मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल पक्षाच्या नेत्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. एसटी संपात आक्रस्ताळी भूमिका घेणारे अॅड. गुणरत्न सदावर्तेंविरोधात संताप व्यक्त होत असतानाच पक्षाकडे असलेल्या गृहखात्याच्या थंड कारभारावरही राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याचं दिसत आहे. आजवर पोलीस कारवाईमुळे काँग्रेसचे नेते तर भाजपा नेत्यांच्या विरोधातील मवाळ भूमिकेमुळे शिवसेनेचे नेतेच गृहखात्यावर नाराज होते, आता राष्ट्रवादीतही तीच भावना आहे.
शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानात घुसून एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले आक्रमक आंदोलन खळबळ माजवणारे ठरले आहे. या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गृहखात्याच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी पसरली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे नेमके कोण आहेत? याचा शोध घेणार असल्याचं गृहमंत्री वळसे पाटिल यांनी जाहीर केलं आहे. मात्र, महाराष्ट्रातील सर्वात ज्वलंत विषयाची माहिती ठेवण्यात त्यांचं खातं कमी पडल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. याआधीही एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच मनपासमोर आंदोलन करून त्यांच्या अचानक धक्कातंत्राची प्रचिती दिली होती. तरीही या आंदोलकांवर लक्ष कसं नव्हतं, असा प्रश्न विचारला जात आहे. तसंच राज्यातील कोणतेही मोठे कार्यक्रम, आंदोलनं, इतर घडामोडींवर पोलिसांची विशेष शाखा लक्ष ठेवत असते. प्रत्यक्ष घडण्यापूर्वी माहिती ठेवण्याचं आणि गृहमंत्र्यांना सकाळच्या ब्रिफिंगमध्ये सावध करण्याचं काम याच यंत्रणेतून आलेल्या माहितीच्या आधारे होणं अपेक्षित असतं. पण तसं झालेलं दिसलं नाही.