मुक्तपीठ टीम
जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ यांची नुकतीच, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या प्रतिनिधींनी पुण्यात कृतज्ञता भेट घेतली. पर्यावरण मंडळाच्या शिर्डी येथे संपन्न झालेल्या संमेलनात प्रसिद्ध केलेल्या ‘वनश्री’ विशेषांकासाठी डॉ. गाडगीळ यांनी ‘संतप्त धरित्री’ हा विशेष लेख दिला होता. अलिकडे त्यांनी वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करण्याबाबत मत व्यक्त केले होते. गाडगीळ सरांचे ते परखड मत वाचून ‘प्राण्यांच्या सर्रास कत्तली होऊन तस्करी करणाऱ्यांना मैदान मोकळे मिळेल’ असे वाटल्याने पर्यावरण प्रेमींच्या भुवया उंचावल्या होत्या. सरांची यामागची भूमिका समजावून घेणे, मंडळाच्या पर्यावरण जनजागृतीच्या कामासंदर्भात संवाद साधणे हा या भेटीचा उद्देश होता.
पर्यावरण मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी डॉ. गाडगीळ यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉ. गाडगीळ म्हणाले, निसर्ग संवर्धनातून शाश्वत विकास साधताना स्थानिक लोकांना न्याय्य लाभही व्हायला हवा आहे. पैसे कमावण्याच्या हेतूने निसर्गाचा विध्वंस सुरु आहे. त्यावर निर्बंध आणायला हवा आहे. केरळातील दोन जिल्ह्यात लोकांनी जैवविविधता रजिस्टर बनवली. खाणीमुळे होणारे नुकसान लक्षात आणून दिले आणि केरळच्या हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. खाणींचे काम थांबवण्यात आले. अशी जागृती व्हायला हवी आहे. कायद्याचा तो उद्देश आहे. नाशिकमध्ये खाणीच्या कामामुळे गोदावरीच्या उगमाकडील ब्रह्मगिरी पर्वताच्या भागाचा मोठा विध्वंस सुरु होता. तो थांबवला गेला आहे. भारतीय संविधानातील चौकटींचा आधार घेऊन पर्यावरणीय जनजागृती व्हायला हवी आहे. संविधानाप्रमाणे पर्यावरण क्षेत्रात प्रत्यक्ष काम करायच्या चांगल्या संधी आहेत. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अशा पर्यावरण संवर्धन कामात सहभागी व्हायला हवं आहे. जागृती कृतियुक्त असायला हवी आहे. ‘जैवविविधता कायदा २००२’ प्रमाणे ग्रामपंचायत, नगरपंचायत भागात जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन व्हायला हव्यात. त्या पर्यावरणाची माहिती असलेल्या स्थानिक लोकांमधून बनायला हव्यात. यासाठी प्रसंगी अशिक्षित पण पर्यावरणाची माहिती असलेल्या लोकांना एकत्र आणणं आवश्यक आहे. यावेळी कर्नाटकातील जैवविविधता रजिस्टर पाहिली असता आपल्याला ‘कॉपी-पेस्ट’ प्रकार दिसल्याची आठवण डॉ. गाडगीळ यांनी सांगितली. अलिकडे डॉ. गाडगीळ आणि डॉ. विजय एदलाबादकर यांच्या मार्गदर्शनखाली राज्यातील १५ गावांच्या जैवविविधता नोंदवह्या बनवण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला होता. त्यात पर्यावरण मंडळाने कोकणातील चिपळूण तालुक्यातील पेढे गावावर काम केले होते. याची आठवण वाटेकर यांनी यावेळी सांगितली. गोव्यातील ग्रामव्यवस्था पोर्तुगीजांना पूर्ण मोडता आली नाही म्हणून तिथे निसर्ग संवर्धन दिसते आहे. संविधानातील तरतुदीनुसार निसर्गाची चांगली व्यवस्था आणणं शक्य आहे. देशभर बागायतदारांना माकडांचा आणि शेती करणाऱ्यांना डुकरांचा त्रास होतो आहे. हिमाचल प्रदेशातही सफरचंदाच्या बागा पिकवणाऱ्या बागायतदारांना माकडांचा प्रचंड त्रास आहे. बागायतदार शेती-बागायती बंद करण्याच्या विचारापर्यंत आलेत. म्हणून वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करून पुन्हा शिकारीला परवानगी दिली पाहिजे! जगात कोणत्याही देशात अशी बंदी नाही. नियंत्रण न ठेवल्यास वन्यप्राण्यांची संख्या वाढेल. अर्थात रान मोकळं होणार नाही याची काळजी घ्यायला हवी आहे. सामान्य लोकांनी परंपरा जपल्यात. निसर्ग व्यवस्था पूर्वी लोकांनी सांभाळली. जिथे जिथे पर्यावरण संरक्षण आहे ते लोकांमुळे आहे. सामान्यांच्या विवेकबुद्धीला आपण मानायला हवं आहे. कोकणातल्या वाशिष्ठीचे पाणी निर्मळ असल्याचे सांगणारा अहवाल आणि लोट्याच्या औद्योगिक संकुलातून वाशिष्ठीत होणारं प्रदूषण विरोधाभास दर्शवणारं आसल्याचं गाडगीळ यांनी सांगितले.
यावेळी मंडळाचे यांनी पुण्यातील मुळा-मुठा स्वच्छता अभियान संदर्भातील वास्तववादी माहिती डॉ. गाडगीळ यांना दिली. डॉ. गाडगीळ यांच्या सूचना जाणून घेतल्या. नदीचे, प्रदूषण, प्रदूषणाचे मूळ प्रश्न समजून घ्या. महानगरपालिकेने जैवविविधता समिती बनवायला हवी आहे. कंत्राट देऊन अशी करायला गेलो तर अशी कामं होत नाहीत, असा अनुभव आहे. नद्यांना घाट बांधताना त्या स्वच्छ आहेत का? हे तपासायला हवे आहे. साठच्या दशकापार्नांत पर्यंत मुळा-मुठा रम्य आणि स्वच्छ असल्याचे डॉ. गाडगीळ म्हणाले. मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी डॉ. गाडगीळ यांना ‘वनश्री’ विशेषांक आणि शाल देऊन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मंडळाचे राज्य कार्यक्रम नियोजन सचिव सुभाष वाखारे, पुण्याचे पर्यावरणप्रेमी आदित्य कुंटे उपस्थित होते.