प्रा. शुद्धोधन कांबळे / व्हा अभिव्यक्त!
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी विद्रोहाची व्याख्या करताना प्रेमाचा अधिक वापर केला आहे. प्रचलित व्यवस्थेशी असहमत होणे आणि त्याविरुध्द बंड करण्यासाठी तीव्र व प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. वेळ पडली तर बळाविरुध्दही कायम राहून व्यवस्था बदलण्यासाठी ताकद राखली पाहिजे.
प्रेमाने जग जिंकता येईल, पण बदलण्यासाठी फक्त प्रेम पुरेसे नाही. व्यक्ती व समाजाची परंपरा व रुढी यातील कमतरता दाखवून त्या बदलण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी संघर्ष अटळ ठरतो कारण भावनिकतेच्या आहारातून सामान्य जनता नवीन स्वीकारण्यास तयार होत नाही. गॕलिलिओला पृथ्वी गोल आहे, हे सांगण्याची शिक्षा मिळाली, तुकाराम महाराजांचे विद्रोही अभंग पाण्यात बुडविले, शिवाजी महाराजांचा सत्ता स्थापनेचा ‘विद्रोह’ नाकारण्यात आला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा परीवर्तनाचा लढा नेहमीच संघर्षयुक्त होता.
प्रेमाने परिवर्तन करण्याचा प्रयत्न जरुर करावा पण वेळ पडली संघर्ष करावाच लागतो. नागराज मंजुळे यांचा चित्रपटसृष्टीतील विद्रोह अयशस्वी करण्यासाठी त्यांचा “झुंड ” चित्रपट जाणूनबुजून फ्लॉप करण्यात आला. सध्या फक्त प्रेमानेच विद्रोह करता येईल अशी परिस्थिती उरली नाही. दाभोळकर, कलबुर्गी व पानसरेच्या हत्या करणारी तसेच गांधीच्या पुतळ्यांना गोळ्या घालणारी मानसिकता असलेला समाज अस्तित्वात आहे. कोणी जिहाद म्हणत असेल तर कोणी धर्म रक्षण म्हणत असेल पण कट्टरता सर्वत्र सारखीच आहे.
प्रचलित प्रवाहाच्या विरोधात पोहण्यासाठी हिंमत लागते , जगात विद्रोह आणि संघर्षाचे अनेक उदाहरणे आहेत. रक्तरंजित फ्रेंच राज्य क्रांती असो की बाबासाहेबांची रक्तविरहित सामाजिक क्रांती असो, सगळीकडे संघर्ष अटळ होताच आणि जिथे संघर्ष असतो तिथे प्रेम असतेच असे नाही. शेवटी, मला येथे संघर्ष शब्द हिंसा या शब्दापुरता मर्यादित ठेवायचा नाही आणि विद्रोहाची परिभाषा प्रेमापुरती गुळगुळीत रहावी अशी वाटत नाही.
(प्रा. शुध्दोधन कांबळे हे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते चिञपट समीक्षक असून दलित साहित्यावर त्यांची पी.एच.डी. सुरु आहे. सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिध्द आहेत.)