मुक्तपीठ टीम
“भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?” आजवर हॉकी असेच उत्तर येत असे. आता मात्र तसे नसल्याचे सरकारनेच उत्तर दिल्याने संभ्रम तयार झाला आहे. एका विद्यार्थ्याने क्रीडा मंत्रालयाकडे “भारत सरकारने कोणत्या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता दिली आहे?” असा प्रश्न विचारत त्यावर उत्तर मागितल्यानंतर आलेल्या उत्तरामुळे राष्ट्रीय खेळ कोणता? हा प्रश्न चर्चेत आला आहे.
उत्तरप्रदेशातील गोरखपूरचा एक विद्यार्थी शिवम कुमार गुप्ताने १ फेब्रुवारी रोजी माहिती अधिकाराच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालयाला दोन प्रश्न विचारले होते. यातील पहिला प्रश्न असा होता की, “कोणत्या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून भारत सरकारने मान्यता दिली आहे?” तर दुसरा प्रश्न म्हणजे, “क्रीडा मंत्रालय आयोजित ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’ अंतर्गत स्वदेशी खेळांचा किती समावेश आहे?”
शिवम कुमार गुप्ता या विद्यार्थाच्या प्रश्नांना क्रीडा मंत्रालयाने उत्तरे दिली. त्यामुळे प्रथमच उघड झालं की, “भारत सरकारने कोणताही खेळ हा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केलेला नाही, कारण सर्व लोकप्रिय खेळांना प्रोत्साहन देणे हे सरकारचे मुख्य उद्देश आहे”.
याआधीही १० वर्षीय ऐश्वर्या पाराशर हिने क्रीडा मंत्रालयाला आरटीआय पाठवून “सरकारने देशाच्या राष्ट्रीय खेळाची घोषणा करण्याचा आदेश केव्हा जाहीर केला होता?” तसेच “हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे का?” या प्रश्नांना उत्तर देताना क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, “हॉकी राष्ट्रीय खेळ जाहीर करावा अशी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही”. तसेच ऐश्वर्याच्या आरटीआयला उत्तर देताना अन्डर सेक्रेटरी यूनियन मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्सचे तोमर यांनी सांगितले की, “सामान्यत: हा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो. सध्या हॉकीला प्राधान्य दिले जात असले तरी तो राष्ट्रीय खेळ नाही आहे”.
एका राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकीकडे पाहिले जाते. सन १९२८ ते १९५६ पर्यंत सातत्याने भारताने हॉकीत सुवर्ण पदक पटकवले आहेत. ध्यानचंद यांचे नाव हॉकीचे जादूगर म्हणून जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. तसेच सर्व खेळांमध्ये हॉकीला अधिक प्राधान्य देणे, हा देखील राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाण्याचे मुख्य कारण असू शकते.