मुक्तपीठ विश्लेषण
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातील हातरुण जिल्हा परिषद मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचा विजय हा सध्या जिप सत्तेत असलेल्या पक्षाचं संख्याबळ एका सदस्यानं वाढवण्याइतकाच मर्यादित नाही. तर हातरुणसारखा हातातील मतदारसंघ गमावणाऱ्या शिवसेनेसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. मागे शिवसेनेने आघाडी करून लढताना त्याआधी तीनदा जिंकलेली विधानपरिषदेची जागा गमावली होती. तर आता राष्ट्रवादीसोबत आघाडीतून लढताना जिपची जागा गमावली आहे. काँग्रेस वेगळी लढली असली तरी तिची मते मिळवूनही शिवसेनेला विजय शक्य नव्हता. त्यामुळे विदर्भात शिवसेनेला आघाडी पावताना दिसत नाही, असंच चित्र आहे.
शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना या पोटनिवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा १६४१ मतांनी दणदणीत विजय झाला. वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगावकर यांनी शिवसेनेचे उमेदवार अश्विनी गवई यांचा पराभव केला. हा विजय मिळवून शिवसेनेची जागा हिसकावत जिल्हा परिषदेत वंचितची ताकद वाढली आहे. मुळात गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं ३०५३मते मिळवत विजय मिळवला होता. पण यावेळी १० टक्के मते गमावत शिवसेनेचा पराभव झाला आहे. तर वंचितची मते २९५६हून ४३०१ म्हणजे जवळपास २५-३०टक्के वाढली आहेत. तर स्वतंत्र लढणाऱ्या काँग्रेसची गेल्या निवडणुकीतील २११६ मते फक्त ३६२वर आली आहेत. ती मते वंचितकडे गेल्याचं दिसत आहे. भाजपाने आपली २ हजारावरील मते तशीच टिकवली आहेत. त्यामुळे फटका बसला आहे, तो शिवसेनेलाच!
अकोला जिल्हा परिषद
एकूण जागा : ५३
- वंचित बहुजन आघाडी : २३
- शिवसेना : १२
- भाजप : ०५
- काँग्रेस : ०४
- राष्ट्रवादी : ०४
- प्रहार : ०१
- अपक्ष : ०४
हातरुण पोटनिवडणूक आताचा निकाल
- शेगोकार लिना सुभाष – ४३०१ वंचित (विजयी)
- गवई अश्विनी अजाबराव -२६६० शिवसेना
- पाटेकर राधिका संदिप -२०९१ भाजप
- इंगळे रशिका ब्रम्हदेव – ३६२ काँग्रेस
- भटकर अनिता रविंद्र – ३९ अपक्ष
हातरुण सर्वसाधारण निवडणूक
- शिवसेना – ३०५३
- वंचित बहुजन आघाडी – २९५६
- भाजप – २१४३
- काँग्रेस – २११६
हातरुण सर्कलसाठी मतदान :
- अकोल्यात जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या हातरुण सर्कलसाठी ५ जून रोजी ५६ टक्के मतदान झालं होतं.
- या पोटनिवडणुकीत सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते तर दोघांनी अर्ज मागे घेतले होते.
- त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगोकार, भाजपच्या राधिका पाटेकर, शिवसेनेच्या अश्विनी गवई, काँग्रेसच्या रसिका इंगळे यांच्यासह अपक्ष अनिता भटकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
- त्यात वंचितच्या लिना शेगोकार आणि शिवसेनेच्या अश्विनी गवई यांच्यात मुख्य लढत झाली आणि वंचितचा विजय झाला.
हातरुणमध्ये पोटनिवडणूक का? :
- हातरुण सर्कलमधून शिवसेनेच्या सुनीता सुरेश गोरे विजयी झाल्या होत्या.
- मात्र उमेदवारी अर्ज सादर करताना सुनीता गोरे यांनी सोनाळा इथल्या मालमत्तेचा २०१४-१९ पर्यंतच कर भरला नाही.
- मोरगाव भाकरे इथल्या शेतजमिनीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केलेला नाही, असा आरोप करत विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती.
- विभागीय आयुक्तांनी गोरे यांना अपात्र घोषित केलं होतं. त्यामुळे इथे पोटनिवडणूक घेण्यात आली.
शिवसेनेला मानहानीजनक पराभवाला सामोरे जावं लागलं!
- हातरुण सर्कल मध्ये शिवसेनेच्या सुनीता गोरे या निवडुन आल्या होत्या. मात्र त्यांना अपात्र घोषित केल्याने येथे पोटनिवडणुक पार पडलीय.
- पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले असून काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढले.
- त्यामुळे या पोटनिवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली आहे.
- दरम्यान शिवसेनाचा हां गड असलेला हातरुण जिल्हा परिषद गटावर वंचितने विजयी मिळवला.
- दरम्यान ही निवडणूक सेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्या साठी प्रतिष्ठेची मानली जात होती. कारण देशमुख ते बाळापूर मतदार संघाचे आमदार असून त्यांच्या मतदारसंघातील हातरूण गटासाठी निवडणूक होती.
- आमदार देशमुख यांची जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती झाल्यावर पहिल्याच निवडणुकीत त्यांना मानहानीजनक पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.
- २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली होती.
आता वंचितची ताकद वाढली!!
- अकोला जिल्हा परिषदेत एकूण ५३ सदस्य आहेत.
- सध्या सत्तेत असलेली वंचित जिल्हा परिषदेच्या संख्याबळात अल्पमतात आहे.
- वंचितचं स्वत:च्या २३ सदस्यांसह दोन सहयोगी अपक्षांसह २५ संख्याबळ आहे.
- २०२० मध्ये झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या अनुपस्थित राहण्यामूळे वंचितची सत्ता जिल्हा परिषदेत आली होती.
- मात्र, अलिकडे पाच महिन्यांपूर्वी दोन सभापती पदांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, प्रहार आणि दोन अपक्ष एकत्र येत वंचितचा पराभव केला होता.
- या पराभवामूळे वंचितचं संख्याबळ एकने वाढल्याने २५ झालं आहे. तर विरोधकांकडे २८ सदस्य आहेत.
- पुढच्या महिन्यात होणार्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापती पदाच्या निवडणुकीत वंचितची ताकद वाढली आहे.
- पाच सदस्य असलेल्या भाजपच्या पवित्र्यावर पुढच्या महिन्यातील सत्तेचं समिकरण अवलंबून आहे.