मुक्तपीठ टीम
स्वातंत्र्यदिनाच्या ७५ वर्षांच्यानिमित्ताने प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सांगलीच्या अजितराव घोरपडे विद्यालयाने ७५ नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले. या उपक्रमांची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. गुड न्यूज मॉर्निॆग बातमीपत्रात ही चांगली बातमी सादर करतेय, मी सुश्रुषा जाधव.
सांगलीच्या मिरजमधील कळंबीतील अजितराव घोरपडे विद्यालय ही शाळा सांगली जिल्ह्यातील पहिली आयएसओ नामांकित शाळा आहे. या शाळेचा १०वीचा निकाल गेल्या बारा वर्षापासून शंभर टक्के लागत आहे. स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालयात ही या शाळेचा जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विश्वविक्रमामध्ये नोंद होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन सर्व फोटो व्हिडिओ व डॉक्युमेंट याची तपासणी करून इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र शाळेला प्रदान करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील हा पहिलाच इंटरनॅशनल अवार्ड आहे, तो या शाळेला प्राप्त झालेला आहे.
९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट कालावधीत वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम व नवोपक्रम राबवून विश्वविक्रम करण्याचा संकल्प केला होता. एक भाग म्हणून पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना ७५०० पत्रे पाठवण्यात आलेली होती. त्याची दखल महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.
या विद्यालयाने गेले वर्षभर विविध उपक्रम घेऊन लोकसहभागातून ही शाळा मॉडेल शाळा निर्माण केली आहे व याची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे.
शाळेतील सर्व ७५० विद्यार्थ्यांच्या सहभागाने व पालकांच्या सहकार्यातून ७५ नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून नवा विक्रम करण्याचा संकल्प या शाळेच्या प्रशासनाने घेतला आहे. या नावीन्यपूर्ण ७५ उपक्रमामध्ये योगा, सूर्यनमस्कार ७५० विद्यार्थ्यांचे साहित्य कवायत, मराठी-हिंदी-इंग्रजी या विषयाचे ७५० विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, मेहंदी, रंगभरण, उत्कृष्ट स्वाक्षरी स्पर्धा, पाढे निर्मिती कार्यशाळा, ७५ लेझीम पथक, झांझ पथक, ७५० विद्यार्थ्यांची मॅरेथॉन स्पर्धा, सर्व विद्यार्थ्यांचे तिरंगा फेस पेंटिंग, स्मरणशक्ती स्पर्धा, मुहावरे स्पर्धा, म्हणी स्पर्धा, शेरोशायरी सादरीकरण, चारोळी सादरीकरण, बोधकथा निर्मिती व सादरीकरण, पोस्ट कार्ड संदेश स्पर्धा, स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, आदर्श विद्यार्थी सत्कार, पथनाट्य सादरीकरण, तिरंगा सायकल रॅली, क्रांतिकारकांची चित्र फोटो प्रदर्शन, वॉल पेंटिंग प्रदर्शन, निसर्ग चित्रे प्रदर्शन, वर्ग सजावट स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन व अपूर्व विज्ञान मेळावा, अटल टिंकरिंग लॅब साहित्य निर्मिती व प्रदर्शन शैक्षणिक साहित्य मॉडेल, इंग्रजी-मराठी-हिंदी घोषवाक्य स्पर्धा, इंग्रजी समृद्धीकरण कार्यक्रम, पुस्तक परिचय व पुस्तक प्रदर्शन अशा प्रकारे ७५ उपक्रम प्रत्येकी ७५ विद्यार्थ्यांच्या सहभागाने संपन्न करण्यात आले आहेत.
इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने प्रमाणपत्र विद्यालयास प्रदान केले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ, नागरिक सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक डी एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विश्वविक्रम समिती स्थापन करण्यात आली. या गावातील २५० व आसपासच्या सात गावातील ५१० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेत चित्र काढणारे, पेंटिंग करणारे, वर्ग रंगवणारे, प्लंबिंग करणारे, गार्डनिंग करणारे, सुतार काम करणारे, फर्निचर दुरुस्ती करणारे या प्रकारचे सर्व कौशल्य असलेले शिक्षक व कर्मचारी आहेत. थोडक्यात शाळेचा विश्वविक्रम हा या साऱ्यांचाच आहे.