तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. त्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बहुमतासाठी लागणारे १४५ आमदारांचे पाठबळ उरलेले नसल्याने ठाकरेंना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असेही राणे म्हणाल्याचं माध्यमांमधील बातम्यांवरून कळत आहे. मुक्तपीठनं राज्यसभा निवडणुकीतील मतांच्या आकड्यांची पडताळणी करून नारायण राणेंचा दावा फेक की फॅक्ट ते तपासलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाकडून राज्यसभा विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यासाठी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती. त्यावेळी नारायण राणेंनी महाविकास आघाडी त्यातही शिवसेना आणि ठाकरेंवर कडवट टीका केली.
नारायण राणेंचा महाविकास आघाडी सरकार अल्पमतात गेल्याचा दावा
- नारायण राणे यांनी महाविकास आघाडीने बहुमत गमावल्याचा दावा केला.
- शिवसेनेची स्वत:ची मते त्यांच्या उमेदवाराला मिळालेली नाहीत., संजय राऊत फक्त एका मताने पराभूत होण्यापासून वाचले. महाविकास आघाडीचे आठ ते नऊ आमदार फुटले आहेत. याचाच अर्थ सरकार अल्पमतात आले आहे.
- बहुमतासाठी १४५ आमदारांचं पाठबळ लागतं, तेही तुमच्याकडे नाही.
- तुम्ही महाराष्ट्राला १० वर्ष मागे नेलं आहे.
- उद्धव ठाकरे यांना आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
- त्यांनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.
काय आहे वास्तव?
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आघाडी सरकार अल्पमतात आल्याचा आरोप केला असला तरी तसं दिसत नाही.
- महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या २८८ आहे, त्यातील एक सदस्य आमदार रमेश लटकेंचं निधन झाल्याने सध्या २८७ सदस्य आहेत.
- त्यामुळे बहुमताचा आकडा हा १४४ आहे.
- राज्यसभा निवडणुकीतील पहिल्या पसंतीची मते पाहिली तर काँग्रेस ४४ + राष्ट्रवादी काँग्रेस ४३ + शिवसेना ४१ + ३३ म्हणजे १६१ आमदारांनी आघाडीच्या चार उमेदवारांना पहिल्या पसंतीची मते दिली आहेत.
- भाजपाला ४८ + ४८ + २७ म्हणजेच १२३ आमदारांनी पहिल्या पसंतीची मते दिली आहेत.
- भाजपाने सहावी जागा जिंकताना दुसऱ्या पसंतीच्या मतांचे बळ वापरले आहे, पण ते त्यांच्या कोट्यातून आणि वळवलेल्या अपक्ष, बविआ आमदारांच्या बळावर आहे.
आघाडी आणि भाजपा कोणाकडे किती आमदार?
- महाविकास आघाडीसोबत १६१ आमदार आहेत.
- याचा अर्थ महाविकास आघाडीकडे बहुमतासाठी आवश्यक १४४पेक्षा १७ आमदारांचं बळ जास्त आहे.
- सहावी जागा जिंकल्यानंतरही भाजपाकडे १२३ आमदारांचंच बळ आहे.
- याचा अर्थ राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आजही भाजपाकडे २१ आमदार कमी आहेत.
फेक की फॅक्ट?
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या या दाव्याबद्दल राजकीय वर्तुळात केवळ टोकाच्या शिवसेनाद्वेषातून त्यांनी तसं विधान केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण भाजपाने सहावी जागा जिंकली असली, तरी महाविकास आघाडीला मिळालेली मतेही बहुमतासाठी आवश्यक मतांपेक्षा जास्त आहेत.
- त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा हा फेक असल्याचे दिसत आहे.