मुक्तपीठ टीम
पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर कतार आणि कुवेतने नाराजी व्यक्त केली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं रविवारी देशातील राजदूतांना बोलावून घेतलं. कतारचे परराष्ट्र मंत्री सुल्तान बिन साद अल-मुराइथी यांनी भारतीय राजदूतांना कतारच्या अधिकृत प्रतिक्रियेचं निवेदनच सोपवलं. यामुळे नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना भाजपामधून निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावरून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच पक्षावर टीका केली आहे. स्वामींनी ट्वीट करून केंद्र सरकारने कतार या छोट्या देशासमोर लोटांगण घातल्याचा आरोप केला आहे.
काय म्हणाले स्वामी?
- सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारच्या संपूर्ण आठ वर्षांच्या कार्यकाळातील परराष्ट्र धोरणाचे वाभाडे काढले आहेत.
- मोदी सरकारच्या कार्यकाळात भारत मातेला शरमेने मान खाली घालावी लागली, असा आरोप स्वामींनी केला.
- आम्ही लडाखमध्ये चिनी लोकांसमोर रेंगाळताना, रशियन लोकांसमोर गुडघे टेकताना आणि अमेरिकन लोकांसमोर विनवणी करताना दिसलो.
- आता आम्ही कतार या छोट्याशा देशासमोर लोटांगण घातले.
- ही आपल्या परराष्ट्र धोरणाची पडझड आहे.
नेमकं प्रकरण काय?
- भाजपा नेत्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यासंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं दोहा या ठिकाणी असलेले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांना बोलावून घेतलं.
- कतारचे परराष्ट्र मंत्री सुल्तान बिन साद अल-मुराइथी यांनी भारतीय राजदूतांना कतारच्या अधिकृत प्रतिक्रियेचं निवेदनच सोपवलं.
- OECने म्हटलं की, पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्यं करणाऱ्या आणि मुस्लिमांविरोधात हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जावी.
- भारतीय दूतावासाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं, “दोन्ही देशाच्या राजदूतांदरम्यान बैठक झाली.
- या बैठकीत धार्मिक व्यक्किमत्त्वांवर भारतातील काही जणांकडून केल्या गेलेल्या आक्षेपार्ह ट्वीटसंबंधीही चिंता व्यक्त करण्यात आली.
- हे ट्वीट कोणत्याही पद्धतीने भारत सरकारच्या विचारांचं प्रतिनिधीत्व करत नाही.
- हे ‘समाजविघातक तत्त्वां’चे विचार आहेत.
- ‘आमचा सांस्कृतिक वारसा आणि विविधतेत एकता या परंपरेला अनुसरून भारत सरकार सर्व धर्मांचा सन्मान करतं.
- अपमानास्पद विधान करणाऱ्यांविरोधात आधीच कठोर कारवाई करण्यात आली आहे.
- भारत-कतारच्या संबंधाबद्दल गैरहेतू मनात असलेल्यांकडून या अपमानास्पद विधानांचा वापर लोकभावना भडकविण्यासाठी केला जात आहे.