डॉ. गणेश नानासाहेब गोळेकर
महापुरुषांच्या अपमानाचे प्रकार फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत घडतात, असे नाही, त्यांना जास्त लक्ष्य केले जाते, त्याचं कारण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात महाराजांना असलेले स्थान असावे, एका कारस्थानासारखं सातत्यानं त्यांच्याबाबतीत घडतं. कुठेतरी पेटवापेटवी करण्याचाही बदहेतू असू शकतो. पण महाराजांप्रमाणेच महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्य महामानवांच्या बाबतीतही तशी आगळीक केली जाते. वारंवार घडताना दिसते.
महात्मा ज्योतिराव फुले यांची बदनामी:-
दै. लोकसत्तामध्ये लोकरंग पुरवणीत ‘भाषा कूस बदलते आहे’ या प्रशांत असलेकर यांच्या लेखातून थोर समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांची उघडपणे बदनामी करण्यात आली. ‘हले डुले महात्मा फुले’ अशी नवी म्हण मध्यमवर्गीयांमध्ये वापरली जाते, अशी असलेकरांनी माहिती दिली. या म्हणीचा अर्थ ‘खिळखिळीत निसटती वस्तू’ असा त्याने दिलेला आहे. ज्या महापुरुषाने आयुष्यभर ठाम सामाजिक भूमिका घेतली आणि सर्व स्त्रिया, बहुजन, अनुसूचित जाती-जमाती, शेतकरी, कामगार यांच्या उत्कर्षासाठी झोकून देऊन काम केले, त्यांच्या नावाचा वापर या अर्थाच्या म्हणीत करणे ही त्यांची उघड बदनामी आहे, अशी म्हण कुठेही अस्तित्वात नाही. सामाजिक वातावरण दुषित करण्याचा हा भाग आहे. हे लिखाण जातीयवादी, नासक्या आणि विकृत मानसिकतेतून केलेले आहे. आणि लोकसत्ता सारखे वर्तमानपत्र ते प्रसिद्ध करून त्यास खतपाणी घालत आहे, असेच यावरून दिसते. ज्यावेळी या लेखाविरुद्ध आवाज उठवण्यात आला नंतर पंधरा दिवसांनी संपादक व लेखकांनी माफीनामा प्रसिद्ध केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान:-
एनसीईआरटीच्या अकरावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकातील ‘इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क’ च्या पहिल्या धड्यातील ‘कॉन्स्टिट्यूशन व्हाय अँड हाऊ’ यामधील १८ क्रमांकाच्या पानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी व्यंगचित्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका गोगलगाय वर बसले आहेत आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हातात आसूड घेऊन दाखवले आहे. राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया खूप संथ गतीने सुरू असल्याने नेहरू नाराज असल्याचे या व्यंगचित्रातून व्यक्त होते. त्यावेळी राज्यघटना निर्मिती तीन वर्षाचा कालखंड लागला होता. भारतीय राज्यघटनाकडे जगातील सर्वात चांगली राज्य घटना म्हणून पाहिले जाते. या व्यंगचित्रावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला. त्यानंतरही व्यंगचित्र पुस्तकातून वळणार असल्याचे सरकारच्या वतीने आश्वासन देण्यात आले. मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना एनसीईआरटीच्या हरी वासुदेवन यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये प्रा.सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव हे मुख्य सल्लागार आहेत अशी माहिती दिली. यावेळी केवळ धडा न वगळता दोषींवर गुन्हेगारी खटले दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली. या वादानंतर पाठ्यपुस्तक समितीचे मुख्य सल्लागार योगेंद्र यादव आणि प्रा. सुहास पळशीकर यांनी राजीनामा दिला.
शिवपुत्र छत्रपती संभाजी राजेंवर आरोपाच्या फैरीच्या फैरी:-
संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे छत्रपती संभाजी राजे. कॅरे हा संभाजीराजे कालीन फ्रेंच पर्यटक. तो राजांची महती सांगतो की, “संभाजी राजे सारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र आणि भारतात पाहिला नाही. संभाजी राजे जर आणखी जगले असते तर उत्तर भारत जिंकला असता, इतके ते शूर पराक्रमी आणि दूरदृष्टीचे प्रजावत्सल राजे होते”. अशा महापराक्रमी, विद्वान, रसिक, राजनीतिज्ञ, धर्मपंडित यांबरोबर रणांगणावर कमालीची शौर्य गाजवणाऱ्या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीस काहींनी आरोपाच्या घेऱ्यात उभे केले. काही बखरकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कादंबरीकार यांनी त्यांची अपेक्षाच नव्हे तर सतत अवहेलना केली. खोटेनाटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अनेक कपोलकल्पित पात्रे निर्माण करून होता येईल तेवढे आरोप करण्याचा प्रयत्न केला. वयाच्या 14 व्या वर्षी ‘बुधभूषण’ नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहून संस्कृत पंडित असणारे, त्यानंतर ‘नखशीख’, ‘सातसतक’, ‘नायिकाभेद’ हे ग्रंथ ब्रज भाषेत लिहून लेखनाची मक्तेदारी मोडीत काढणारे, मराठा साम्राज्याच्या 15% पट सैन्य असणाऱ्या मुघल साम्राज्याशी एक हाती लढणारे, आयुष्यातील सर्वच्या सर्व लढाया जिंकणारे अजिंक्य योद्धे, महापराक्रमी संभाजी राजे होते. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. विकृत इतिहासकार, नाटककार, कादंबरीकार, आणि चित्रपट वाल्यांनी त्यांना बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र सर्व आरोपांच्या भट्टीतून तावून सुलाखून संभाजीराजांचे चरित्र तितक्याच तेजाने तळपत आज समोर आले आहे. इतिहासाच्या पुनर्मांडणीतून त्यांचें निष्कलंक चारित्र्य सिद्ध झाले आहे.
अगदी प्राचीन काळापासून बहुजनवादी, सुधारणावादी महापुरुषांची बदनामी करण्याचा कुटील डाव वेगवेगळ्या माध्यमातून जाणीवपूर्वक झालेला आहे. तमाम बहुजनांच्या महापुरुषांवर जाणीवपूर्वक व पद्धतशीरपणे आणि कळत-नकळत चिखलफेक करण्यात आलेले आहे. ज्यांच्या हातात इतिहास लेखनाची साधने होती, त्यांनी आपल्या पद्धतीने इतिहास लिहिला. महापुरुषांच्या पुतळ्यांची, प्रतीकांची काही विकृत मानसिकतेचे लोक विटंबना करीत आहेत. त्यातून अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. समाजात दुफळी माजविण्याचा प्रयत्न होत आहे. समाज माध्यमाद्वारे महापुरुषांचा अपमान करणे सहज शक्य आहे. शासनाचे पाहिजे तेवढे नियंत्रण समाज माध्यमांवर नाही. अशा विकृतींना रोखण्यासाठी, बहुजनांच्या अस्मितांचे पावित्र्य राखण्यासाठी, मराठा इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी, सामाजिक सौहार्द टिकविण्यासाठी व अशा सर्व बाबींवर नियंत्रणासाठी कठोरात कठोर कायदा केला पाहिजे ही काळाची गरज आहे.