मुक्तपीठ टीम
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. पत्राचाळ प्रकरणात १०३९ कोटींचा घोटाळ्यासंबंधित आरोप ठेवण्यात आला आहे. संजय राऊत यांना अटक करण्यात आली. संजय राऊत यांना अटक करण्यात आलेला पत्राचाळ घोटाळा प्रकरण आहे तरी काय? तसेच प्रवीण राऊत कोण आहेत? याचा आढावा घेऊया…
नेमकं काय आहे पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण ?
- पत्राचाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या ६७२ कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी २००८ मध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ची रहिवाशांनी नियुक्ती केली.
- ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती.
- म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला.
- याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता.
- मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला ४१४ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला.
- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गैरव्यवहारासाठी म्हाडा प्रशासनाला धारेवर धरले होते.
- त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले.
- एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली.
- या प्रकरणात सर्वात मोठा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे.
- गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.
कोण आहेत प्रवीण राऊत?
- प्रवीण राऊत हे वसई विरार भागातील आहेत.
- तेथील राजकारण, बांधकाम व्यवसाय मोठा प्रभाव असणाऱ्या ठाकूर कुटुंबाच्या सोबत ते होते.
- संजय राऊतांचंही त्या काळात ठाकुरांशी चांगलं होतं.
- पुढे ठाकुरांशी प्रवीण राऊतांचं बिनसलं.
- या प्रकरणात ‘ईडी’ने २ फेब्रुवारीला अटक केलेले प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे ईडीचा दावा आहो.
- प्रवीण राऊत हे गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत.
- या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाशी करार केला होता.
- ही चाळ तब्बल ४७ एकरांवर वसली असून तेथे ६२७ भाडेकरू आहेत.
- या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावीत, असा करार २०१०मध्ये करण्यात आला होता.
- त्यानंतर प्रवीण राऊत यांनी हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे (एचडीआयएल, डीएचएफएफ समूहातील कंपनी) राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी घेत या चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) परस्पर अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली.
- याद्वारे त्यांनी बेकायदा तब्बल १,०७४ कोटी रुपये जमवले.
- त्याचवेळी पत्राचाळीचा एक इंचही पुनर्विकास केला नाही.
- त्याशिवाय याआधारे त्यांनी बँकेतूनही ९५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले.
- हा सर्व पैसा प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले.
- यातील ८३ लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले.
- त्याच रकमेतून वर्षा संजय राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला, असा ईडीचा आरोप आहे.