सुमेधा उपाध्ये
‘सत्संग’ याचा अर्थ आपल्या आयुष्यात एखाद्या सत्सपुरूषाचा किंवा सच्चरित्र असलेल्या व्यक्तिची साथ असणे, त्यांच्या अनुभवातून त्यांच्या चिंतनातून व्यक्त होणाऱ्या विचारांना ऐकणे आणि त्यावर आपणही चिंतन मनन करून ते आपल्यात मुरवत जाणे. अशा सत्संगतीने आपले जीवनही उजळून जाणे. सत्संग हा अखंड वाहणाऱ्या पुण्य सलिल गंगेच्या प्रवाहा सारखा असतो. ज्याला त्याचा लाभ होतो तो त्यात पावन होत जातो. गंगेच्या उगमा नंतर तिच्यात अनेक नद्या नाले गटारे आणि विविध व्यक्तिंच्या द्वारे सरमिसळ होत राहते. कित्तेकदा कितीतरी घाणेरडे पाणी त्यात मिसळते. पण एकदा का ते गंगेत मिसळले गेले की त्यालाही गंगा तीर्थाचाच मान मिळतो. गंगेच्या सहवासाने घाणेरडे गटाराचे पाणी सुद्धा गंगातीर्थ होतं हिच ताकद सत्संगची आहे. कितीही घाणेरड्या पात्रात तुम्ही गंगेचे पाणी घेतलेत तरीही तिच्या सहवासाने ते गंगापात्र होते. असेच माणसाच्या जीवनाचे होत असते. आपण कोणाच्या सहवासात आहोत यावरून आपली जागा निर्माण होते. आपल्यातील मलिनता अनेक विकार नष्ट होऊन शुद्ध होऊन जर का सत व्यक्ती होण्याची आपली तयारी असेल तर सत्संगाशिवाय पर्याय नाही.
अलिकडे सामाजिक वातावरण विषमतेने भरलेले आहे. कितीतरी गोष्टींपासून अनेक जण वंचित राहतात. करूणा आटत चालली आहे. दु:ख दारिद्र्य वाढत आहे. मन:शांती नष्ट होत आहे. अनेक इच्छाच्या पोटी अनेक समस्यांचा जन्म होत आहे. त्या समस्या गुंतागुंतिच्या होताहेत. एखाद्या वटवृक्षासारख्या समस्या आणि त्याच्या जटारूपी समस्या पुन्हा जमिनीत रूजून पुन्हा तेच तेच चक्र सुरू आहे. समाजाचे कल्याण करण्यास पुढे यावे अशी आशा ज्यांच्याकडून ठेवावी त्यातही कित्तेकजण कुसंगतिने भ्रष्ट होत आहेत. सत् व्यक्तिंच्या सहवासापासून तेही दूर पळत आहेत. सर्वत्र एक प्रकारचा आक्रोश सुरू आहे असं वाटणारी स्थिती आहे. त्यामुळे आत्मसुखासाठी शांतीसाठी सच्चे संत महात्मा यांचा सत्संग अत्यावश्यक आहे. जीवनात नितीमुल्यांच्या संस्कारांची गरज आहे. काय योग्य काय अयोग्य , पुण्य पाप यावर चिंतन करून योग्य ते आत्मसात करणारी शक्ती मनात निर्माण व्हायला हवी. यासाठीच गोस्वामी तुलसीदासजी सांगतात-
जो नहाई चह यह सर भाई | तौ सत्संग करे मन लाई||
याचा अर्थ ज्ञान आणि कर्म सर्वप्रथम सत्संगानेच उदित होईल मात्र यासाठी भगवंताची कृपा होणे आवश्यकत आहे.
बिनु सत्संग विवेक न होई| राम कृपा बिनु सुलभ न सोई
सत पुरूषांचा सहवास हा केवळ भगवद् भक्तीच प्राप्त करून देणारा नसतो तर माणासातील असहिष्णूतेचा ऱ्हास होतो. दया प्रेम अंतरंगात जागृत होते. सत्संगाशिवाय कोणतेही परम सुख प्राप्त होणे कठिण आहे. म्हणूनच तर एकदा एका वृक्षाखाली ऋषींचा सत्संग सुरू होता तिथे इंद्रदेव पोहचले पण त्यांना ऋषिंनी सत्संगाची प्राप्ती होऊ दिली नाही. देवांचे देव इंद्र त्यांनाही सत्संगाची अभिलाषा होती. त्यासाठी स्वर्गातील अमृत देण्याचे कबुल केले होते. तरीही त्यांनी सत्संग नाकारला कारण असंही म्हटलं जातं की सत्संगचा लाभ होणे हे ही प्रारब्धात असावे लागते. ज्यांना सत्संगचा लाभ होतो ते निश्चित भाग्यवान असतात हे दर्शवण्यासाठीच कदाचित ही इंद्रदेवाची कथा आली असावी असं मला वाटतं.
सत्संगामुळेच बुद्धी प्रखर होते. सत्याची जाणीव होते आणि पाप कर्मांपासून दूर होतो. त्यामुळे सहजच कर्मबंधनाचे पाशही हळुहळु विरळ होऊ लागतात. यज्ञयाग तप दान जप कठिण तपस्या यामुळे जो भक्तिमार्ग कठिण वाटतो तो सुद्धा सत्संगामुळे सुकर होऊ लागतो. आपण कोणाच्या सहवासात आहोत आणि त्यांच्यापासून काय शिकत आहोत हे फारच मोलाचे असते. पारसचा एकच धर्म लोखंडाला स्पर्श होताच त्याचे सोने करायचे मग तो हे पहात नाही की लोखंड कुठून आणले आहे. ते भंगाराच्या दुकानातले आहे का? याचा त्या परिसाला काहीच फरक पडत नाही. सुकलेली फुलेही देवाच्या चरणावरून येतात म्हणून निर्माल्य होतात. आपल्या जीवनाचेही सोने करायचे असेल तर सत्संगाला पर्याय नाही. तुलसिदाजींनी म्हटलेलेच आहे-
सत्संगति मुद मंगल मूला| सोई फल सिधि सब साधन फूला||
सर्व प्रकारच्या मांगल्याचं मूळ सत्संग आहे. त्यामुळे जीवनात अनेक संधी येत राहतात. त्यात सत्संगाची आलेली संधी हुकवायची नसते. किंबहुना सत्संग मिळेल यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. अतिशय दुर्मिळ असा मनुष्य जन्म मिळाला आहे. त्याचे सार्थक करायचे असेल तर नित्य कर्म करत असतानाचं भगवंताच्या जवळ जाण्याचा सोपा सोपान म्हणून तरी सत्संग प्राप्त करून घ्यावा.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)