मुक्तपीठ टीम
ज्या खात्याच्या आयुष्य़ातील काही दशकं खर्ची केली त्या पोलीस खात्याच्या सेवेतून बाहेर पडताना हक्क असलेल्या पदावरून निवृत्तीची प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकदा सरकारी नोकशाहीच्या अजगर मिठीत अशा इच्छा-आकांक्षा गुदमरतात. मुंबई पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक कैलास अरुणे यांनीही बहुधा पदोन्नतीची आशा सोडली असावी. पण ३१ मार्च रोजी पोलीस सेवेतून निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी त्यांची उपनिरीक्षकपदावर बढती झाली. त्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे खास मध्यरात्रीनंतरही कार्यालयात थांबले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच उपनिरीक्षक कैलास अरुणे यांचा निवृत्तीचा दिवस गोड झाला.
या पदोन्नतीचा अर्थ असा आहे की, अरुणे यांची अधिकारी दर्जावरून निवृत्ती झाली. या पदोन्नतीमुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे चांगले फायदे मिळू शकतात. ते २९ मार्च रोजी आरे कॉलनी पोलीस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक एएसआय म्हणून कार्यरत होते. “तांत्रिक कारणास्तव, मी पात्र असूनही मला पूर्वी पदोन्नती मिळू शकली नाही. मी एएसआय म्हणून निवृत्त होईन आणि अधिकारी बनण्याची माझी इच्छा अपूर्ण राहील.” अशी भीती त्यांना भेडसावत होती.
फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पोलीस हवालदारांच्या पदोन्नतीला गती देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. पोलीस नाईक पद रद्द करण्यात आले, ज्यामुळे एएसआयची पीएसआय रँकवर जलद बढतीचा मार्ग मोकळा झाला. पोलीस कर्मचार्यांनी ३० वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी आणि किमान तीन वर्षे एएसआय म्हणून काम केलेले असावे, अशी अट होती. महाराष्ट्रातील सुमारे ४५ हजार हवालदारांना लाभ देणारा सरकारी ठराव मंजूर करण्यात आला.
कैलास अरुणे यांची पदोन्नती रोखण्यासाठी जातीचा दाखला ही एकमेव गोष्ट अडथळा ठरली. मी १९८२ मध्ये दलात रुजू झालो तेव्हा जातीचा दाखला सादर करण्याची गरज नव्हती. जेव्हा तसं करणं अनिवार्य झाले, तेव्हा त्यांना दाखला मिळवण्यासाठी सहा वर्षे लागली. त्यामुळे माझ्या पदोन्नतीला विलंब झाला,” असे ते म्हणाले.
पीएसआय कैलास अरुणे यांचा जीवन प्रवास
- अरुणे १९८१ मध्ये अहमदनगरमधील एका छोट्याशा वस्तीतून मुंबईत आले. एका कापड गिरणीत काम करण्यासाठी त्यांच्या भावाकडे गेले.
- तेव्हाच त्यांनी पहिल्यांदा पोलीस भरतीबद्दल ऐकले.
- अर्जदारांनी किमान आठवी पास असणे आवश्यक होते आणि त्यावेळी ते इयत्ता नववीपर्यंत शिकले असल्याने त्यांनी अर्ज केला.
- अरुण यांनी नेमबाजीचे चांगले प्रशिक्षण घेतले होते.
- संरक्षण शाखेत त्यांच्या सेवेचा मोठा भाग व्हीआयपींसाठी अंगरक्षक म्हणून गेला.
- त्यांचा पुढचा कार्यकाळ वाहतूक विभागात होता. ते म्हणाले, “मोटारचालकांनी शिवीगाळ केली तरीही मी शांत कसे राहायचे ते शिकलो.”
पाच दिवसात सीपी पांडेंनी केली प्रक्रिया पूर्ण
निवृत्तीच्या पाच दिवस अगोदर, अरुणे यांनी पोलीस प्रमुख संजय पांडे यांच्यासमोर पदोन्नतीची विनंती केली आणि त्यांना कळवले की त्यांनी सरकारी ठरावात आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता केली आहे. पांडे यांनी त्यांच्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. निवृत्तीच्या समारंभात त्यांच्यासोबत इतर ८३ पोलीस कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला, तेव्हा अरुणे यांनी व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त केले.