सुमेधा उपाध्ये
आहाराचं स्थान आपल्या जीवनात अत्यंत महत्वपूर्ण आहे. प्रत्येकामधील शक्तिच्या संचारासाठी आहार आवश्यक आहे. हा आहार प्रत्येकाच्या कार्यप्रणालीनुसार घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे. या आहाराबद्दल सर्वांनाच जागृत रहावं लागतं. आपल्या परंपरागत शास्त्रासह अगदी आधुनिक जीवन शैलीतही आहाराकडे विशेष ध्यान देण्याची गरज असते हे नमूद केलेलं आहे. हा आहार जसा शरीर बलासाठी आवश्यक आहे तसाच आपल्या निरोगी राहण्याचं गुपीत त्यात दडलेलं आहे. सकाळचा आहार राजासारखा दुपारचा आहार मध्यम आणि सूर्यास्तानंतरचा आहार भिकाऱ्यासारखा असं म्हटलं जातं . कारण सूर्यास्तानंतर अग्निमंदावलेला असतो. पचन नीट होत नाही. त्यामुळे गरज नसताना जास्त खाणे किंवा छान चव आहे म्हणून खात राहणे याबद्दल अनेकांनी वारंवार जनजागृती केली आहे.
जसं आहाराचा विचार करताना शरीराच्या बलाकडे लक्ष दिलंय तसंच हा आहार केवळ जीभ आणि पाचन शक्तिचा विषय नाही तर आहार हा इंद्रियांचाही आहेच. आपण जसं अनावश्यक आणि गरज नसतानाही कित्तेकदा केवळ अडीच तीन इंचाच्या जीभेचे लाड पुरण्यासाठी खातो ते आपल्या शरीरास घातक ठरत. तसेच ही जीभ जसे अधीक चवीचवीचं खाण्यासाठी नाही. विवेकपूर्ण आहार हवा. आळस निर्माण करणारा, तसंच उत्तेजना देणारा नको आणि आपल्याला क्षीण करणाराही नकोच. भोजनानंतर आळस आला तर आपण अधिक खाल्लेय आणि ते पचवण्यासाठी शरीराची शक्ती फक्त त्याच कामात गुंतली जाते. त्यामुळे आळस येतो. खाल्यानंतर उत्स्फुर्ती आली पाहिजे त्यामुळेच सम्यक आहार संतुलीत आहार महत्वाचे मानले आहे.
आपल्या शरीरास घातक ठरेल असा अती आहार टाळण्याची गरज असते. आवश्यक तेवढाच आहार शांतपणे घेतला तर तृप्तता येते, पोट भरते आणि अधिक खाण्याची इच्छा निर्माण होत नाही. जे शरीरासाठी योग्य असते. पण हा आहार बाकीच्या इंद्रियांचाही असतो. कोणत्याच इंद्रियांना अतिचा उपयोग नसतोच. अनावश्यक नको असते. जो विचार आपण शरीर स्वास्थ्यासाठी योग्य आणि आवश्यक तेवढेच ग्रहण करण्यासंदर्भात केला तोच विचार आपल्या बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या क्षमते संदर्भातही केला तर लक्षात येईल की आपण खूप काही अनावश्यक बोलतो. जे नाही बोललो तरी काहीही फरक पडणार नाहीये. पण तरीही बोलत असतो आणि जास्त बोलण्याच्या सवयीने अडचणीत येतो. तर कित्तेकदा नको तितकं ऐकत राहिल्याने आपण मनात अनेक ग्रह-पूर्वग्रह निर्माण करून कित्तेक संबंध बिघडवत असतो.
जेवढे महत्वाचे तेवढेच बोलले पाहिजे आणि तेवढेच ऐकले पाहिजे. जसं खाद्यपदार्थ हा शरीराचा आहार आहे तसंच ऐकणं, बोलणं, पाहणं हे अन्य इंद्रियांचा आहार आहे. विनाकारण आपण एकमेकांच्या कानात बोलतो आणि त्यातून त्या व्यक्तिचे मन अशांत करतो. ती व्यक्ती आणि दुसऱ्याशी तसंच कानगोष्टी करते, यातून एक साखळी निर्माण होते. आपल्या मनात आपण असंख्य व्यक्तिंना घर करून देतो आणि त्या गर्दीमधून शेवटी आपली मन: शांती ढासळते. यात आपला आणि दुसऱ्याचा वेळ विनाकारण खर्ची पडतो. ऐकण्याच्या आणि साठवून त्याबद्दल धारणा निर्माण करण्याची शक्ती काही विशिष्ट कार्यासाठी देवाने दिली आहे. पण आपण त्याचा गैरवापरच अधिक करत असतो. समज गैरसमज पसरले जातात आणि यातून आपले स्वास्थ आपण उत्तम भोजनाने सुदृढ करण्याचा केलेला प्रयत्ना निष्फळ होतो.
संतुलित आहार आपले विचार शुद्ध ठेवते. सात्विक आहाराने माणसात सात्विकता जोपण्याची वृत्ती वाढिस लागत असते पण त्याचवेळी कानगोष्टींकडे अधीक लक्ष गेल्याने पुन्हा आपण आपला बहुमुल्य जीवन प्रवास अडचणींचा करतो. आपले डोळेही कित्तेकदा दगा देतात. आवश्यक आणि आवश्यक नसलेले ही आपण पहात राहतो. त्याची एक एक धारणा मनात दृढ होते. आपण गाडीतून जाताना रस्त्याच्याकडेला लावलेल्या अनेक फलक वाचत राहतो. अनेक दृश्य पाहतो जे करण्याची गरज आहे का तर नाही. गाडी चालवणारा गाडी चालवत आहे. पोहचण्याचे स्थळ आलेले नाही मग तोपर्यंत आपण डोळे बंद करून आराम करू शकतो. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रीत करू शकतो. पण तसं आपण करत नाही. कारण आपल्याला बाह्य गोष्टींकडे जास्त लक्ष देत राहतो. त्यामुळे कित्तेक संत सांगतात की जेव्हा गरज नाही तेव्हा डोळे बंद करा आणि आपल्या स्वत:च्या आत पाहण्याचा प्रयत्न करा, आपण जे खातो जे ऐकतो जे पहातो या संगळ्यांमधून एक एक प्रतिमा आणि त्याच्या आजूबाजूचे सर्व आपल्या मनात साठत जाते. मन दिसत नाही पण त्याच्यात वाढत्या गर्दीने आपण स्वत:च त्यात हरवत चाललोय. स्वत:चा शोध घ्यायचा असेल. मी कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा असेल तर आपल्याला अशा अनावश्यक आहारापासून दूर जावे लागेल. सर्व प्रकारच्या आहाराचे योग्य नियोजनच आपल्या स्वस्थ जीवनाचा मार्ग प्रशस्त करत जाईल.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)