सुश्रुषा जाधव
खरंतर शिमगा म्हटलं की धमाल ठरलेलीच. पण त्यातही तो गावाच्या मातीतील असेल, तर रंगत आणखीच वाढते. गेली दोन वर्षे कोरोना नियमांचं पालन करत शिमगा साजरा न करण्याचा संयम दाखवला गेला. आता या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच कोकणातील गावांमध्ये शिमग्याची धमाल सुरु झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंडी खुर्द कजरघाटी या गावात ६०० वर्ष जुना इतिहास असणारा शिमगोत्सव आहे. तो ग्रामदेवता श्री महालक्ष्मी, महाकाली, व्याघ्रांबरी देवींचा भक्तीनं न्हालेला शिमगोत्सव असतो.
१४ मार्चला देवीला रूप लागले. दरवर्षी होळी फोफळीच्या झाडाची नवसाची असते. ह्यावर्षी १५ मार्चला रत्नागिरी शहरातील खडपे वठार येथील जितू शेट्ये यांच्याकडून होळी आणण्यात आली. होळी आणताना गावकऱ्यांचा उत्साह गगनात मावेना. ढोल ताशांच्या गजरात देवीच्या नावाचा गजर करत होळी आणली.
त्रयोदशीला म्हणजेच बुधवारी १६ मार्चला दुपारी १ वाजता श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात होळी उभी राहिली. आता १६ ते १९ मार्चदरम्यान पालखी मंदिरात बसवण्यात आली आहे. या कालावधीत भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल. १९ मार्चला दुपारी १२ नंतर श्री रामेश्वरला भेट देऊन शिंपण्याकरिता म्हणजेच गावातील प्रत्येक घराला पालखी भेट घेणार. २० मार्च ते २५ मार्च या कालावधीत काजरघाटी या गावाला पालखी गावभेट घेणार आहे. या दरम्यान गावातल्या काही घरात पालखी वस्तीला थांबणार आहे. २६ ते ३० मार्चला संध्याकाळपर्यंत पालखी कुवारबाव, साईनगर, गणेशनगर परिसरात गावभेट घेईल.
पाडव्याच्या आधी ३० मार्चला संध्याकाळी ७ नंतर रूपं उतरल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. दूवादशीला होळी तुटते. दरवर्षीप्रमाणे प्रथा, परंपरा सांभाळत आणि कोरोनाचे नियम पालन करत हा उत्सव साजरा होणार आहे.
पालघरमधील आदिवासींचा फगवा…
ग्रामीण भाग म्हटलं तर होळी सणाला एक वेगळं महत्व आहे. पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. होळी अगोदरच आदिवासी बांधव वेगवेगळी वेशभूषा करत बाजारपेठा आणि गावागावात नाचगाणी करत फगवा मागत फिरतात.