मुक्तपीठ टीम
नोटाच नोटा. सोने, हिरे, मोती. सारं घबाड सापडलं आहे जालन्यात. जालना हा पोलाद उद्योगासाठी ओळखला जातो. याच पोलाद उद्योगातील काही कारखानदारांवर आयकर धाडी पडल्याने खळबळ माजली आहे. स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने धाडी घातल्या. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या या कारवाईत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. त्यात ५८ काेटींची राेकड, ३२ किलाे साेन्याचे दागिने, हिरे, माेती असा १६ काेटींचा ऐवज तसेच सुमारे ३०० काेटींच्या बेहिशेबी मालमत्तेचा समावेश आहे. औरंगाबादमध्येही अशा धाडी पडल्या आहेत.
जालन्यातील धाडींसाठी आयकर विभागाच्या ३०० अधिकाऱ्यांचे खास पथक आले होते. जालन्यातील स्टील उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांच्या मालमत्तेवर धाडी पडल्या. या कारवाईत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानी स्टील उद्योजकांच्या कंपन्यांसह घरावर धाडी घातल्या. आयकर पथक पोलाद कारखानदारांकडे मिळालेलं घबाड पाहून चक्रावूनच गेलं. या धाडींमध्ये ३२ किलो सोनं, ५८ कोटी रुपयांची रोख रक्कम अशी एकूण ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागली. त्यामुळे स्वाभाविकच खळबळ उडाली आहे. बँक, फायनान्सर, व्यापारी आणि कारखानदारांच्या घरांसह कार्यालयावर एकाचवेळी आयकर खात्याकडून धाडी घालण्यात आल्या.
रोकड ठेवण्यासाठी ३५ पिशव्या!
जालन्यात मिळालेली राेकड स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत नेऊन माेजण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली माेजणी रात्री १ वाजेपर्यंत चालली. त्यासाठी १० ते १२ मोजणी यंत्रे लागली. नोटांची बंडले एवढी जास्त होती की ३५ कापडी पिशव्या लागल्या.
आयकर टीमसाठी कोडवर्ड!
धाडी गोपनीय राहण्यासाठी कोडवर्डचा वापर करण्यात आला. आयकर पथकांनी धाडी घालताना पोलाद व्यावसायिक व त्यांच्याशी संबंधित लोकांना कळू नये, बातमी फुटू नये यासाठी खूप काळजी घेतली. मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा पथकामध्ये समावेश होता. त्यांच्या वाहनांमधून लग्नाचे वऱ्हाड प्रवास करतेय, असं भासवण्यासाठी वरवधूंच्या नावांचे स्टिकर लावले होते. काहींनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असा मजकूर असलेले स्टिकर लावले होते. तसेच टीममधील अधिकाऱ्यांना कोडवर्ड दिले होते.