मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर मतप्रदर्शन केले आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडायची घाई करायला नको होती, असे म्हटले. त्यावर ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाला मतदान करून फुटीर आमदार उघडे पडलेच. तसंच त्यांनी राजीनाम्यामागचे कारणंही उघड केलं, ते म्हणाले, ”मला सातत्याने असे भासवलं जात होते की, काँग्रेस दगा देणार आणि पवारसाहेबांवर तर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. पण मला माझ्याच माणसांनी दगा दिला. मग सभागृहात एका जरी माणसाने माझ्याविरोधात मत दिलं असतं तर ते माझ्यासाठी लज्जास्पद होतं.”
उद्धव ठाकरे मुलाखतीत काय बोलले?
- शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली…
- बरं, आधी भाजपाबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे.
- भाजपा नको असे सांगणारे हेच लोक…. गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही.
- भाजपा शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता.
- २०१९ साली भाजपाने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला.
- तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात.
- मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय.
माझाही हाच प्रश्न आहे, त्यांना नक्की काय हवंय?
- त्यांची लालसा स्वतला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले.
- आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की, ‘ही आमची शिवसेना’ म्हणून.
- अत्यंत घाणेरडा, दळभद्री प्रकार !
शिवसेनाप्रमुखांशी तुलना तुम्हीही कधी केली नाही….
- हो ना… आणि हे बघितल्यानंतर मला नाही वाटत, भाजप त्यांना कधी पुढे करील.
- नाही तर नंतर ते नरेंद्र भाईशी तुलना करतील स्वतःची आणि पंतप्रधान पद मागतील.
- शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना!
- ही चटक आहे.
- मला एका गोष्टीचं समाधान आहे.
- मी पण अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक लागली नाही.
- तो सत्तापिपासूपणा रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि कुणी तुमचं नसतं तेच त्यांचं आज झालं आहे.
इतक्या मोठय़ा प्रमाणात आमदार फुटताहेत किंवा आपल्याला सोडून चाललेत हे चित्र जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा तुमच्या मनात काय भावना होती?
- माझ्या मनात हेच आले की, हे सगळे… यातले अनेक जण … त्यांनी कितीही काही म्हणो.
- माझ्या कुटुंबाचेच घटक होते.
- मी भेटत नव्हतो!
- अहो, माझ्या ऑपरेशनच्या काळात मी हलू शकत नव्हतो तेव्हा भेटू काय शकणार होतो.
- माझे हात-पाय हलत नव्हते.
- इतर वेळी ‘हे’ आमच्या कुटुंबातीलच एक होते.
- निधी वगैरे दिला नाही म्हणाल तर त्या दिवशी तर अजित पवारांनी सांगितलेय की, ह्यांच्या एका खात्याला बारा हजार कोटी दिले.
- काही ठिकाणी शेवटच्या काळात असमानता आहे असं मला वाटलं तेव्हा काही निधीवाटपाला मी स्थगितीही दिली होती.
- याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित दादा, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा सुरू होती की, निधीवाटपात अशी असमानता असेल तर हा प्रश्न आपण सोडवायला हवा…आणि अधिवेशन सुरू असताना अशोकराव चव्हाण यांच्यासोबत बसून आम्ही त्यांच्या खात्याचा विषय सोडवला होता.
तुमचा संपर्क नव्हता असे ते म्हणतात….
- बरं, आता तर या सर्व आमदारांशी बैठका सुरू केल्या होत्या.
- एका बाजूला माझे आमदार तर एका बाजूला प्रशासन बसवून चर्चा सुरू होती.
- काम कुठे अडलेय हे मी स्वतः पाहत होतो.
- समस्या विचारत होतो.
- मुख्यमंत्री म्हणून तिथल्या तिथे सूचना देत होतो.
- तेव्हा सगळ्या आमदारांना विचारत होतो की आता काय प्रॉब्लेम आहे का?
- तर तेव्हा सांगितले जात होते की, साहेब, काही नाही.
- तुम्ही आता जसे भेटलात तसे आम्हाला भेटत रहा.
- आम्हाला दुसरे काही नको… आणि माझे हेच म्हणणे आहे की, तुम्हाला हे करायचेच होते तर तुम्ही समोर येऊन का बोलला नाहीत
- डोळयात डोळे घालून बोलण्याची हिंमत तुम्ही का दाखवली नाहीत? म्हणजेच तुमच्या मनात पाप होतं.
लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, स्वतः उद्धव ठाकरे सुरतला गेले असते तर….
- कशासाठी?
- माझ्या मनात पाप नव्हतं.
- मी तुम्हाला बोलवत होतो की, माझ्यासमोर येऊन बसा, बोला.
- की समजा राष्ट्रवादी तुम्हाला त्रास देतेय.
- मी त्यांना या शब्दांत सांगितलं होतं की, ज्या आमदारांना २०१४ साली भाजपाने दगा दिला तरीसुद्धा भाजपासोबत जायचंय?
- पण आम्ही गेलो भाजपबरोबर.
- २०१९ सालीसुद्धा आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही.
- शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी याच आमदारांविरुद्ध भाजपाने त्यांचे बंडखोर उभे केले होते असे याच आमदारांचे म्हणणे आहे.
- त्यांचेच अनुभव आहेत.
- म्हणजे भाजपाला तेव्हा आणि आताही शिवसेना संपवायचीच होती. त्यांच्याबरोबर हे गेले.
भाजपाच्या इतक्या भजनी लागायचे काय कारण असावे?
- मला असं सांगण्यात आलं, काही आमदारांचा दबाव आहे की, आपल्याला भाजपसोबत जायचंय.
- मी म्हटलं, अशा सगळ्या आमदारांना आणा माझ्यासोबत.
- दोन-तीन प्रश्न माझ्या मनात आहेत.
- एक म्हणजे कारण नसताना शिवसैनिकांना ईडीपिडी लावली. छळ चाललाय.
- ते हिंदुत्वासाठी त्या वेळेला दंगलीत लढलेले शिवसैनिक ज्यामध्ये अनिल परब असतील किंवा हिंदुत्वाची बाजू लावून धरलेले तुम्ही असाल, यांना तुम्ही एकदम छळायला लागलात.
- हा छळ कुठपर्यंत चालणार. कारण नसताना… असा यांचा काय मोठा गुन्हा आहे?
- दुसरी गोष्ट, त्यावेळी जे ठरवून नाकारले त्याचे यावेळी भारतीय जनता पक्ष आता काय करणार?
- शिवसेनेला सन्मानाची वागणूक कशी देणार?
- तिसरी गोष्ट मला आमदारांना विचारायचीय, खासदारांना मी त्या दिवशी ‘मातोश्री’वरच्या बैठकीत विचारलीय की, गेली अडीच वर्षे कोणी हिंमत केली नाही असं बाळासाहेबांच्या कुटुंबीयांवर ‘मातोश्री’वर अश्लाघ्य भाषेत बोललं गेलंय, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात?
- मधल्या काळात तुम्ही का बोलला नाहीत, की आम्हाला हे मान्य नाही.
- एवढं सगळं तुमच्या नेत्यांच्या कुटुंबीयांबद्दल, घराबद्दल, नेत्याबद्दल, ‘मातोश्री’बद्दल बोलूनही तुम्ही शेपटया घालून जाणार? जसे भुजबळांबद्दल बोलले जाते.
- भुजबळांनी अटकेचा प्रयत्न केला.
- मात्र भुजबळांनी व्यवस्थित खुलासा केलाय.
- स्वतः भुजबळ आणि शिवसेनाप्रमुखांची भेट ‘मातोश्री’त झाली तो सगळा संवाद जो काही होता त्याला मी पण साक्षीदार होतो.
- आणि बाळासाहेबांनी त्यांना माफ केले. बाळासाहेबांनी सांगितले की, यापुढे आपले वैर संपले!
बाळासाहेब हे उमद्या स्वभावाचे होते. त्यांनी अनेक वेळा शत्रूलाही माफ केले…
- बरोबर आहे. मात्र तसं हे जे काही यांनी केलंय त्याचं पुढे काय होणार आहे की, ही सगळी बदनामी सहन करून केवळ तुमचा आग्रह आहे म्हणून मी शिवसेनेला त्यांच्या पदरी बांधू का नेऊन दाराशी बांधू?
- तुम्हाला जायचे तर तुम्ही जाऊ शकता, पण शिवसेनेला सन्मानानं वगैरे बोलवताहेत ते त्यांनी आधी का नाही केलं?
- जे ठरल्याप्रमाणे केलं असतं तर आता अडीच वर्षे झाली होती.
- एकतर त्यांचा मुख्यमंत्री झाला असता किंवा शिवसेनेचा.
- बरं, मी हेदेखील सांगितले होते की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद पहिली अडीच वर्षे दिले असते तर मी अडीच वर्षांनी ज्या दिवशी राजीनामा द्यायचा आहे.
- त्या तारखेला दिनांक-वार टाकून, त्यावर मुख्यमंत्र्यांची सही आणि खाली तारीख टाकून पक्षप्रमुख म्हणून माझी सही करून, की अमुक एका दिवशी या तारखेला या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री पायउतार होईल आणि या पत्राचे होर्डिंग करूनच ते मंत्रालयाच्या दारावर लावले असते.
देवेंद्र फडणवीस भाजपाचे इकडले सगळ्यात मोठे नेते. ते पाच वर्षे मुख्यमंत्री होते….
- देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भाजपा असे का वागले हे मलाही समजले नाही, पण ठीक आहे.
- तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे.
- त्यांच्या पक्षातले जुनेजाणते निष्ठावान, त्यावेळी आमच्या बरोबर युतीत असणारे अनेक नेते आजही माझ्या संपर्कात आहेत.
- पण ते निष्ठेने भाजपासोबत आहेत.
- त्यांच्याबद्दल मला असा गैरसमज करू नाही द्यायचा की, त्यांना शिवसेनेसोबत यायचे आहे.
- मी उगाच असा पोकळ दावा करणारही नाही.
- मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत.
- पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपचे काम करताहेत. बाहेरच्या माणसांना सर्व दिलं जातंय.
- त्यांच्या डोक्यावरती बाहेरची माणसे बसवली.
- त्यावेळी वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून बाहेरच माणूस.
- आता मुख्यमंत्रीपदी इतर पदांवरही बाहेरचे.
- तरीही ते निष्ठा म्हणून काम करीत आहेत.
‘तुम्ही अचानक ‘वर्षा’ सोडलंत ध्यानीमनी नसताना….
- जसा ध्यानीमनी नसताना तेथे गेलो, तसा ध्यानीमनी नसताना निघालो.
- एक गोष्ट लक्षात घ्या.
- जी गोष्ट आपली नाही ती मिळविण्यात आनंद असता कामा नये आणि जी गोष्ट आपली नव्हतीच ती सोडण्यात काहीच वाईट वाटण्याचे कारण नाही.
- जी माणसे आपली नव्हती ती सोडून गेली त्याच्यात वाईट वाटण्याचे कारण नाही असंच मी म्हणेन.
- आम्ही त्यांना मानत होतो आपलं.
- ती चूक ठरली!
‘वर्षा’ही सोडतोय. मुख्यमंत्री पदही सोडतोय, तेव्हा महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू होते… हे चित्र पाहून आपल्याला काय वाटले?
- तो प्रसंग म्हणजे एक वेगळ्या अर्थानि माझ्या आयुष्याचे सार्थक झाले असे मी मानतो.
- आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले.
- मीसुद्धा होतो आणि मी गेलो.
- आताही ते आहेत.
- त्यांना सुद्धा कधीतरी जावं लागणार आहे.
- पण बरं झालं बाबा, गेला… असं बऱ्याचदा म्हटलं जातं किंवा गेले तर गेले, दुसरे येतील, असंही म्हटलं जातं, पण एखादा मुख्यमंत्री पायउतार होतो आणि लोपं गलबलतात.
- मला वाटते की हे आशीर्वाद आणि ही कमाई माझ्या आयुष्यात फार मोठी आहे.
- कारण लोकांना मी आपला वाटलो, आपला वाटतो.
- याखेरीज दुसरे काय आयुष्यात पाहिजे!
- प्रेम पैशाने खरेदी करता येत नाही.
- पैशाने विकत घेतलं जाऊ शकत नाही.
- अनेकांनी मला सांगितलं की, तुम्ही बोलताना आमच्या कुटुंबातलंच कुणी बोलतंय असं वाटतं.
- हे भाग्य फार क्वचित कोणाच्या नशिबात लाभतं.
तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असतात… तर काय झालं असतं?
- हो, पडलाय ना.
- तसाही तो उघडाच पडलाय.
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फुटीर गट उघडा पडलाच ना!
- त्याच्या आधीही उघडा पडला.
- आता तर रोजच उघडा पडत चालला आहे.
- निवडणूक आयोगाकडे जे पत्र दिलंय त्याच्यातही शिस्तभंगाची कारवाई आहे.
- मी पहिलंच म्हटलं होत की, हल्ली लोकशाहीत डोकं वापरण्यापेक्षा मोजण्याकडेच जास्त उपयोग होतोय
मग नक्की काय झालं?
- मला सातत्याने असे भासवलं जात होते की, काँग्रेस दगा देणार आणि पवारसाहेबांवर तर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही.
- तेच तुम्हाला पाडतील असेच सगळे म्हणायचे. अजित पवारांबद्दलही माझ्याकडे येऊन बोलायचे.
- मात्र मला माझ्याच माणसांनी दगा दिला. मग सभागृहात एका जरी माणसाने माझ्याविरोधात मत दिलं असतं तर ते माझ्यासाठी लज्जास्पद होतं.
- पण त्यांनी जरी शेवटच्या काळात नीट सांगितले असते तरी सगळे सन्मानाने झाले असते.
- अगदी शेवटच्या काळात सुद्धा मी या विश्वासघातक्यांना तसे विचारलेही होते की, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? ठीक आहे ना, आपण बोलू. आपण काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलू.
- भाजपासोबत जायचे आहे का, तर भाजपकडून आपल्याला या दोन-तीन प्रश्नांची उत्तरं मिळू द्या.
- ठीक आहे, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जाऊन सांगू की माझी लोकं तुमच्यासोबत काही आनंदाने राहायला तयार नाहीत. पण त्यांच्यात तेवढी हिंमत नव्हती.
- कारणंच नाहीत ना काही. रोज नवी कारणं पुढे येताहेत.
म्हणजे तुमची मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी होती?
- माझी मुळातच मुख्यमंत्रीपद स्वीकारायचीच तयारी नव्हती.
- पण त्या काळात एका जिद्दीने मी ते केले, मी इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो, तर एका जिद्दीने झालो.
- मुख्यमंत्री झालो.
- जिद्दीच्या बळावर अडीच वर्षाच्या काळात माझ्या परीने कारभार केला..
- तुम्ही अडीच वर्षे राज्याचा कारभार केलात. सरकार चालवलंय. आजच्या नवीन सरकारकडे तुम्ही कसे पाहता?
- सरकार स्थापन झाल्यावर याच्यावरती ‘बोलण्यात’ अर्थ आहे.
- कारण सध्या ‘हम दो, एक कमरे मे बंद हो.. और चाबी खो जाय’ असेच सर्व सुरू आहे.
- चाबी ‘वरनं’ जेव्हा उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.