मुक्तपीठ टीम
एकेकाळी राज्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या सूतगिरण्यांची आज जी अवस्था झाली, तशी अवस्था साखर कारखानदारीची होऊ नये, यासाठी बंद साखर कारखाने तातडीने सुरू करायला हवेत.
हे कारखाने बंद का पडले, याच्या खोलात जावे लागेल. ते सुरू करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. साखर कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या महिन्याभरात धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी दिले.
येथील राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खा. श्रीनिवास पाटील, आ. मानसिंगराव नाईक, आ. अरुण लाड, आ. सुमनताई पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, राऊ पाटील, सरचिटणीस शंकरराव भोसले आदी उपस्थित होते.
खा. शरद पवार म्हणाले, साखर उत्पादनात आपण उत्तर प्रदेशलाही मागे टाकले आहे. याचे श्रेय शेतकर्यांच्याबरोबरच कामगारांनाही द्यायला हवे. सहकारी साखर कारखानदारी उभी करण्यात सहकारमहर्षी स्व. विठ्ठलराव विखे-पाटील, स्व. वसंतदादा पाटील, स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. लोकनेते राजारामबापू पाटील, स्व. तात्यासाहेब कोरे आदी मंडळींचे मोठे योगदान आहे. आज सहकारी साखर कारखान्यांना खासगी कारखान्यांची मोठी स्पर्धा आहे. तज्ज्ञ कामगार खासगी कारखानदारीकडे वळत आहेत. त्यामुळे सहकारातील कामगारांनाही प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
ते म्हणाले, एकेकाळी राज्यात सर्वात मोठा कापड गिरण्यांच्या उद्योग होता. गिरणगाव, लालभागात १२० कापड गिरण्या आणि २ लाख गिरणी कामगार होते. आज गिरणगावात फक्त एक गिरणी तीही कमी कामगारात सुरू आहे. मात्र, साखर उद्योग अनेक आव्हानांना सामोरे जात टिकून आहे, वाढतो आहे, ही समाधानकारक बाब आहे. पुणे येथील वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये कामगारांच्या दुसर्या पिढीला तांत्रिक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कामगारांना १०-१० महिने पगार मिळत नाही, त्यांनी जगायचे कसे? साखर कामगार संघटनेच्या दिवंगत नेत्यांनी साखर कामगारांचे हित जोपासताना ऊस उत्पादक शेतकर्यांचेही हित पाहिले आहे. त्यांची आठवण ठेवायला हवी.
कामगारांनी उठाव करावा…
जयंत पाटील म्हणाले, खा. पवार हे साखर उद्योगातील शेतकरी, कामगार आणि तोडणी मजुरासह सर्व घटकांचे आधारस्तंभ आहेत. साखर उद्योगातील कोणताही प्रश्न त्यांच्याकडे गेल्याशिवाय मार्गी लागत नाही. सध्या देशातील कामगार अस्वस्थ आहे. मात्र, केंद्राच्या कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात कामगारांमधून अपेक्षित तीव्र प्रतिक्रिया आलेली नाही. भविष्यात कामगार चळवळ अधिक मजबूत करीत कामगार विरोधी घटकांच्या विरोधात तीव्र संघर्ष करायला हवा.
कामगारांना प्रशिक्षण…
बाळासाहेब पाटील म्हणाले, पगारवाढीच्या चर्चेत अनेक वादाचे प्रसंग आले. खा. पवार यांनी दिलेला निर्णय आपण सर्वांनी मान्य केला. सध्या काही साखर कारखाने करार करीत नाहीत आणि केला तर अंमलबजावणी करीत नाहीत. याबद्दल राज्यातील सहकार विभाग नक्की दक्षता घेईल. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये राज्यातील साखर कामगारांना प्रशिक्षण देऊन कुशल कामगार घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी जाचक अटींचा विचार करून आपण त्या विरोधात उभा रहायला हवे.
नोकरभरतीवर अंकुश हवा…
हसन मुश्रीफ म्हणाले, सहकार चळवळ पुढे न्यायची असेल, तर बरं नव्हे खरं बोलावे लागेल. अनावश्यक नोकरभरती कारखान्यांच्या मुळावर उठली आहे. एखाद्या साखर कारखान्याने पॅटर्नच्या बाहेर जाऊन नोकरभरती केल्यास कामगार संघटनेने विरोध करायला हवा. तसेच सहकार खात्यानेही काही बंधने घालायला हवीत. जे साखर कारखाने चांगले चालले आहेत, त्यांनी महिन्याच्या महिन्याला पगार द्यायला हवा. कामगार आयुक्त तसा आदेश देतील. मात्र, जे साखर कारखाने अडचणीत आहेत, त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू.
विश्वजित कदम म्हणाले, कामगार कायद्यात ज्या काही जाचक अटी आल्या आहेत, त्या राज्य सरकारच्या नाहीत. याचा अभ्यास राज्यातील कामगारांनी करावा. आपले प्रश्न सोडवित आपल्या हिताला प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील. पी. आर. पाटील म्हणाले, स्व. बापू, ना.जयंत पाटील यांनी सातत्याने कामगारांना आपल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे वागणूक दिली आहे. साखर निर्यातबंदी म्हणजे साखर दर पाडण्याचे षङयंत्र आहे.
अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले, खा. पवार यांनी कामगार व सहकार मंत्र्यांसमवेत आमची बैठक घ्यावी. आमचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत. कार्याध्यक्ष राऊ पाटील म्हणाले, राज्यातील अनेक साखर कामगारांचे पगार थकले आहेत, यामध्ये खा. पवार यांनी लक्ष घालावे. सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी प्रास्ताविकात साखर कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार हवा, अशी मागणी केली.
उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी आभार मानले. संदीप कदम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपाध्यक्ष विजय पाटील, दूध संघाचे अध्यक्ष नेताजी पाटील, कामगार युनियनचे राजेंद्र चव्हाण, तानाजी खराडे, मोहनराव शिंदे आदी उपस्थित होते.
वसंतदादा कारखान्याची ही अवस्था का?
खा. शरद पवार म्हणाले, एकेकाळी सांगलीचा वसंतदादांचा साखर कारखाना राज्यात नव्हे तर देशात आदर्श कारखाना होता. हा कारखाना पाहण्यासाठी देशभरातून लोक येत होते. आज हा कारखाना खासगी कंपनीच्या ताब्यात असल्याचे समजते. या कारखान्याचे खासगीकरण का झाले, या खोलात मी जाऊ इच्छित नाही. सुदैवाने ना. जयंत पाटील यांनी कारखानदारीला दिशा देणारा राजारामबापू कारखाना राज्यात आदर्श बनवून वसंतदादा कारखान्याची कमतरता भरून काढली आहे, याचा मला अभिमान आहे.
महिन्याभरात प्रश्न मार्गी लावू…
साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या महिन्याभरात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्यांची तातडीची बैठक बोलवावी. या बैठकीला मीही येईन. या बैठकीत हे सर्व प्रश्न निकाली निघावेत, अशी अपेक्षा खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.