आमदार प्रसाद लाड
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी एक लेख लिहिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त लिहिलेला हा लेख सध्या चर्चेत आहे तो त्यांनी मांडलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमुळे. नेमके त्यांनी त्या लेखात काय मांडले आहे, ते थेट वाचा जसं आहे तसं:
“सावरकरांचे हिंदुत्व हेच खरे राष्ट्रीयत्व…!”
देशात सध्या विचित्र पद्धतीचे कोलाहल माजले आहे. हिंदुस्तान, हिंदू धर्म, हिंदुत्व हे शब्द जरी उच्चारले तरी काहींच्या मस्तकाचा पारा चढतो. मग अशा वेळी विचार येतो आपण नेमके राहतो कुठे? आपली मातृभूमी, कर्मभूमी कोणती आहे? भारत, इंडिया कि हिंदुस्तान? आज हा प्रश्न पडण्यामागे कारण म्हणजे तात्याराव अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी तात्यारावांनी प्रायोपवेशन करून देहत्याग केला होता. देशप्रेम म्हणजेच हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व या विचारांवर ठाम असणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले की आजच्या देशातील परिस्थिती बद्दल विलक्षण चीड येते. सावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व जर प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वातंत्र्यानंतर रुजवले गेले असते तर आज देशाचे चित्र वेगळे असते.
‘आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका।
पितृभू: पुण्यभूश्र्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ।।’
या दोन ओळींमध्ये सावरकरांनी हिंदु कोणाला म्हणावे हे स्पष्ट केले आहे. या ओळीच्या संस्कृतमधील व्याख्येनुसार सिंधुनदीच्या स्रोतापासून सिंधुसागरापर्यंत असलेल्या भागाला भारत म्हणतात, हे भौगोलिक स्पष्टीकरण आहे. तर त्या भूमीमध्ये असणारे सर्व हिंदू आहेत का तर नाहीत, तर ते हिंदू हे कोण, तर ती भूमी त्यांच्या वाडवडिलांची आहे, जी भूमी त्यांच्या आचरणातील धर्माच्या स्थानाची, वा त्यांचे धर्मगुरू असणारी वा प्रेषित असणारी म्हणजेच इंग्रजीत ज्या भूमिला ‘होलीलँड’ म्हणता येईल, अशी ही पुण्यभूमी आहे, अशा लोकांना हिंदु म्हणता येते, असे सावरकरांना म्हणावयाचे आहे. त्यात त्यांनी कोणत्याही जातिचा उल्लेख केलेला नाही, मुळात एक राष्ट्र म्हणून नेमके उभे करावयाचे तर त्यासाठी नेमक्या व्याख्येची आवश्यकता काय, ते लक्षात घेऊन त्यांनी हिंदु व अहिंदु असे दोन स्वतंत्र भाग केले आहेत. मात्र ते नीट टप्प्याटप्याने समजून घेतले गेले पाहिजे, तरच त्यांच्या हिंदुत्वाबाबत लोकांपर्यंत नेमकेपणाने ती माहिती पोहोचविता येईल. तात्यारावांना असे का म्हणावयाचे आहे ते नीट लक्षात घेतले तर अनेक वाद टळू शकतील, मुळात त्यांनी सांगितलेला हिंदू हा धर्म सर्वसाधारणपणे हिंदू हा रिलिजन म्हणून ज्या पद्धतीने आपण विचार करतो, त्या प्रकारातील नाही. सर्व वर्ण, जाती, उपजाती असलेल्या हिंदू धर्मातील लोकांना ते हिंदू म्हणतानाच, चारही वर्ण हे विलय पावलेले आहेत. त्यामध्ये परपस्परांनी एकमेकांशी कसे वागावे यासाठी त्यांनी आनुवांशिक सूत्रांनाही विचारात घेतलेले आहे. मात्र ते करताना त्यांनी मानवतेचा विचार प्राधान्याने केला आहे. त्यांची काही विधाने वा लेखातील वाक्ये त्यांच्या भूमिकेला पुरेशी स्पष्ट करणारी आहेत. आमची खरी जाती मनुष्य. खरा धर्म माणुसकी, मानवधर्म, खरा देश पृथ्वी, खरा राजा ईश्वर, अशी आमची अत्युदात्त भावना आहे. मुसलमानांच्या त्या संघर्षात धार्मिक काय किंवा राजकीय काय, दोन्हीही आघाड्यांवर हिंदुंचा जो घात मुसलमानांनी केला नाही, तितका घात हिंदुंतीलच जन्मजात जातिभेदाचा रोटीबंदीपासून शुद्धिबंदीपर्यंतच्या रुढींनी केला आहे.असे सावरकर सांगतात. सनातनी नाशिककर हिंदु बंधूंना लिहिलेल्या एका पत्रात मंदिर प्रवेशाच्या अनुषंगाने सावरकर म्हणतात. पंचवटीच्या श्रीराममंदिचे देऊळ आपल्या पूर्वास्पृश्य हिंदु बंधुंना इतर स्पृश्य हिंदुप्रमाणेच उघडे करावे, …. साठसत्तर पिढ्या त्यांनी वाट पाहिली, आणखी किती वाट त्यांनी पाहायची असाही सवाल ते करतात. जातिभेद मोडण्यासाठीही त्यांची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी सात बेड्यांचा उल्लेख केला यात वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पशर्बंदी, सिंधुबंदी, शुद्धिबंदी, रोटीबंदी व बेटी बंदी याचा समावेश असून या बेड्या तोडा असे ते सांगतात. यानुसार ते म्हणतात वाटेल त्या हिंदुजातीच्या वरवधुशी विवाहबद्ध होण्यास जन्मजात अटीची त्यात कोणतीही आडकाठी नसावी, तसा विवाह बहिष्कार्य न मानता ते पूर्णपणे सव्यवहार्य मानले जाले, मात्र अहिंदूशी विवाह करताना त्या अहिंदू व्यक्तीस हिंदू करून घेतल्यानंतरच विवाह करावा,हिंदुराष्ट्राच्या हितार्थच ही बाब आहे. जोवर मुसलमान मुसलमानच राहू इच्छितात, ख्रिश्चन ख्रिश्चन राहू इच्छितात तोवर हिंदुनेही हिंदुच राहाणे भाग आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ज्या दिवशी ते धर्मीय मानवधर्मात वा मानवराष्ट्रात समरस होण्यासाठी समानतेने सिद्ध होतील, त्या दिवशी हिंदुराष्ट्रही त्याच मानवधर्मच्या ध्वजाखाली मनुष्यमात्रांशी समरस होईलच किंबहुना असा मानवधर्म ही हिंदुधर्माची परिसीमा नि परिपूर्णता मानलेली आहे. स्वदेशातील या सात बेड्या वा शृंखला तोडल्या की पोथिजात जातिभेदाचा विषारी दात तरी उपटून काढला गेलाच म्हणून समजा, इतका सुस्पष्ट जातिभेद तोडण्याची भूमिका असणारा सावरकरांचा हिंदुधर्म आहे.
आजच्या घडीला निर्माण झालेला कोलाहालावर तात्यारावांच्या या विचारांच्या अंमलाची गरज आहे.
हिंदू राष्ट्र म्हणून सर्वांनी एका छताखाली येऊन नवराष्ट्राची उभारणी करण्याची गरज आहे. चोहोबाजूंनी उभ्या टाकलेल्या नव्या आव्हानांना समोरे जाण्यासाठी एकत्मिकतेचे विचार आणि आचरण हे केवळ सावरकरांच्या याच विचारांमधून मिळते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हाय विचारांनी जर देशाची पायाभरणी आणि उभारणी झाली असती तर हिंदुस्तानाने अवघ्या जगाचे नेतृत्व केले असते. असो… येणारा काळ स्वातंत्र्यवीरांना अपेक्षित असलेल्या राष्ट्रनिर्माणासाठी खर्ची होवो आणि हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी जावो, हेच वचन त्यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करत आहोत.