मुक्तपीठ टीम
केंद्रातील भाजपा विरोधात देशातील अनेक राज्यातील विरोधक एकत्र येण्याच्या घडामोडी सध्या सुरु आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय स्तरावर बदलाचा दावा केला आहे. त्याचबरोबर दोन-तीन महिन्यांत ‘खळबळजनक बातमी’ समोर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. केसीआर यांनी अलीकडेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची बंगळुरू येथे भेट घेतली होती.
काय म्हणाले मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव?
- मी देवेगौडा आणि एचडी कुमारस्वामी यांची भेट घेतली आहे.
- आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली.
- राष्ट्रीय स्तरावर बदल होणार असून तो कोणीही रोखू शकणार नाही.
- भारत बदलेल…भारत बदलला पाहिजे.
- देशातील परिस्थिती बदलण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.
- “दोन-तीन महिन्यांनी तुम्हाला खळबळजनक बातमी मिळेल.
- केसीआर पुढे म्हणाले, ‘अनेक भाषणबाजी केली जाते, अनेक आश्वासने दिली जातात, पण वास्तव काय आहे? उद्योगधंदे बंद पडत आहेत, जीडीपी घसरतोय, महागाई वाढत आहे… शेतकरी, दलित आणि आदिवासी नाखूष आहेत.
केसीआर पंतप्रधानांना भेटणे टाळतायत…
- विशेष म्हणजे केसीआर यांचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘परिवारवाद’वरून हैदराबादवर निशाणा साधला होता.
- विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये येण्याच्या काही तास आधी केसीआर बंगळुरूला रवाना झाले होते.
- चार महिन्यांत ही दुसरी वेळ आहे की ते पंतप्रधानांना भेटणे टाळत आहेत.
- फेब्रुवारीमध्ये, जेव्हा पंतप्रधान मोदी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते, तेव्हा केसीआर तब्येतीचे कारण देत त्यांना घेण्यासाठी आले नव्हते.
२०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र करण्याच्या उद्देशाने केसीआर नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांनी नुकतीच आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची भेट घेतली होती. आता ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटायला जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय ते बिहारलाही जातील, जिथे ते मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची भेट घेऊ शकतात.