अब्दुल समद शेख / व्हाअभिव्यक्त!
लातूर शहरालगतच्या भागात साईनाका ते रिंगरोड हा रस्ता अंत्यत खराब झालेल्या अवस्थेत आहे. मात्र, तेरी भी चूप मेरी भी चूप धोरणाने सर्वच गुपचूप राहतात. आणि अशी दयनीय अवस्था झालेली असूनही अखेर याला पालकत्व कोणाचेच नाही. या रस्त्याला कोणी वालीच नाही असे दिसून येते.
पावसाळ्यात रस्ता चिखलाने भरतो. खड्ड्यातच जातो, असे म्हणावं लागतं. प्रवास जीवघेणा ठरु लागतो. पण या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न जशास तसा आहे. थातुर मातुर डागडुगी करायची, बिल काढायचे,घेणारे नामे निराळे मोकळे आणि पुन्हा रस्ता जसा होता तसाच.
पावसाळ्यात पावसाच्या चार सरी जरी पडल्या तरी साईनाका ते गरुड चौक या रस्त्यावर वाहन चालवयाचे म्हणजे कसरतच म्हणावी लागते. आम्ही सुटलोरे ब..बा..पुलावरून असा श्वास.. सोडत दुचाकीस्वर जर कोठे पहावयास मिळत असतील तर साईनाका – गरुड चौक या अरुंद पुलावर. तो जीवघेणा पुल झालाय. जो डीमार्ट शेजारी पुल आहे येथे ज्याने प्रवास केला त्यालाच जीवघेण्या प्रवासाचा अनुभव आला म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. पण लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन यांना काहीच देणेघेणे नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर या भागातील नागरिकही निवेदने देतात. पण काही होत नाहीत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वाटते निवेदन घेतले आता आमची जवाबदारी संपली.
त्याचं ठिक आहे. कारण त्यांना काहीच फरक पडत नाही. पण आपलं काय? आता आपणच पुढे आलं पाहिजे. आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. या रस्त्यावर ज्यांना दररोज जाणे येणे आहे ते कसातरी रस्ता पार करतात. त्यांना सरावच करुन घ्यावा लागला आहे. पण नवीन प्रवाशांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होतो. तेव्हा ही जवाबदारी व कर्तव्य म्हणून, एक नागरिक म्हणून किमान जीव धोक्यात घेऊन चालणाऱ्या आमच्या माता – भगीनी असतील किंवा ज्येष्ठ असतील सर्वांचा जीव महत्त्वाचा आहे. आपण याची जाणीव ठेवून हा प्रश्न प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने घेण्यास भाग पाडले पाहिजे. जर आपण नाही केले तर आपल्यासाठी बसल्या जागी कोणी करणार नाही. तसं करणं म्हणजे भ्रमात जगणं. चिखलातच राहणे!