मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशातील प्रयागराजमधील अटाळा येथे झालेल्या गोंधळाचा मुख्य सूत्रधार जावेद मोहम्मदवर मोठी कारवाई करण्यात आली. प्रयागराज डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PDA) घरावर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह पीएसी कर्मचारीही घटनास्थळी तैनात होते. जावेदवर कठोर कारवाई होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार होती. अखेर ही चर्चा खरी ठरली असून त्याचं घर जेसीबीच्या आणि बुलडोझरच्या साहाय्यानं पाडण्यात आलं आहे.
अशी करण्यात आली कारवाई!
- रविवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती.
- सकाळी ११ च्या सुमारास कारली पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने पोलीस दल आणि पीएसी कर्मचारी जमा झाले होते.
- काही वेळाने पोलीस, पीएसी, पीडीए आणि महानगरपालिकेचे पथक जेके आशियाना येथे आरोपी जावेदचा आलिशान दोन मजली बंगला असलेल्या परिसरात पोहोचले.
- अधिकाऱ्यांसोबत दोन जेसीबी आणि पोकलँड मशीन होते.
- तोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी घरात उपस्थित महिलांना घर रिकामे करण्यास सांगितले असता त्यांनी विरोध केला.
- अधिकाऱ्यांनी एक तासाचा अवधी देऊन सामान बाहेर काढण्यास सांगितले.
- वेळ संपल्यानंतर दुपारी १२.१५ च्या सुमारास बुलडोझर आणि पोकलँड मशिनच्या साह्याने पाडकामाला सुरुवात झाली.
- प्रथम मुख्य दरवाजा आणि तळमजल्यावरील बाउंड्री वॉल पाडण्यात आले आणि नंतर एक एक करून घराचे इतर भाग पाडण्यात आले.
- ५ तास ही कारवाई सुरू होती.
अधिकारी म्हणाले, परवानगी घेतली नाही
- हे घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे पीडीए अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
- तळमजला आणि पहिल्या मजल्यावर बांधकाम करण्यापूर्वी प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.
- याप्रकरणी १० मे रोजीच घर मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचा दावा केला होता.
- नोटीसमध्ये २४ मे ही सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती, परंतु घर मालक हजर झाला नाही आणि कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात आले नाही.
- २५ मे रोजी बंगला पाडण्याचे आदेश जारी करून त्याची प्रत घरावर चिकटवून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.
- ९ जून २००२ पर्यंत बंगला स्वतः पाडून प्राधिकरणाला कळवा, असेही आदेशात म्हटले आहे.
- केवळ सूचनांचे उल्लंघन केल्याने १० जून रोजी बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्यामध्ये १२ जूनची तारीख निश्चित करताना सकाळी ११ वाजेपर्यंत घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरच ही कारवाई झाली.
एक कोटीहून अधिक नुकसान
- रविवारी झालेल्या कारवाईत मास्टरमाईंड जावेदला एक कोटींहून अधिकचे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
- त्यांचे आलिशान दुमजली घर सुमारे १५०० स्क्वेअर फूट परिसरात बांधले होते.
- सध्याच्या बाजारभावानुसार ५० हजार रुपये प्रति चौरस यार्ड किंमत गृहीत धरली तरी जमिनीची किंमत ८० लाखांपेक्षा जास्त आहे.
- त्यात बांधकाम खर्चाची भर पडल्यास एकूण संपत्ती सुमारे १.२५ कोटी होईल.