मुक्तपीठ टीम
व्यसन हा आजार आहे, असे जागतिक आरोग्य संघटना बजावत आहे. परंतु विविध व्यसनवर्धक नितीचा स्वीकार करणारे, समाज घातकी निर्णय घेऊन महाराष्ट्राचे सरकार हा आजार पसरवण्याचा अतिरेकी उत्साह का दाखवत आहे. या व्यसन वर्धक नीतीला प्रखर विरोध राज्यातील महिला लोकप्रतिनिधींनी करावा, व्यसनाचा आजार पसरवण्याचे काम थांबवावे, असे आवाहन व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने सर्व लोकप्रतिनिधींना करण्यात आले आहे. ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व १० मार्च क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यभरातील महिला लोकप्रतिनिधींना व त्यांच्या कुटुंबियांना निवेदने देण्यात येत आहेत, असे मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, वर्षा विद्या विलास यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्यात दारूच्या प्रसाराला प्रोत्साहन देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातून निर्माण होणारे वातावरण हे संपूर्ण समाजाच्या, गरीबांच्या व त्यातही महिलांच्या दृष्टीने अत्यंत दुदैवी आहे. गरीब घरात दारुड्या पुरुषाच्या बाटलीतला प्रत्येक घोट त्याच्या बायकोमुलांच्या भाकरीचा घास हिसकावून घेत असतो. श्रीमंत कुटुंबात दारूच्या दुष्परिणामांना तोंड देण्याची ऐपत असते. तरीही कौटुंबिक उद्धस्तता रोखण्यासाठी एकेकाळी महाराष्ट्राच्या संवेदनशील शासनाने बिअर बार बंदीसारखा धाडसी निर्णय घेतला होता. आज, चिमूरपासून नागपूरपर्यंत पायी चालून दारुबंदीची मागणी मान्य करून घेणा-या चंद्रपूरच्या गरीब आदिवासी महिलांना शासनाने एका निर्णयाच्या फटका-याने धुडकावून लावले. दारूचा प्रसार करत, कोरोनामुळे आर्थिक, शैक्षणिक कंबरडे मोडलेल्या कष्टकरी वर्गाच्या, त्यातील महिला-बालकांच्या हालात सरकार आणखीच भर घालत आहे.
वाईन या पेयाची मादकता काहींसाठी सौम्य असेलही, पण चटक, व्यसन लागण्याची त्याची क्षमता वादातीत आहे. ‘व्यसन हा आजार आहे’ असे जागतिक आरोग्य संघटना बजावत आहे. तर, महाराष्ट्रासारखे पुरोगामी सरकार हा आजार पसरवण्याचा अतिरेकी उत्साह दाखवत आहे. याबाबत महिला लोक लोकप्रतिनिधी या नात्याने आपण सरकारला जाब विचारला पाहिजे. दारूचे उत्पादन करणार्या कंपन्या दारूचा खप वाढावा, त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळावा याकरिता प्रयत्नशील राहतीलच, हे एकवेळ समजू शकतो. परंतु, आपल्या जनतेचे पोषणमान व राहिणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टींची घटनादत्त जबाबदारी असणा-या राज्यकर्त्यांकडूनच आपल्या जनतेचे, अशा प्रकारे शोषण होण्यासाठी व्यसनवर्धक नीतीला राज्यमान्यता देणे आपणांस योग्या वाटते का? असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
‘एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करायचे असेल तर त्यातील महिलांची स्थिती पहावी’ आणि ‘एखाद्या सरकारचे महिला विषयक धोरण अभ्यासायचे असेल तर त्याचे दारूविषयक धोरण अभ्यासावे’ असे समाजशास्त्रीय संकेत आहेत. राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणाच्या मसुद्यात दारूविषयक नीतीचा साधा उल्लेखही नाही. २०२२ हे ‘महिला शेतकरी सन्मान वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. दारूचा प्रसार करणारे सरकार कष्टकरी, शेतकरी महिलांना दारूवर्धक नीती ऐवजी सन्मानाचे जीवन देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. बिहारमधील सरकारने २०१६ साली राज्यात दारूबंदी सारखा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यातील दारूबंदी नंतरच्या व दारूबंदी आधीच्या घटनांविषयी माहिती अचंबित करणारी वाटते. २०१३ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालावधीत पती किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अत्याचार झालेल्या ४३३२ घटना घडल्या होत्या. राज्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर म्हणजेच २०१७ ते २०१९ या कालावतीत या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊन २७७० घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजे दारू बंदीनंतर सुमारे १५६२ घटना कमी झालेल्या दिसतात. याप्रमाणे हुंड्यासाठी झालेले मृत्यू, बलात्काराचा प्रयत्न करणा-या घटना व प्रत्यक्ष बलात्कार झालेल्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. (यासाठी शेवटी दिलेला तक्ता पाहावा.) यासाठी आपण महिला लोकप्रतिनिधी म्हणून ठोस भूमिका घ्यावी. राज्य सरकारच्या या निणर्यांमुळे महिला मोठ्या प्रमाणात दुःखी आहेत. विविध समाज माध्यमातून त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. याची गंभीर दखल आपण लोकप्रतिनिधी या नात्याने घ्यावी, असे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने आवाहन करण्यात आले, असे मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील व वर्षा विद्या विलास यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
I am Welcome your initiative. We are with you !
– Avinash Patil,
MANS’S Vivek Jagar.
State Convenor of VMMSM Vyasan Mukta Maharashtra Samanvay Manch.