मुक्तपीठ टीम
देशात टोलसाठी सगळीकडे फास्टॅग आवश्यक आहे. आतापर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर ८९% टोल फास्टॅगने जमा होऊ लागला आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे एनएचएआयच्या माहितीनुसार, एका महिन्यात फास्टॅगच्या माध्यमातून २ हजार ३०३ कोटी रुपयांची टोल वसुली करण्यात आली. जे डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या २०१ कोटींच्या संकलनापेक्षा ११ पट जास्त आहे.
१७ फेब्रुवारी रोजी फास्टॅगच्या माध्यमातून ६० लाख व्यवहार झाले. या व्यवहारांमध्ये ९५ कोटी रुपये वसूल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांत सुमारे अडीच लाख फास्टॅगची विक्री झाली आहे.
नॅशनल हायवे एथॉरिटी ऑफ इंडियाने १ मार्च पर्यंत विनामूल्य फास्टॅग वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलवरून हा फास्टॅग उपलब्ध होतो. यासाठी १०० रुपये द्यावे लागतात.
१५ फेब्रुवारीपासून देशभरात फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. दुचाकी वगळता सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये फास्टॅग आवश्यक असेल.
देशात सध्या २.५४ कोटीहून अधिक फास्टॅग वापरकर्ते आहेत. फास्टॅग २०१४ मध्ये लाँच झाला होता. या टोल प्लाझामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शुल्क भरण्याची सुविधा आहे.
काय आहे फास्टॅग?
• फास्टॅग हा टॅग किंवा स्टिकरचा एक प्रकार आहे.
• त्याच्यावर वाहनाची सर्व माहिती बारकोडमध्ये नोंदवलेली असते.
• हे स्टिकर वाहनाच्या विंडस्क्रीनवर म्हणजे समोरच्या काचेवर लावले जाते.
• या तंत्रज्ञानाद्वारे टोल प्लाझावरील कॅमेरे स्टिकर्सचा बार कोड स्कॅन करतात.
• स्टिकरवरील बारकोडमध्ये नोंदवलेल्या माहितीसह वाहनधारकाचे खाते जोडलेले असते.
• टोलचे शुल्क फास्टॅगच्या खात्यामधून आपोआप वजा केले जातात.
• टोल प्लाझावरील खर्च कमी, दिरंगाई दूर आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी हे उपयोगी ठरते.
पाहा व्हिडीओ: