मुक्तपीठ टीम
मध्य प्रदेशातील उज्जैनमधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वरच्या नवीन कॉरिडॉरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या महाकाल कॉरिडॉरची पहिली झलक समोर आली आहे. या कॉरिडॉरमुळे मंदिराला वेगळी शोभा आली असून, मदिर अधिक भव्य आणि आकर्षित दिसत आहे. ड्रोनद्वारे काढण्यात आलेल्या दृश्यात हा कॉरिडॉर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
महाकाल कॉरिडॉरचे काम दोन टप्प्यात केले जात असून त्यासाठी सुमारे ७५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या कॉरिडॉरला भेट दिली. पाहणीनंतर त्यांनी सांगितले की, आज जे काम पाहिले त्याबद्दल मी समाधानी आहे. ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन कॉरिडॉरचे उद्घाटन करणार आहेत.
उज्जैनमधील महाकाल कॉरिडॉरचे ड्रोनद्वार दृश्य टिपण्यात आले…
- काशी विश्वनाथ मंदिरात बांधलेल्या कॉरिडॉरपेक्षा हा कॉरिडॉर मोठा असल्याचे बोलले जात आहे.
- महाकाल मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये १८ हजार मोठी रोपे लावण्यात येत आहेत.
- आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथून रुद्राक्ष, बिल्वची पाने आणि शमीची रोपे मागविण्यात आली आहेत.
- त्रिवेणी संग्रहालयाच्या मागे ९२० मीटर लांबीचा महाकाल कॉरिडॉर, दोन भव्य प्रवेशद्वार, कमळ तलाव, सप्त ऋषी वन, नवग्रह वाटिका, महाकाल प्लाझा, रुद्रसागर समुद्रकिनारी सुशोभीकरण, प्रसाद, तिकीट काउंटर, नूतन विद्यालय परिसर, गणेश विद्यालय संकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
- कॉरिडॉरमध्ये २५ फूट उंच आणि ५०० मीटर लांब लाल दगडाच्या भिंतीवर शिव महापुराणात वर्णन केलेल्या घटनांवर आधारित भित्तिचित्रे आहेत.
- त्याच वेळी, १०८ खांब स्थापित केले आहेत, ज्यावर भगवान शंकराच्या विविध मुद्रा तयार केल्या आहेत.
- ई-रिक्षा व इतर वाहनांचे मार्गही तयार आहेत. तसेच रुद्रसागरात गटाराचे पाणी साचू नये यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली आहे, त्रिवेणी संग्रहालयासमोर सरफेस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाकाल कॉरिडॉरमध्ये भाविकांना कोणत्या सुविधा मिळणार?
महाकाल कॉरिडॉरमध्ये भाविकांसाठी सार्वजनिक प्लाझा, किओस्क सेंटर, तिकीट काउंटर, रेस्टॉरंट, पिण्याचे पाणी, शू स्टँड, क्लोक रूम, वेटिंग रूम आणि प्रसाधनगृहे असतील.