मुक्तपीठ टीम
देव देव्हाऱ्यात नाही… देवाचिये द्वारी उभा क्षणभरी… सखी मंद झाल्या तारका… फिटे अंधाराचे जाळे… ज्योती कलश छलके… तोच चंद्रमा नभात… धुंदी कळ्यांना… सांज ये गोकुळी… ओंकार स्वरूपा… अशा एकामागून एक अवीट गोडीच्या भाव-भक्तिपर रचनांनी रसिकांना शांत रसाची अनुभूती दिली.
निमित्त होते, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त देणगीदार व हितचिंतकांसाठी आयोजित श्रीधर फडके यांच्या ‘बाबूजी आणि मी’ या सांगीतिक मैफिलीचे! गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात रंगलेल्या या मैफलीत अनेक अजरामर गीतांची लयलूट झाली. स्वरांमधून भावछटांचे अचूक प्रकटीकरण करणारे ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या, तसेच स्वतःच्या रचना बाबूजींचे सुपुत्र व गायक-संगीतकार श्रीधर फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने पेश केल्या.
यावेळी समितीच्या वतीने ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक नितीनभाई कारिया, माजी विद्यार्थिनी माधवी टेमगिरे, या देणगीदारांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. उद्योजक भूषण वाणी, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त सुप्रिया केळवकर यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते, कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबुजींच्या गायकीचे परिपूर्ण स्वरदर्शन घडवतानाच श्रीधर फडके बाबुजींनी प्रत्येक गीताला संगीत देताना व गाताना केलेला त्यामागचा खोल विचारही मांडत होते. त्यातून बाबूजी, गदिमा व इतर समकालीन गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यातील स्नेहबंध उलगडला जात होता. श्रीधरजींबरोबर गायिका शिल्पा पुणतांबेकर व शेफाली कुलकर्णी-साकुरीकर याही होत्या. समर्थ रामदास यांच्या ‘ताने स्वर रंगवावा’ ही रचना पुणतांबेकर यांनी जोरदार तानांच्या सहाय्याने सादर केली. त्यांनी सादर केलेली ‘आज कुणीतरी यावे’ ही रचना असो की साकुरीकर यांनी सादर केलेली ‘ऋतू हिरवा’ असो रसिकांमधून ‘वन्स मोअर’ची मागणी होत होती. ‘कानडा राजा पंढरीचा’ गीताने पूर्वार्ध रंगला.
मध्यंतरानंतर गंगू बाजाराला जाते जाऊद्या, उदे ग अंबाबाई, माता भवानी जगताची जननी, जिवलगा कधी रे येशील तू अशा बहारदार गीतांसह यमन, मल्हार, केदार, भूपश्री रागांचे दर्शन घडविले. श्रीधरजींनी आपल्या या सुरेल मैफलीत रसिकानाही सहभागी करून घेत त्यांनाही गायला लावले. ओंकार स्वरूपाच्या ओळी सारे रसिक गात होते आणि त्यामुळे समूहगानाचा एक अनोखा आविष्कार घडत होता. ‘गंगु बाजारला जाते जाऊद्या’ या गीतावर सगळ्यांनी ठेका धरला. गावाकडच्या घराचे वर्णन करणाऱ्या ‘खेड्यामधले घर कौलारू’ने जुन्या आठवणी जाग्या केल्या. ‘घर असावे घरासारखे’मधून नात्यातला भावस्पर्श जागा झाला. ‘बलसागर भारत होवो’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
मेघना अभ्यंकर यांनी ओघवत्या शैलीत केलेल्या निवेदनाने रसिकांची मने जिंकली.