मुक्तपीठ टीम
नवी मुंबईतील कामोठे येथील डेंटल कॉलेजमध्ये चार सिनियर वर्गातील विद्यार्थ्यांवर ज्युनिअर वर्गातील विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौघांनी १९ वर्षीय तरुणाला दारू पाजली आणि त्याला ट्राऊझरमध्येच लघवी करायला भाग पाडले. कॉलेजने या चार विद्यार्थ्यांना निलंबित केले असले तरी अजून यांना कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
काय आहे नेमकं प्रकरण?
- ही कथित घटना जुलैमध्ये घडली होती, ज्युनियर वर्गातील हा विद्यार्थी कोल्हापुरचा रहिवासी आहे.
- पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला हा जुनियर वर्गातील विद्यार्थी तीन बॅचमेटसह कामोठे येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो.
- त्याच पदवी अभ्यासक्रमाच्या तिसर्या वर्षात शिकत असलेले तीन सिनियर विद्यार्थी, त्याच ठिकाणी दुसऱ्या फ्लॅटमध्ये भाडेकरू आहेत.
- कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीच्या एका प्राध्यापकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चार सिनियर्सनी ज्युनियर आणि त्याच्या तीन रूममेटला त्यांच्या घरी येऊन जबरदस्तीने दारू प्यायला सांगितले.
- कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव म्हणाल्या, “कोल्हापूरच्या या ज्युनियरने जेव्हा वॉशरूमला जायचे असे म्हटले तेव्हा त्यांनी त्याला तसे करण्यापासून रोखले. उलट, त्याला पाणी पिण्यास भाग पाडले आणि त्याला ट्राऊझरमध्येच लघवी करण्यास सांगितले.”
हा विद्यार्थी अस्वस्थ दिसला त्यामुळे पालकांनी त्याला विचारले असता, त्याने रॅगिंगबद्दल सांगितले आणि त्यानंतर त्यांनी ई-मेलद्वारे कॉलेजकडे तक्रार केली.
महाराष्ट्रातील रॅगिंगच्या काही घटना…
- २०२०च्या फेब्रुवारी महिन्यात बीडच्या नाळवंडी येथील विद्यार्थ्याने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती. गणेश कैलास म्हेत्रे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो उदगीरच्या धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयातील बीएएमएसचा विद्यार्थी होता.
- २०१९च्या मे महिन्यात डॉ. पायल तडवी हिचं आत्महत्या प्रकरणही गाजलं होतं. पायलने रॅगिंगला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. पायल ही बी.एल.नायर हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
- २०१३ मध्ये नितीन पाडाळकर या १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. नितीन त्यावेळी नवी मुंबईतील रामराव आदिक अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनच्या दुसर्या वर्षात शिकत होता. या प्रकरणात दोन विद्यार्थ्यांवर गुन्हाही दाखल झाला होता.