प्रदीप आवटे
बाई अंगणात शेणामातीचा सडा घालते
उखणलेल्या जमीनीवर आपला देह पांघरते
बाई कुडाच्या भिंतीला पोतेरा करते
रंग उडालेल्या घराला पुन्हा नवा रंग देते
धुणं पिळते, झाडलोट करते
स्वत:ला रोज नव्याने धुवून घेते.
माजघरात, शेजघरात
परसाच्या एवढ्याशा तुकड्यात
माती होऊन फुलून येते.
हातातल्या सूपामध्ये क्षण क्षण पाखडते
दोन दगडी पात्यामध्ये गाणं गात पहाट होते.
बाई दुष्काळाशी वार्ता करत,
आटलेल्या आडाचा मायाळू रहाट होते.
बाई चूल होऊन ढणढणत राहते
गरम मऊशार भाकरी होऊन टोपल्यात पडते
वस्तीमधल्या गर्द अंधारात,
मिणमिणता दिवा जपणारा
जीर्ण कणखर पदर होते…
रात्र फुलून आली म्हणजे
अनोळखी प्रदेशातील अत्तर होते
फुलपाखरांचे स्पर्श जपत कासचे पठार होते.
बाई काटा रुतल्या पायासाठी लाचकन होते
कृष्णाच्या भळभळणाऱ्या बोटासाठी
भरजरी शालूची चिंधी होते.
व्याकूळलेल्या सिध्दार्थासाठी
सुजाताची खीर होते.
बाई प्रसवते, जोजवते.
द्रौपदीच्या थाळीमध्ये जगाला भरवते.
ऊन पाऊस थंडी पिऊन
सुरकुत्यातील माया होते
दगड मातीची आठवण म्हणून
तळपायात चिरण्या ठेवते.
सावळ्या अंधारात न्हालेल्या, तिच्या
उबदार गर्भाशयात अवघं जग तोलून धरते.
ज्या खडकावर घुसळली मान
तो कातळ, कातर काळजात ठेवते
आणि
वाटेवरल्या प्रत्येक दगडात
थोडं बाईपण पेरत जाते.
-प्रदीप आवटे
(राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत)