तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
रमेश लटके यांचं जाणं मनाला चटका लावणारं. ते आमदार होते म्हणून नाही तर शून्याशिखरापर्यंत स्वबळावर प्रवास करणारे जे असतात त्यांच्यापैकी एक म्हणजे रमेश लटके, त्यामुळे माझ्या मनात रमेश लटकेंसाठी एक वेगळं स्थान आहे. अंधेरी ही माझी जन्मभूमी कर्मभूमी. रमेश लटकेही अंधेरीतीलच. अतिशय सामान्य परिस्थितीतील कष्टकरी कुटुंबातील रमेश. त्यांनी विशीतच अंधेरीच्या पंपहाऊस भागात आर. के. स्टुडिओ नावाने व्हीडीओ कॅसेटचा व्यवसाय सुरु केला. त्या दुकानात मी विद्यार्थी दशेत पेपर देत असे. ते माझे ग्राहक होते. माझीही घरची परिस्थिती खूपच सामान्य अशीच. आईनंच मोठं केलं. त्यामुळे अशी अनेक कामं शिकताना करत असे. रमेश लटके तेव्हा दुकानात भेटत. पण त्यावेळीही त्यांच्या सभोताली ग्राहकांपेक्षा समाजातील अडल्या नडल्यांची गर्दी जास्त असे. त्यातूनच मग रमेश लटकेंचा समाज कार्यातील सहभाग वाढत गेला. शिवसेनेच्या माध्यमातून ते राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाले.
सुरुवातीचा टप्पा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा होता. उत्सावाला त्यांनी अधिक भव्य स्वरुप प्राप्त करून दिलं. त्यानंतर शिवसेनेनं रमेश लटकेंना शाखाप्रमुख बनवलं. त्यानंतर १९९७च्या निवडणुकीत ते मुंबई मनपावर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे २००२, २००४, २०१२ त्यांचे नगरसेवक होणे ठरलेलेच होते. २०१४ ची विधानसभा निवडणूक आली. अंधेरी पूर्व शिवसेनेची पूर्वापार जागा असल्याने तेथे युतीतून लढणं सोपं मानलं जायचं. त्यात २०१४ला जास्तच. पण भाजपाने अचानक शिवसेनेशी युती तोडल्याचं जाहीर केलं. शिवसेना नेतृत्वाने रमेश लटकेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्यांनी विश्वास सार्थ ठरवत भाजपासोबतच काँग्रेसला धूळ चारत विजय मिळवला. रमेश लटके आमदार रमेश लटके झाले.
त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती झाली. सोपी लढत होईल असं वाटलं. पण अंधेरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते मुरजी पटेल भाजपात गेले होते. ते भाजपाच्या सत्तेतील काही जवळच्या नेत्यांच्या अगदी जवळचे झाले होते. शिवसेना भाजपा युतीनंतर मुरजी पटेलांनी बंडखोरी केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपाचे बंडखोर शिवसेनेविरोधात उभे राहिले तसेच अंधेरीतही झाले. अनेकांना वाटले आता काही खरं नाही. पण रमेश लटकेंनी आव्हान स्वीकारलं. मुरजी पटेल तसे आर्थिकदृष्ट्या बलाढ्य. २०१४नंतरच्या नव्या भाजपासाठी निवडणूक जिंकण्यासाठीच्या गुणवत्तेत अर्थपूर्णता खूप महत्वाची. ती त्यांच्याकडे होती. सुदैवाने आमदार रमेश लटकेंचा जनसंपर्क, अंधेरीकर सामान्यांशी भाषा-धर्मापलीकडचं नातं, खरंतर आपुलकी कामी आली. त्यात पुन्हा २०१४ला भाजपाकडून त्यांच्याविरोधात लढलेले सुनील यादव बंडखोर पटेलांऐवजी रमेश लटकेंसोबत उभे राहिले. रमेश लटके भाजपाच्या बंडखोर पटेलांवर मात करत निवडून आले.
आमदार रमेश लटके कधीही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील राजकारणात, सत्ताकारणात रमलेले दिसले नाही. ते आपलं काम, आपला मतदारसंघ यातच जास्त वेळ घालवत. लोकांची कामं. त्यासाठी धावपळ यातच त्यांचा वेळ जात असे. शिवसेनेचं आंदोलन आणि हा मनानं कायम शिवसैनिकच असणारा आमदार तिथं नाही असे होत नसे. शिवसेनेसाठी, ठाकरेंसाठी सर्व आव्हानं पेलत पुढे सरसावणं या मूळ कोल्हापूरच्या रांगड्या गड्याला ठाऊक होतं. तसंच लोकांसाठी झटणंही त्यांच्या स्वभावातच होतं. कुणी काम घेऊन आलं आणि परत गेलं असं त्यांना चालत नसे. लोकांची कामं झालीच पाहिजेत. मग तो आपला मतदार असो वा नसो. यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यातूनच आपुलकीचे घट्ट बंध अंधेरीकरांशी तयार झाले होते. त्यामुळेच बुधवारी मध्यरात्री जेव्हा मला एका मित्राचा रमेश लटके यांचं निधन झालं का ते तपासा तेव्हा आधी विश्वासच बसला नाही. नंतर कळलं की जी बातमी फेक निघावी असं मनातून वाटत होतं ती खरी निघाली. रमेश लटके पहिल्यांदाच आपल्या कुटुंबासह परदेशात गेले होते. दुबईत त्यांचं ह्रदयविकारानं निधन झालं.
रमेश लटकेचं जाणं एका आमदाराचं जाणं नाही. अंधेरीतील त्यांना मानणाऱ्या लाखोंचा आधार गेला आहे. अंधेरीच्या राजकारणातील दोन चांगले लोकनेते या वर्षी हरपले. आधी भाजपाचे सुनील यादव गेले. आता रमेश लटके. कळत नाही अंधेरीच्या राजकारणाला काय झालंय? अशी प्रतिक्रिया काहींनी माझ्याकडे व्यक्त केली. ते असो. समाज आजही चांगल्या माणसांनाच आपलं मानतो, हेच त्यातून दिसलं.
खरंतर मी काही रमेश लटकेंच्या खूप जवळ होतो असंही नाही.
रमेश लटके निवडणुकीच्या राजकारणात पुढे जात राहिले. मी पत्रकारितेत पुढे जात राहिलो. ते पदांवर आल्यापासून मी फार संपर्कात नव्हतो. काहीवेळा कामापुरतं बोलणं होत असे. तेही फोनवर. मात्र, ते करत असलेली कामं लोकांकडून कळत असे. बरं वाटायचं. आपल्याच वयाचा एक सामान्य परिस्थितीतील माणूस आपल्या कर्तृत्वार पुढे झेपावत आहे. समाजाच्या उपयोगी येत आहे. रमेश लटकेंच्या जाण्यानं शिवसेनेनं मोलाचा शिलेदार गमावला आहे. लोकांचा आधार गेला आहे. काळाचं चक्र चालत राहतं. पण रमेश लटकेंसारखी आपली वाटणारी माणसं पुन्हा लाभतीलच असं नसतं. आमदार रमेश लटकेंना श्रद्धांजली…एवढंच सांगेन…हे वय काही जाण्याचं नव्हतं. समाजाला अशा नेत्यांची गरज असताना त्यांचं जाणं मनाला हळहळ लावणारं…
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क ट्विटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961