मुक्तपीठ टीम
शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्त्वाचा असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या मानसिकतेतही परिवर्तन घडवून आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे भारत सरकारचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय व राज्य शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, केंद्रीय पंचायत राज विभागाचे सचिव राजेश कुमार, अतिरिक्त सचिव चंद्रशेखर कुमार, सह सचिव रेखा यादव, राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, यशदाचे उप महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, देशात व राज्यात शाश्वत विकासांच्या ध्येयांची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील पंचायत राज संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ग्राम पंचायतीमध्ये या ध्येयांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने नऊ संकल्पना निश्चित केल्या असून या संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासोबतच देशाच्या विकासात भर घालण्यासाठी गावाला स्वच्छ – सुंदर बनवावे लागेल. यासाठीच पंचायत राज विभागाच्या माध्यमातून सरपंचांना महत्त्वाचे अधिकारी देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना विकास काम तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी थेट निधी देण्यात येतो. गावात मूलभूत सुविधांसोबतच गाव स्वच्छ, सुंदर, पाणी, आरोग्य यासह गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असे ते म्हणाले.
राज्यात राळेगण सिद्धी व हिवरेबाजार या गावांनी ग्राम विकासात केलेले काम समोर ठेवून सरपंचांनी आपले गाव स्वच्छ, सुंदर व जलसमृद्ध करावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, शहराप्रमाणे गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. गावाला सुरक्षित व समृद्ध करण्यासोबतच गावांचा शाश्वत विकास करण्यासाठी सरपंचांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. संकल्प, स्वप्न, सामर्थ्य या तीन सूत्रांच्या आधारे सरपंच काम करतात. शाश्वत विकासाचे लक्ष साध्य करण्यासाठी सरपंचासोबतच गावातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
जलजीवन मिशनच्या माध्यमातून ‘हर घर नल’ संकल्पना पूर्ण करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. पाणी वाचविण्यासाठी गावात विचार होण्याची गरज आहे. स्वच्छ, सुंदर गावासोबत जलसमृद्ध गाव निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच दिशादर्शक ठरेल. राज्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे सर्वोतोपरी मदत करेल असे त्यांनी सांगितले.
सचिव सुनिल कुमार म्हणाले, देशाला विकासित करण्यात ग्रामीण भारताची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. गाव व शहर हा भेद दूर करण्यासाठी १७ उद्दिष्टांपैकी ९ उद्दिष्टे केंद्रीत करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.
राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, पंचायतराज विभागाने शाश्वत विकासासाठी नऊ संकल्पना विकसीत केल्या आहेत. नऊ संकल्पना विचारात घेत ग्रामपंचायतींना विकासाचे नियोजन करावयाचे आहे. राज्यात राळेगण सिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा ही आदर्श गावे आहेत. लोकसहभाग व शासकीय योजनांची जोड देवून हजारो गावे विकासाच्या प्रक्रियेत पुढे येत आहेत. महाराष्ट्रात ग्राम विकासाच्या दृष्टीने अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरतो आहे. यासाठीच ग्राम विकासाचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जलसमृद्ध गाव, स्वच्छ गाव पुस्तिका तसेच नऊ उद्दिष्टांवर आधारीत पोस्टर पुस्तिका व ‘ग्राम विकासाचा रोड मॅप’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महा ई ग्राम पोर्टलचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी देशातील विविध राज्यातील सरपंच, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा- क्रीडा मंत्री गिरीश महाजन
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
गुजरात येथे सुरू झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, क्रीडा संचालक सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, खजिनदार धनंजय भोसले, क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते
गिरीश महाजन म्हणाले, प्रशिक्षक, संघटक, व्यवस्थापक आणि खेळाडूंनी मित्रत्वाच्या भावनेने एकत्रीतपणे उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करावे. खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. खेळाडूंनी शास्त्रोक्त पद्धतीने सराव करून चांगली कामगिरी करावी. शासनातर्फे खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल.
खेळाडूंचा भोजन भत्ता वाढवून २०० ऐवजी ४८० करण्यात आला आहे. गावपातळीवर चांगल्या सुविधा असाव्यात यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे आणि व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
दिवसे म्हणाले, बालेवाडी येथे १५ क्रीडा प्रकारांचे सर्व शिबीर सुरू असून राज्यात इतरत्रही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहेत. खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात क्रीडा विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून शासनास सादर करण्यात येईल. प्रत्येक खेळाडूंची माहिती डिजिटल स्वरूपात ठेवण्यात येईल. खेळाडूंनी गुजरात येथील स्पर्धेत खिळाडूवृत्तीने सहभाग घेऊन सुवर्ण कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
प्रास्ताविकात शिरगावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेविषयी माहिती दिली. खेळाडूंना शासनातर्फे उत्तम सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
३४ क्रीडाप्रकारात खेळाडू पदकासाठी लढणार
गिरीश महाजन यांनी बालेवाडी येथील सराव शिबिरात सहभागी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पदक विजेत्या महाराष्ट्र टेबल टेनिस संघांचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी स्पर्धेला भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३४ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचे ७०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ध्यानचंद पुरस्कारार्थी प्रदीप गंधे हे पथकाचे नेतृत्व करत असून बॅडमिंटन खेळाडू चिराग शेट्टी आणि कबड्डी खेळाडू सोनाली शिंगटे यांच्या ध्वजधारक संचलनात पथकाच्या अग्रभागी असतील.
स्पर्धेसाठी पुण्यातील बालेवाडी येथे महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मागील दोन आठवड्यापासून खेळाडू या स्पर्धेसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहेत.
स्पर्धेचे औपचारिक उदघाटन २९ सप्टेंबर रोजी होणार असून तिरंदाजी, कनॉइंग कयाकिंग, फुटबॉल, कबड्डी, खो खो, लॉन टेनिस, नेमबाजी, रोईंग, रब्बी ट्रायथालन मल्लखांब, सॉफ्ट टेनिस, रोलर स्केटिंग, योगासन अथलेटिक्स, बॉक्सिंग, तलवारबाजी, ज्युडो, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलिंग, सॉफ्ट बॉल, स्क्वश, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी आणि जलतरण या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा सहभाग आहे.
या स्पर्धेतील काही स्पर्धांना उद्घाटनापूर्वीच सुरुवात झाली आहे. यामध्ये टेबल टेनिसचा समावेश आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पदके मिळवली आहेत. महाराष्ट्राचा महिला संघ रौप्य तर पुरुष संघाला कांस्य पदकाचा मानकरी ठरला.