मुक्तपीठ टीम
अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे आदर्शगाव योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे.
आदर्शगाव योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये १२० प्रशिक्षणार्थीकरिता निवासासह प्रशिक्षणार्थी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
या प्रशिक्षण केंद्रात आदर्शगाव योजनेतील प्रशिक्षणाबरोबरच इतरही प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे. प्रशिक्षण केंद्र संचलित करण्यासाठी आस्थापना निर्माण करणे, निधीचा स्त्रोत निश्चित करणे, देखभालीचे धोरण ठरविणे, अल्प व दीर्घकालीन प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करणे तसेच प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी अभ्यासगट नियुक्त करण्यात आला आहे. या अभ्यासगटामध्ये आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष हे अध्यक्ष असतील. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक, सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे संचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव/उपसचिव तसेच अवरसचिव या अभ्यासगटात सदस्य असतील. याशिवाय वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे माजी सह मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे संचालक, प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कन्सल्टंटस संचालक, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यशदाचे प्राध्यापक आनंद पुसावळे, कृषी मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रफिक नाईकवाडी, सेवानिवृत्त कृषि आयुक्त उमाकांत दांगट, कोल्हापूरचे प्रगतशील शेतकरी प्रतापराव चिपळूणकर, बीड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे देखील या समितीचे सदस्य असतील. याशिवाय, आदर्शगाव योजना-प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणेचे १ प्रतिनिधी, १ पंचायत राज प्रतिनिधी,१ सरपंच हे या समितीमध्ये निमंत्रित सदस्य असतील तसेच मृद संधारण व पाक्षेव्यचे संचालक हे या अभ्यासगटाचे सदस्य सचिव असतील.