सकारात्मकता या शब्दातच शुभत्व आहे. शुभ घेऊन येणारे विचार हे सकारात्मक असतात. मनात निर्माण होणारे सकारात्मक विचार नेहमीच सृजनाचे कार्य घडवत असतात. ज्यात सकल समाजाचे हित सामावलेले असते. चांगले – वाईट अर्थात सकारात्मक आणि नकारात्मक भाव यांच्यातील संघर्ष खूप जुना आहे. जो अगदी अनादिकालापासून सुरू असल्याचं आपण पाहतो. मग देव असूरांचा संघर्ष असो किंवा वर्चस्वाच्या भावनेतून निर्माण होणारा संघर्ष असो. चांगले किंवा वाईट यातील संघर्षात अंतिमत: विजय चांगल्याचाच होतो म्हणजेच सकारात्मकता नेहमीच विजयपथ प्रशस्त करते असं म्हणू शकतो. या कलियुगात तर वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी कायमच संघर्ष सुरू आहे. नकारात्मक विचारांची दाटी झाली की त्यावर उपाय एकच असतो तो म्हणजे सकारात्मक विचार वाढवून त्यावर मात करणे. पण कित्तेकदा या संघर्षात तग धरणे अतिशय कष्टदायक असते.
तरीही नेटाने या सकारात्मकतेच्या यज्ञ कुंडास धगधगते ठेवले तर त्याच्या प्रचंड ऊर्जेने नकारात्मकता भस्म होऊ शकते. आपल्या योग्य विचारांचा प्रभाव आपल्यासह आपल्या संपर्कात येणा-यांसही उपयोगी पडतो. नेमके सकारात्मक आणि नकारात्मक हे ठरवायचे कसे असे प्रश्न अनेकांना पडू शकतात. पण हे ठरवणे अगदी सोपे आहे. ज्या ऊर्जेतून सकारात्मकता निर्माण होते त्याने स्वत:सह अनेकांना लाभ होतो. याउलट नकारात्मकतेच्या उपस्थितीने स्वत:सह संपर्कातील सर्वांचेच नुकसान होते. अशा स्थितीत आपल्या विवेक बुद्धिला स्मरण करून प्रत्येकाने वागणे इष्ट आहे.
सकारात्मक विचार ही एक शक्ती आहे. या शक्तिच्या माध्यमातून कोणत्याही कठिणातील कठिण परिस्थितीतून मार्ग काढणे सहज साध्य आहे. सकारात्मकतेतूनच आत्मविश्वास वाढतो आणि यशाचा मार्ग आखला जाऊ शकतो. यासाठी आपण नेहमी हसतमुख रहावं आणि जे होईल ते आपल्यासाठी उत्तमच असेल यावर विश्वास हवा. म्हणजेच आत्मविश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही. सुखाच्या दिवसांसोबत कष्टदायक दिवसही येऊ शकतात त्यांचा सामना करण्याची मनस्थिती ठेवावी. सर्वच विचारांची उत्तपत्ती मनातून होते. मन जेवढे शांत संयमी असेल तेवढे विचारही नियमित होऊ शकतात. आपले परिश्रम आणि चांगले विचार यांतून परिस्थिती सुव्यवस्थित होऊ शकते. आज एक काम नाही झाले किंवा आज जे हवे ते नाही मिळाले याचा अर्थ उद्या मिळणार नाही असे नाही. आपल्या प्रारब्धानुसार योग्यवेळी योग्य फळ निश्चित मिळते. आपण संयम ठेवला की अनेक प्रश्नांची उत्तरं काळाच्या उदरात असतात ती मिळत जातात. प्रत्येक गोष्टीचा अट्टाहास आणि तिचा अति लोभ नसावा. ज्या शक्तिच्या कृपेने आपण जन्म घेतला आहे ती शक्ती आपल्या सोबत कायम असते.
म्हणतातना एका छोट्या फांदीव बसून डुलकी घेणाऱ्या पक्षालाही ती परमशक्ती खाली पडू देत नाही तर एवढा मोठा मानवी देह ज्याने दिलाय त्याचा काहीतरी उद्देश नक्कीच आहे. आपल्या असण्याचं उद्दिष्ट समजून घ्यावं आणि कार्यतत्परता असावी. कार्यमग्न राहणा-यांचे जीवन उज्ज्वल होते. कारण त्यांना नकारात्मक विचारांसाठी वेळच मिळत नाही. आपल्या परिस्थितीस आपणच कारणीभूत आहोत. त्याचा दोष इतरांना देणे योग्य नाही. आपली जबाबदारी आपण उचलली की नंतर त्यातून मार्ग आपण काढण्याचा प्रयत्न करतो. नेहमी आपल्यातल्या चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण करा. दु:ख तर सर्वांकडेच आहे. आनंद वाटण्याचा प्रयत्न करा. नेहमी आनंदी राहणारी व्यक्ती सदा सकारात्मक असते.
कोणत्याही परिस्थितीत जे घडेल त्याचा योग्य अर्थ लावून स्वत: ते कसे अनुकूल आहे याचा विचार करते. प्राप्त परिस्थिती स्विकारण्याची तयारी असली की आपण नकारात्मक विचार सहज दूर ठेवतो. कोणास आवश्यकता असेल तर सहज सहकार्य करा पण त्याच्यावर टीका करू नका अन्यथा त्याचे मनोबल कमी होऊल, जर शक्य नसेल तर शांत रहा. जेव्हा मन काळवंडते तेव्हा छान गाणी ऐका, फिरायला जा, सुखातील स्मृतिंना उजाळा द्या त्यातून मन पुन्हा सकारात्मक विचारांच्या मागे धावेल आणि वातावरण छान होईल. सर्वात चांगली व्यक्ती तिच असते जी स्वत: आनंदी राहून इतरांनाही आनंदी ठेवते. जीवनाचा मूलमंत्र आनंद हा असेल तर ती व्यक्ती नेहमी स्वत: सह इतरांनाही आनंदच देईल. एक सकारात्मक विचार अनेक कष्टदायक प्रश्नांचा विनाश करू शकते. मनाची निर्मलता शुद्धता सकारात्मक विचारांचे उत्तपत्ती स्थान आहे. जेवढी सकारात्मकता वाढेल तेवढाच समाजही हळूहळू प्रगतीकडे मार्गस्थ होईल. म्हणूनच कायम अग्निहोत्रा प्रमाणेच सकारात्मकतेचा यज्ञ प्रज्वलित राहणे आवश्यक आहे.