंचलित यंत्र, त्याने बदललेल्या उत्पादनपध्दतीमुळे सन १७७६ मधे अॅडम स्मिथच्या “वेल्थ आॅफ द नेशन्स” या पुस्तकाच्या रूपाने आज थैमान घालणारे जीडीपीच्या वाढीला प्रगती व विकास मानणारे अवैज्ञानिक अनैतिक अर्थशास्त्र आले. त्यातुन वर उल्लेख केलेला भारतीय उपखंडातील डोंगर तोडुन केलेला पहिला समुद्रातील भराव सन १७८४ मधे मुंबईत झाला….

 

मग एक न थांबणारा विनाशाचा वणवा ज्यात जीवसृष्टीची सतत आहुती पडत राहिली. त्याला आपण विकासाचा प्रगतीचा मुख्य प्रवाह म्हणतो. या वेडेपणाला विरोध करणाराला सांगितले जाते की नेहमी मुख्य प्रवाहाच्या उलट का पोहता? विरोधासाठी विरोध का करता? याला उत्तर हे आहे की मुख्य प्रवाह कोणता हे ओळखण्यात मानवजातीची गफलत झाली आहे. मुख्य प्रवाह हा कोट्यावधी वर्षे अविरत चाललेला जीवनाचा व निसर्गाचा प्रवाह आहे. औद्योगिकरण हा जीवनाच्या विरोधी असा दिशाभूल करून आत्महत्येकडे नेणारा, कडेलोट घडवणारा उत्पाती प्रवाह आहे. या अंत घडवणाऱ्या ऊर्जाग्राही प्रवाहातुन स्वतःला सोडवुन उद्योगपूर्व कृषियुगातील उर्जाविरहित नैसर्गिक जीवनदायी संथ, शांत प्रवाहात ताबडतोब येणे आवश्यक आहे. नाणारचे आंदोलन हा टर्निंग पाॅईंट आहे. ही शेवटची संधी आहे.

 

आपला
अॅड. गिरीश राऊत
निमंत्रक
भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
दू. ९८६९ ०२३ १२७


Tags: Adv Girish rautkokanNanarRajapurRefineryअॅड. गिरीश राऊतराजापूर
Previous Post

“विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी करू दे, निवडणूक जिंकतील मोदीजीच!”

Next Post

राज्यात ११९ नवे रुग्ण, १३८ रुग्ण बरे! मुंबई ३८, नाशिक १, नागपूर २ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात ११९ नवे रुग्ण, १३८ रुग्ण बरे! मुंबई ३८, नाशिक १, नागपूर २ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!