मुक्तपीठ टीम
गेले काही दिवस शिवसेनेचे स्थानिक नेते आयकर विभागाच्या रडारवर आहेत. मुंबई मनपाचा खजिना सांभाळणाऱ्या स्थायी समितीचे वर्षानुवर्ष अध्यक्ष असणाऱ्या यशवंत जाधवांच्या घरी चार दिवस आयकर धाड झाली. मंगळवारी युवा सेनेचे राहुल कनाल आणि शिवसेनेचे जुहू-अंधेरीतील विभाग संघटक संजय कदम यांच्यावर धाडी पडल्या आहेत. त्यातील राहुल कनाल हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या जवळचे मानले जातात. ते भाजपा नेते आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात आक्रमकरीत्या सक्रिय आहेत. तर संजय कदम हे भाजपा आमदार अमीत साटम यांच्याविरोधात अंधेरी पश्चिम मतदारसंघात जोरदार सक्रिय झाले होते. त्यांच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्यांची स्थानिक राजकीय वर्तुळासह शिवसेनेतही दबक्या आवाजात चर्चा होती. ते परिवहन मंत्री अनिल परब यांच्या खास गोटातील मानले जातात.
आयकर धाडीचा मंगळवारचा मुहूर्त हा शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषदेच्या दिवासाचाच निवडला गेला आहे. या पत्रकार परिषदेत ते तपास यंत्रणांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याची शक्यता असताना त्यापूर्वीच शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या घरी आयकर विभागाने धाड घातली आहे.
राहुल कनाल यांच्या घरी आयकर धाड
- मंगळवारी सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी धाड सुरू केली.
- केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- आयकर विभागाचे एक पथक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे.
- यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे.
- राहुल कनाल हे उद्योजक आहेत.
- ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत.
- तसेच आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
- या शिवाय शिर्डी देवस्थान समितीवर ते पदाधिकारीही आहेत.
संजय कदमांच्या घरीही आयकर धाड
- अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीत संजय कदम राहतात.
- त्यांच्या अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले पश्चिम, रायगडमध्ये काही मालमत्ता असल्याचं सांगितलं जातं.
- संजय कदम हे केबल व्यावसायिक असून त्यातूनच त्यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी जवळीक झाल्याचे सांगितले जाते.
- संजय कदम हे शिवसेनेचे विलेपार्ले पश्चिम, जुहू आणि अंधेरी पश्चिम परिसरातील स्थानिक विभाग संघटक आहेत.
- शाखाप्रमुख पदापासून त्यांचा आजवरचा प्रवास झाला आहे.
- गेल्या काही वर्षांपासून त्यांचं आर्थिक आणि राजकीय बळ झपाट्याने वाढलं.
- अनेक महागड्या गाड्या आणि विलासी जीवनशैलीमुळे ते स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेत होते.
आशिष शेलार, अमीत साटम यांच्याविरोधातील म्हणून कारवाईचा आरोप
शिवसेनेच्या पश्चिम उपनगरातील नेत्यांच्या मते भाजपा नेते आशिष शेलार आणि आमदार अमीत साटम यांच्या वांद्रे मतदारसंघात राहुल कनाल हे मोठे बळ उभे करत आहेत. तेच काम संजय कदम हे अमीत साटम यांच्या अंधेरी पश्चिम मतदार संघात करत आहेत. त्यामुळेच त्यांना लक्ष्य केलं असावं. त्यातच त्यांची शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांसोबत जवळीक असल्यानेही ते लक्ष्य झाले आहेत. भाजपा सूडबुद्धीने मनपा निवडणूकच नाही तर आगामी विधानसभा निवडणूकही लक्षात घेत शिवसेनेच्या प्रभावशाली स्थानिक नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे.