मुक्तपीठ टीम
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच NTPC लेह, लडाख येथे भारतातील पहिले हरित हायड्रोजन इंधन केंद्र उभारणार आहे. प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेमुळे लेह आणि आसपासच्या परिसरात उत्सर्जन मुक्त वाहतुकीच्या नवीन युगाची सुरुवात होईल. या नव्या हरित दळणवळण क्षेत्रामध्ये आघाडी घेणार्या काही मोजक्या देशांपैकी भारत एक असेल. सुरुवातीला एनटीपीसी या प्रदेशात ५ हायड्रोजन इंधन सेल बस चालवण्याची योजना आखत आहे. हे काम उभारण्याचे काम अमारा राजा पॉवर सिस्टिम्स लिमिटेडला देण्यात आलं आहे.
हा पथदर्शी प्रकल्प लेहच्या आत्यंतिक टोकाच्या परिस्थितीमध्ये समुद्रसपाटीपासून ३६०० मीटर उंचीवर -१४ अंश ते +२० अंश सेल्सिअस तापमानातील फरकासह उभारला जात आहे. १.३ अब्ज डॉलर्सच्या अमारा राजा समूहाचा एक भाग असणाऱ्या अमारा राजा पॉवर सिस्टीम्सची त्यांच्या तांत्रिक कौशल्यावर आधारावर या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निवड करण्यात आली. २०७० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेच्या अनुषंगाने हा सरकारचा पहिला उपक्रम आहे. राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियानाचा एक भाग असलेला हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात ग्रीन हायड्रोजन मोबिलिटी आणि स्टोरेज प्रकल्पांचा अग्रदूत असेल. तसेच देशभरात सर्वत्र अनेक इंधन केंद्रांचा अभ्यास आणि उभारणीसाठी उपयुक्त ठरू शकेल.
पुनर्वापर उर्जा स्त्रोतांद्वारे निर्माण केलेल्या विजेद्वारे इलेक्ट्रोलिसिस पद्धती वापरून हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये पाण्याचे विभाजन करून ग्रीन हायड्रोजन तयार केले जाईल अशा प्रकारे हायड्रोजन उत्पादित केल्याने कार्बनफूटप्रिंट राहणार नाही. या प्रतिष्ठित प्रकल्पाबद्दल बोलताना, अमारा राजाचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य गौरिनेनी म्हणाले, “गेल्या तीन दशकांपासून आम्ही पॉवर सिस्टीम आणि एनर्जी स्टोरेजच्या व्यवसायात आहोत आणि या काळात आम्ही सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या शिखरावर राहण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातील संभाव्य ऊर्जा स्त्रोत म्हणून हायड्रोजन असून त्यासाठी यासारखे प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहेत. एनटीपीसीचे विशासू कंत्राटदार म्हणून सेवा सुरू ठेवण्याचा आम्हाला सन्मान वाटतो.”
ईपीसी विभागाचे व्यवसाय प्रमुख द्वारकानधा रेड्डी पुढे म्हणाले, “हा आव्हानात्मक प्रकल्प आमच्या ईपीसी कौशल्याची पुष्टी करेल आणि ग्रीन हायड्रोजन पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात प्रवेश करणारे पहिले असल्याबद्दल आम्ही खूप उत्साहित आहोत.”
हा पथदर्शी प्रकल्प ९९.९७7% शुद्ध हायड्रोजनचे किमान ८०किलोग्रॅम/दिवस उत्पादन करेल. तो कॉम्प्रेस्ड, साठवला जाईल आणि वितरित केला जाईल.
अमारा राजा समुहा बद्दल
अमारा राजा हे भारतातील आघाडीच्या व्यावसायिक समूहांपैकी एक आहेत ज्यामध्ये लीड-अॅसिड बॅटरीज (AMARON ब्रँड), पॉवर कन्व्हर्जन उत्पादने, शीट मेटल उत्पादने, प्लॅस्टिक मोल्डिंग, अचूक घटक, इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा, पायाभूत सुविधांचा विकास, औद्योगिक सेवा, अन्न प्रक्रिया, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांचा समावेश आहे. अमारा राजा भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक बॅटरी उत्पादकांपैकी एक आहे आणि जगभरातील अनेक देशांना त्याची उत्पादने निर्यात करते. समूह १६,००० हून अधिक लोकांना रोजगार देत असून त्यांची उलाढाल १.३ अब्ज डॉलर इतकी आहे.