मुक्तपीठ टीम
स्थलांतरित गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांची अद्यावत माहिती तात्काळ एकाच प्रणालीवर उपलब्ध करणा-या देशातील पहिली ‘स्थलांतर निरीक्षण प्रणाली’चे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महिला व बालविकास विभागाने देशातील पहिली महाराष्ट्र विकसित (महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम) केली आहे.
मंत्री लोढा म्हणाले की, विभागाने वैयक्तिक विशिष्ट ओळख क्रमांकांद्वारे असुरक्षित हंगामी स्थलांतरित लाभार्थ्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वेबसाइट-आधारित मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम (MTS) तयार केली आहे. या प्रणालीमुळे हंगामी स्थलांतरित महिला व बालकांची माहिती तात्काळ उपलब्ध होईल, यामुळे लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ देणे सहज होणार आहे.
मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमात महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास आयुक्त श्रीमती आर. विमला, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, महीला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, सहसचिव श्री. अहिरे, उपसचिव व्ही.ठाकूर, उपायुक्त विजय क्षिरसागर, राजमाता जिजाऊ मिशनचे संचालक संजीव जाधव, अवर सचिव जहांगीर खान, कार्यक्रम अधिकारी तिक्षा संखे, दिग्विजय बेंद्रीकर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पथदर्शी प्रकल्प मार्गदर्शक
प्रधान सचिव श्रीमती आय.ए. कुंदन म्हणाल्या की, गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पथदर्शी स्वरुपामध्ये चंद्रपूर, अमरावती, जालना, पालघर, नंदुरबार आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर या प्रणालीच्या मदतीने वेबसाईट आधारित अॅपमध्ये लाभार्थ्यांची माहिती भरण्यास सुरवात केली होती. महिला व बालकांच्या स्थलांतरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास करुन अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांच्या मदतीने मोबाईल अॅपमध्ये लाभार्थ्यांची माहिती भरण्यात आली होती. स्थलांतरित लाभार्थ्यांना त्या ठिकाणी (डेस्टिनेशन) अंगणवाडीच्या सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रक्रियेतील आलेल्या आव्हानांचा अभ्यास करून अॅपमध्ये तशा प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या. आता राज्यभर स्थलांतरित लाभार्थींची नोंद घेण्याची प्रक्रिया या मोबाईल अॅपमध्ये यानिमित्ताने सुरु होणार आहे.
राजमाता मिशनचे कार्यक्रम अधिकारी यांनी विकसित केली प्रणाली
राजमाता मिशन चे कार्यक्रम अधिकारी तिक्षा संखे, शिवानी प्रसाद, दिग्विजय बेंद्रीकर शिंदे यांनी ही प्रणाली विकसित केली आहे. https://mahamts.in/login हे संकेतस्थळ असून गुगल प्ले स्टोअरमध्ये MahaMTS हे ॲप उपलब्ध आहे.यामध्ये जिल्हा,आय सीडी एस प्रकल्प निवड बिट निवड अशी माहिती अगदी सहजरित्या विभागातील अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना भरता येणे शक्य आहे.
विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी होणार उपयोग
MahaMTS अॅप आणि https://mahamts.in/login मध्ये माहिती आहार वाटप, लसीकरण, अमृत आहार योजना, आरोग्य तपासणी इ. प्रभावीपणे राबवता येवू शकते. गर्भवती महिला, स्तनदा महिला, शून्य ते तीन वर्षे वयोगटातील मुले, तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुले व 6-18 वर्ष वयोगटातील बालके यांचा मूळ पत्ता हंगामी स्थलांतरित होण्याची कारणे याची संपूर्ण माहिती मिळू शकते.