मुक्तपीठ टीम
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात येत्या तीन वर्षांत देशातील सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य ठरवल्याची आठवण करून दिली आहे. त्यानुसार २०२३ पर्यंत संपूर्ण भारतीय रेल्वे डिझेलमुक्त होईल. त्यामुळे दिल्लीसह संपूर्ण देशाची वायू प्रदूषणापासून सुटका होईल. तसेच २०३० पर्यंत भारतीय रेल्वे जगातील पहिली प्रदूषणरहित रेल्वे होईल.
गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी सरकार बनण्यापूर्वी दरवर्षी रेल्वेमध्ये ४० ते ४५ हजार कोटींची गुंतवणूक केली जात असे. यावेळेस अर्थमंत्र्यांनी रेल्वेमध्ये दोन लाख १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. तसेच महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी प्रचंड रक्कम खर्च केली जाणार आहे. यामुळे विकासाला वेग येईल.
महाराष्ट्रात जमीन अधिग्रहणास विरोध आणि कोरोनामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पाला वेळ लागला आहे. गुजरातमधील ९० टक्के जमीन अधिग्रहित करण्यात आली असून तेथे काम करण्यासाठी निविदादेखील निघाल्या आहेत.
महाराष्ट्रात आवश्यकतेच्या फक्त ३० टक्के जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. येत्या काही वर्षात देशातील अन्य सात मार्गांवर हाय स्पीड आणि सेमी हाय स्पीड रेल्वे चालविण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालावर काम चालू आहे.
मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात २० हजार मेगावॅट सौर उर्जा उत्पादन होते. आता एक लाख मेगावॅट उत्पादन आहे. २०२२ पर्यंत १.७५ लाख मेगावॅट आणि २०३० पर्यंत ४.५० लाख मेगावॅट नूतनीकरणक्षम उर्जा करण्याचे लक्ष्य आहे.
पाहा व्हिडीओ