मुक्तपीठ टीम
आबालवृद्ध सारे एकवटतात. शाळकरी मुलं. शिक्षक. रस्तोरस्ती. वाड्या वस्त्यांवर फिरतात. शिवारातून एकच नाम घुमतो…आपलं लातूर, हिरवंगार लातूर…त्यातून साकारते एक मोहीम…एक लोकसहभागातून साकारते वृक्ष लागवड मोहीम.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने हिरवाईची मोहीम सुरु झाली आहे. जिल्ह्यातील लोकांना बरोबर घेऊन वृक्षारोपणासाठी मोठं पाऊल उचललं गेलं आहे. मांजरा नदीकाठावर दहा किलोमीटरपर्यत वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली आहे. भातखेड येथे वृक्ष लागवडीचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते वृक्षरोपण करून उदघाटन करण्यात आले. त्यातून जिल्हा प्रशासनाकडून व नागरिकांच्या सहभागातून लातूर जिल्हा हिरवागार करण्याचा शुभारंभ झाला.
पण हे आता खूप छान असलं तरी सोपं नव्हतं. त्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल खास प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट लोकांना सहभागासाठी आवाहन केले.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातच नव्हे, तर राज्यात लातूरचे ०.६ टक्के वनाच्छादित आहे. वनाचं क्षेत्र सरासरी ३३ टक्के इतके असणे आवश्यक आहे. लातूरचा इतिहास असा आहे की, लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. जिल्हा प्रशासन, नागरिक, संस्था, ग्रामपंचायत तसेच शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने याही वर्षी लागवड करण्यात येत आहे. वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज समजून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वृक्ष लागवडीची प्रक्रिया सातत्याने अविरत आपल्याला जबाबदारी समजून सुरु ठेवावी लागणार आहे. जिल्ह्यातील नागरिकही याबाबतीमध्ये जागरुक आहेत. या वृक्ष लागवडीसाठी नागरिकांतून सहभाग प्रोत्साहन मिळत आहे, ही छोटी चळवळ असून अविरतपणे सुरु ठेवणार आहोत.
सेल्फी पॉईंट ठरला आकर्षण
११ वाजून ११ मिनिटांनी, १० किलोमीटरची मानवी साखळी, २८ हजार वृक्षाची लागवड… या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार असा सेल्फी पॉईंट ग्रीन वृक्ष टीमने केला होता. ते सेल्फी पॉईंट मध्ये स्वतः जिल्हाधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फोटो काढला… नंतर अनेक लोकांनी फोटो काढून घेऊन आपल्या डीपी ला लावला.
वृक्ष लागवड पुढीलप्रमाणे झाली
लातूर तालुक्यातील भातखेडा येथे २ हजार रोपे, सोनवती येथे २ हजार रोपे, धनेगाव येथे ४ हजार रोपे, शिवणी खुर्द येथे ५५०रोपे, भातांगळी येथे ३ हजार ५००, भाडगाव येथे १ हजार, रमजानपूर येथे १ हजार ५००, उमरगा येथे २ हजार, बोकनगाव येथे २ हजार ३००, सलगरा बु. ४ हजार १००, बिंदगिहाळ ५००, औसा तालुक्यातील शिवणी बु. ३ हजार, तोंडवळी येथे २ हजार, होळी येथे २ हजार असे गावनिहाय वृक्ष लागवड करण्यात आली.
एकूणच लोकांना सोबत घेतलं, सरकारी अधिकाऱ्यांनी इच्छाशक्ती असली तर काहीच अशक्य नसंत. वृक्षलागवडीचा हा लातूर पॅटर्न हेच सांगतो!