प्रा. हरी नरके
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या देशातल्या सर्वात मोठया व भव्य पुतळ्याचे ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त अनावरण झाले. हा क्षण ऐतिहासिक नी मौलिक क्षण आहे. ज्या पुण्यात देशातली मुलींची पहिली शाळा (१८४८ मध्ये ) काढली म्हणून सावित्रीबाईंवर चिखल, शेण, दगडगोटे फेकले गेले, जोतीराव- सावित्रीबाईंना घर सोडावे लागले त्याच पुण्यात १०० वर्षांनी (१९४८) स्थापन झालेल्या पुणे विद्यापीठाला त्यांचे नाव दिले जाते (२०१४) आणि १४/२/२०२२ ला विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर त्यांचा भव्य पुतळा उभा राहतो ही किमया नेमकी काय आहे?
यावर एक पुस्तक लिहावे लागेल इतका पडद्यामागच्या घडामोडीचा रहस्यमय खजिना यामागे दडलेला आहे. हे सारे सहजासहजी घडले काय? आजही हे सारे घडवून आणताना किती रक्त आटवावे लागते! दरच वेळी एक किलोचे वजन उचलण्यासाठी २० टनांची क्रेन वापरावी लागते. प्रस्थापित व्यवस्था आजही किती मजबूत आहे नी ती आजही किती पराकोटीचा द्वेष करते, सवित्रीजोतींचा, हे लिहावेच लागेल. फक्त आज ती वेळ नाही. व्यवस्थेच्या परिघाबाहेर असलेल्या खुरट्या झुडपांना याची कल्पनाही करता येणार नाही!
आज आनंदाचा क्षण आहे. डोळ्यात आसवं आहेत.
विशेष बाब म्हणजे जे सनातनी लोक कायम विरोधात होते, आहेत नी आजचा विपरीत काळ बघता उद्याही राहतील तेच शेवटच्या क्षणी पुढे सरसावतात नी त्यांच्यामुळेच हे कसे घडले याचेही ढोल वाजवीत सगळे श्रेय स्वतःकडे घेतात. वर्षानुवर्षे राबणारे मात्र दूर कुठे तरी अंधारात राहतात.
हे मी महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारक, नायगावचे सावित्रीबाईंचे स्मारक, दिल्लीत संसदेत जोतीरावांचा पुतळा, पुणे विद्यापीठात जोतीराव व बाबासाहेंबांचा पुतळा, विद्यापीठ नामांतर आणि आज मुख्यालयासमोर सावित्रीबाईंचा पुतळा उभा राहणे या प्रत्येक क्षणी अनुभवत आलोय.
आज जर इतका विरोध आहे तर सावित्रीबाई जोतीरावांच्या काळात काय असेल?
धन्यवाद छगन भुजबळ, अजित पवार, उदय सामंत, संजीव सोनावणे,संजय चाकणे, सुधाकर जाधवर, संजय परदेशी आणि समता परिषद टीम! तुमच्या पाठबळामुळेच हा इतिहास घडला!
(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)